
आपल्या समाजात काही वेळा कसलाही आदी अंत नसलेले वाद कसे खेळले जातात आणि त्यात कसा वेळ खराब केला जात असतो याची काही उदाहरणे अधुन मधुन समोर येत असतात. असे वाद खेळायला आधी वेळही नसायचा आणि त्यासाठी माध्यमेही उपलब्ध नसायची पण आता २४ तास रतीब घालायचा वसा उचललेल्या काही माध्यमांनी असल्या वादांना फोडणी द्यायला सुरूवात केली आहे आणि त्यात तेल ओतून ते भडकवण्याचा उद्योग आरंभिला आहे. हे वाद जर निरर्थक आहेत तर त्यांची दखल आपण तरी कशाला घ्यायची असा प्रश्न कोणी विचारू शकेल पण अशा वादातून अनेक प्रकारच्या चुकीच्या कल्पना समाजात रूढ होण्याची शक्यता असते म्हणून त्यांची मीमांसा केली पाहिजे. आता आपल्या समोर विषय आला आहे तो युवा शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात सादर झालेल्या काही नृत्यांचा.या निमित्ताने काही स्पर्धा घेण्यात आल्या आणि त्यात एका गटाने शीला की जवानी या गाण्यावर नाच सादर केला. हे नृत्य सादर करून शिवसेनेने मोठा घोटाळा केला अशी हरकत घेऊन त्यावर एका वाहिनीने चर्चा आयोजित केली होती.
शीला की जवानी हे गाणे आक्षेपार्ह आहे का ? या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी नाही असेच दिले. ते तसे असले तरीही त्याला कोणी आक्षेपार्ह म्हणणार नाही कारण आपण टीव्हीचे बटण दाबून तो चालू केला तर हे गाणे अनेक वाहिन्यांवर सातत्याने लावलेले असते. त्यातल्या हालचाली कामवासना चाळवणार्या असतात हे निःसंशय पण आता आपण तेवढे ‘सुधारलो’ आहोत. काही वर्षांपूर्वी या नृत्याला कोणीच चांगले म्हणायला धजावले नसते पण, आता ते आपल्या घरात आले आहे आणि एकंदरीतच आपल्या अश्लिलतेच्या कल्पना बोथट व्हायला लागल्या आहेत. आपण आता लेकी बाळी सुना नातवंडांसह हे सारे बघत आहोत. त्यामुळे शीला की जवानी कितीही उफाळून आली तरी आपल्याला ती आता आक्षेपार्ह वाटेनाशी झाली आहे. फक्त प्रश्न असा आहे की, शिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात असे नृत्य सादर करावे का ? हे नृत्य आक्षेपार्ह नाही तर मग तो शिवसेनेच्या कार्यक्रमातच का नको ? याचे उत्तर तयार आहे. शिवसेना ही स्वतःला संस्कृती संरक्षक समजते मग शिवसेनेने हे नृत्य सादर करता कामा नये. म्हणजे शीला की जवानी हे नृत्य आपल्या लहान मुलांनी पाहिले तरी चालते फक्त शिवसेनेच्या कार्यक्रमात नको कारण शिवसेना स्वतःला संस्कृती संरक्षक म्हणवते.
आपण अश्लीलतेचे दोन दंडक तयार करीत आहोत. आपण कशाला अश्लील म्हणावे ते आपण ठरवत आहोतच किबहुना आपण कशालाच अश्लील समजत नाही कारण आपण पुरोगामी आहोत असे आपण ठरवून टाकले आहे. स्वतःला संस्कृती संरक्षक म्हणवणारांनी कशाला अश्लील म्हणावे आणि काय दाखवू नये याचीही व्याख्या आपणच करायला लागलो आहोत. शिवसेना स्वतःला संस्कृती संरक्षक समजत असूनही तिला हे गाणे अश्लील वाटत नाही म्हणून तिने आपल्या कार्यक्रमात त्याला परवानगी दिली. पण आता या शिवसेना विरोधकांचे म्हणणे असे आहे की, हे गाणे शिवसेनेला अश्लील वाटलेच पाहिजे आणि ते गाणे आपल्या कार्यक्रमात सादर केल्याबद्दल आता सर्वांसमोर उठाबशा काढल्याच पाहिजेत. शिवसेना काही यावरून उठाबशा काढायला तयार नाही. मग २४ तास प्रसारणात तासन्तास या एकाच निरर्थक मुद्यावर काही अक्कल नसलेल्या वावदूक लोकांचे चिरकू चिरकू सुरू असलेले वाकताडन ऐकत रहा. मग त्यांनी संस्कृती संरक्षक म्हणजे काय याचीही व्याख्या करायची आणि श्लील अश्लीलतेचीही व्याख्या करायची. या क्षेत्रात त्यांचा अधिकार काय ?
त्यांना आता शिवसेनेला चूक ठरवायचे आहे म्हणून त्यांनी त्या बेताने या व्याख्या करायच्या. त्यात मग काही काँग्रेसजन असतात, काही राष्ट*वादीही असतात. राजकीय पक्षात वैचारिक भेद असतात. असले पाहिजेत. पण अश्लीलतेच्या कल्पना हा काही राजकीय विचारसरणीशी निगडित विषय नाही पण अशाही विषयावर काँग्रेस आणि राष्ट*वादी एका बाजूला आणि शिवसैनिक दुसर्या बाजूला अशी विभागणी होते. हा कार्यक्रम शिवसेनेने घेतला असला तरीही त्यात आक्षेपार्ह काही नाही असे एकाही काँग्रेस वाल्याला का वाटत नाही आणि त्यात काही चूक असेल तर ते चुकले आहे असे एकाही शिवसैनिकाला वाटत नाही. पण अशा अराजकीय विषयावरही राजकीय तट निर्माण होतात. अशा वेळी आपल्या या कार्यकर्त्यांना आपले पक्ष तरी नीट समजले आहेत की नाही ? असा प्रश्न पडतो. एखादा मराठी माणसाच्या हिताचा विषय असेल तर त्या विषयावर असे तट निर्माण होतात आणि त्यावर ते ते पक्ष त्या त्या बाजूला असू शकतात कारण हा पक्षाच्या विचार सरणीशी निगडित विषय आहे. शीलाकीजवानी हा काही राजकीय विषय नाही पण त्यावर राजकीय तट निर्माण होतात आणि हे लोक आपले म्हणणे खरे नसले तरी ते खरे करण्यासाठी नको त्या अनुचित गोष्टी शिकवायला लागतात.
