पाश्चिम घाटात चहाच्या लागवड होणार

पुणे दि.४- महाबळेश्वर मध्ये स्ट्रबेरी लागवड यशस्वी करून त्याचे पेटंट मिळविल्यानंतर आता कृषी विभागाने महाबळेश्वर येथे चहाचे मळे फुलविण्याचा निर्णय घेतला असून पहिल्या टप्प्यात ५० हेक्टर क्षेत्रावर चहाची लागवड करण्यात येणार आहे.
    आसामचा चहा देशात पहिल्या क्रमांकाचा चहा समजला जातो. मात्र महाबळेश्वर येथील भौगोलिक वातावरण आणि हवा चहासाठी योग्य असल्याने येथेही चहाची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे जिल्हा कृषी अधिक्षक विकास पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की महाबळेश्वरला ६१३५ मिमि पाऊस पडतो. येथील पठारी प्रदेशात हवामान थंड व कोरडे असते तर पावसाळ्यात तेथे आर्द्रतेचे प्रमाणही चांगले असते. पाण्याचा चांगला निचरा होणार्‍या पर्वतीय उंचीच्या प्रदेशातील सुपीक जमिनीत चहाचे उत्पादन चांगले येते. ही सर्व अनुकुलता महाबळेश्वर येथे आहे. त्यामुळे येत्या दोन तीन वर्षांच्या काळात येथे ५० हेक्टर जमिनीवर चहाची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी प्रति एकर तीन लाख चव्वेचाळीस हजार रूपये खर्च अपेक्षित असून पैकी ८० हजार रूपये सरकारी अनुदान दिले जाणार आहे.
   चहाच्या पानांची तोडणी योग्य पद्धतीने व योग्य वेळी हेाणे अतिशय गरजेचे असते असे सांगून ते म्हणाले की चहा पानंावर प्रक्रियाही करावी लागते व त्यासाठी त्याचे प्रशिक्षण आवश्यक असते. त्यादृष्टीने चहा लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना उटी टी बोर्ड ऑफिसची सफर घडवून आणण्यात येणार आहे तसेच त्यांना योग्य ते प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

Leave a Comment