संशयाच्या छायेतील वाढदिवस

पंतप्रधान मनमोहन सिग यांचा ७९ वा वाढदिवस सोमवारी अनेक वाद आणि संशय यांच्या छायेत पार पडला. पंतप्रधानांनी ८० व्या वर्षात पदार्पण केले आहे. ते सात वर्षांपासून पंतप्रधान आहेत. त्यांचे सध्याचे सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढले गेलेले आहे. त्यामुळे या सरकारला २०१४ साली पुन्हा निवडून येण्याची संधी मिळेल की नाही हे आताच सांगता येत नाही. परंतु हे सरकार आपआपसातील संघर्षाने कितीही जर्जर झाले असले तरीही आणखी तीन वर्षे टिकणार आहे या विषयी मात्र काही शंका नाही. राहूल गांधी यांना आता पंतप्रधान करावे अशा कितीही चर्चा सुरू असल्या तरी ते अजीबात शक्य नाही आणि त्यामुळेच मनमोहन सिग यांना पंतप्रधान पदाची १० वर्षे पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. भारताच्या इतिहासामध्ये सलग दहा वर्षे पंतप्रधानपदी राहण्याची संधी मिळणारे ते तिसरे पंतप्रधान ठरणार आहेत. ही संधी यापूर्वी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी या दोघांनाच मिळालेली आहे. त्यामुळे मनमोहन सिग या पदावरून पायउतार होतील तेव्हा त्यांनी पंतप्रधान पदावर सर्वाधिक काळ राहणारे नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे पहिले पंतप्रधान असा विक्रम त्यांनी नोंदविलेला असेल.

एका अर्थाने हा सकारात्मक विक्रम असला तरी सरकारवर आणि देशाच्या कारभारावर सर्वाधिक कमी नियंत्रण असणारे पंतप्रधान हाही एक नकारात्मक विक्रम त्यांच्या नावावर निश्चितच नोंदला जाणार आहे. याच बरोबर त्यांच्या नावावर तसे बरेच विक्रम नोंदले जाण्याची शक्यता आहे. ते विक्रम कसे असतील ते या पुढच्या दोन वर्षात ठरणार आहे. अनपेक्षितपणे पंतप्रधान होण्याच्या बाबतीत मनमोहन सिग यांचा काही विक्रम नसेल कारण तो मान तसा एच. डी. देवेगौडा यांच्याकडे जातो. परंतु कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पंतप्रधान झालेले मनमोहन सिग या बाबतीत विक्रम नोंदवून जातील. राजकीय पार्श्वभूमी नसल्यामुळेच त्यांच्या नावावर बरेच नकारात्मक विक्रम नोंदले जात आहेत. त्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही एवढाच त्यांचा दोष नाही. नेहरू-गांधी घराण्याचा वारस सोनिया गांधी यांनी त्यांना एका वेगळ्या परिस्थितीत पंतप्रधान केलेले आहे. ही वेगळी परिस्थिती नेमकी काय आहे याचे निश्चित आकलन अजून व्हायचे आहे.

कारण या बाबतीत अजून तर्क आणि अंदाजच केले जात आहेत. सोनिया गांधी यांना सहजपणे पंतप्रधान होण्याची संधी चालून आलेली असताना त्यांनी आपल्या ऐवजी मनमोहन सिग यांना पंतप्रधान केलेले आहे. सोनिया गांधी यांच्याकडे देशाचे पंतप्रधान पद भूषविण्याची क्षमता नाही असे खुद्द सोनिया गांधी यांनाच वाटते आणि त्यामुळे त्यांनी मनमोहन सिग यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे. असा तर्क लढवला जात असतो. म्हणजे पंतप्रधानपदाचे सारे अधिकार सोनिया गांधी यांच्या हातात आहेत आणि मनमोहन सिग हे नाममात्र पंतप्रधान आहेत. गेल्या सात वर्षात असे वारंवार आढळले आहे आणि आता तर मनमोहन सिग हे गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती नीट हाताळू शकत नाहीत असे उघडच झाले आहे. अण्णा हजारे यांचे आंदोलन, निरनिराळी भ्रष्टाचाराची प्रकरणे, बाबा रामदेव यांचे उपोषण या सर्व प्रकरणात देशाचा पंतप्रधान म्हणून मनमोहन सिग काय करत आहेत असा प्रश्न पडावा इतके ते या प्रकरणांपासून अलिप्त राहिलेले होते. त्यांच्या मंत्रिमंडळातील  चिदंबरम, प्रणव मुखर्जी, कपिल सिब्बल असे काही कारस्थानी मंत्रीच आपापल्या परीने निर्णय घेत होते आणि मनमोहन सिग पंतप्रधान पदाचे अधिकार हाती असताना सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे, जे जे होईल ते ते पहावे या निर्लेप भावनेने फक्त पहात होते.

वृत्तपत्रीय भाषेत सांगायचे तर पंतप्रधान असून सुद्धा ते या घटनांचे मूक साक्षीदार झाले होते. हे त्यांच्या दुबळेपणाचे लक्षण होते. भ्रष्टाचाराच्या कोणत्याही प्रकरणात त्यांनी स्वतः पैसा खाल्लेला नाही. ही एक त्यांची जमेची बाजू आहे आणि त्यामुळे ते भ्रष्टाचाराच्या आरोपापासून दूर राहिलेले आहेत. त्यांची छबी किवा प्रतिमा ही अजून तरी कलंकित झालेली नाही. एवढे एक समाधान त्यांच्या खात्यावर जमा होते. परंतु त्यांच्या पंतप्रधान पदाच्या दुसर्‍या कारकीर्दीच्या मध्याला त्यांचे हेही समाधान हिरावले जायला लागले आहे. वयाची ७९ वर्षे पूर्ण करून ८० व्या वर्षात पदार्पण करताना या स्वच्छ चारित्र्याच्या पंतप्रधानांच्या पांढर्‍या शुभ्र सदर्‍यावर काही संशयाचे डाग दिसायला लागले आहेत. देशाच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणून ज्याचा उल्लेख होत आहे त्या २ जी स्पेक्ट*म घोटाळ्यात भ्रष्टाचार झाला परंतु त्यात आपण कोठेही नाही हे आजवर सिद्ध केलेल्या पंतप्रधानांना आता मात्र त्यापासून दूर राहणे अशक्य होणार आहे असे चित्र निर्माण व्हायला लागले आहे. २ जी स्पेक्ट*म प्रकरणात आदी चिदंबरम यांचे नाव आले आणि त्यामुळे राजकीय धुळवड सुरू झाली. पंतप्रधानांनी ए. राजा यांच्याप्रमाणेच चिदंबरम यांचाही बचाव करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण आता चिदंबरम वाचत नाहीत आणि मनमोहन सिग सुद्धा अडकू शकतात असे पुरावे समोर यायला लागले आहेत. या संशयाच्या धुक्यातच मनमोहन सिग ८० व्या वर्षात पदार्पण करत आहेत.

Leave a Comment