अपघाताची माहिती घरी त्वरीत कळविण्याची आरटीओची कायमस्वरूपी यंत्रणा

पुणे- रस्त्यावर अपघात झाला तर अपघातातील जखमींची माहिती त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचविणे तसेच अपघात अथवा अन्य आणीबाणीमुळे वाहतूक कोंडी अथवा वाहतूक बदल झाल्यास त्याचीही माहिती वाहनमालकांपर्यंत पोहोचविण्याची कामगिरी आता प्रादेशिक परिवहन कार्यालये पार पाडणार असून मुंबई वाहतून विभागाने तसे आदेश नुकतेच राज्यभरातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले असल्याचे समजते.
  पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकार्‍यांकडून समजलेल्या माहितीनुसार रस्त्यात अपघात झाला तर जखमी अथवा मृत अपघातग्रस्ताच्या कुटुबियांना ही माहिती देण्यासाठी ईमेल अथवा एसएमएस, आय डी वा अन्य संफ साधनांचा उपयोग करण्याच्या सूचना आम्हाला देण्यात आल्या आहेत. वाहनमालक वाहनाची नोंदणी करताना जी माहिती देतो त्यातून संपर्काचे पत्ते, फोन नंबर, ईमेल अथवा मोबाईल नंबर मिळवावेत असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. अन्य आणीबाणीच्या परिस्थितीत म्हणजेच अपघातामुळे वाहतूक कोंडी झाल्यास, रस्ते खचले असल्यास अथवा वाहतूकीत बदल केले गेले असल्यास त्याचीही माहिती याच संफ साधनांतून वाहनमालकांना पुरविण्यात येणार आहे.
  रस्त्यात एखादा अपघात घडला तर माहिती घेण्याची प्राथमिक जबाबदारी वाहतूक पोलिसांवर असते. मात्र बरेच वेळा पोलिस त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून मिळणार्‍या वाहनमालकाच्या माहितीवर अवलंबून असतात. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयानेच पुढाकार घेऊन वाहतूक पोलिसांना सहाय्य करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे अपघातग्रस्तांच्या कुटुंबियाना अपघातासंबंधीची माहिती अधिक लवकर मिळण्यास मदत होणार आहे. सर्व राज्यभर ही योजना लवकरच राबविली जाणार असल्याचेही हे अधिकारी म्हणाले.

Leave a Comment