
पुणे दि.४- आगामी निवडणुकांत स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांसाठी प्रचार करण्याचा निर्णय अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला असला तरी १३ आक्टोबरला पुण्याच्या खडकवासला मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत प्रचारात उतरणार वा नाही यासंबंधीचा निर्णय अण्णांनी अजून घेतला नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते.
येत्या तीन वर्षात तीन निवडणूकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यात पुण्याच्या महापालिका निवडणूका, पाठोपाठ विधानसभा निवडणूका आणि लोकसभा निवडणूकांचा समावेश आहे. पुण्याच्या मनपा निवडणूकांत नव्याने स्थापन झालेल्या पुणे नागरिक संघटनेला अण्णांनी पाठिबा दिला असून ही संघटना त्यांचे चाळीस उमेदवार उभे करणार आहे. अण्णा या उमेदवारांच्या प्रचारात सामील होण्याची दाट शक्यता असल्याचे राळेगणचे सरपंच जयसिग मपारी यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल बील पास झाले नाही तर काँग्रेसविरोधात प्रचार करणार असल्याची घोषणा अण्णांनी राळेगणमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. त्याची सुरवात हरियाणातील हिस्सार लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपासूनच करण्यात येणार असून अण्णा तेथे काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात प्रचार करणार आहेत. आक्टोबर १३ पासून अण्णा पाच राज्यांचा दौरा करणार असून त्यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा व मणिपूर राज्यांचा समावेश आहे.