पापाचा पैसा पुंण्याच्या कामाला

तिरुपतीचा बालाजी हा पैसेवाल्यांचा देव आहे.त्यामुळे त्याच्या दर्शनाला जाणारा भक्त पैसेवाला तरी असतो किवा पैसेवाला नसेल तर पैसा मिळावा म्हणून तरी जात असतो.एकुणात तिथे पैशाचा व्यवहारही मोठा होतो. म्हणून ते जगातले क्रमांक दोनचे श्रीमंत देवालय आहे. या देवालयाचे बजेट एखाद्या राज्याच्या बजेटएवढे आहे. तिथे पैशाची एवढी उलाढाल होत असेल तर मग त्यातला पांढरा पैसा कोणता आणि काळा पैसा कोणता याची शहानिशा कशी करणार आणि कोण करणार ? तशी ती कोणी केली नाही तरी काही लोकांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून प्रेरणा घेऊन या देवालयातही भ्रष्टाचाराचा पैसा येता कामा नये अशी मागणी करायला सुरूवात केली आहे. कर्नाटकातले खाण सम्राट रेड्डी बंधू यांनी दोन वर्षांपूर्वी  बालाजीला अर्पण कलेला सोन्याचा रत्नजडित मुकूट पापाच्या पैशातून कमावलेला असल्यामुळे तो परत केला जावा अशी मागणी त्यांनी केली आहे.  काळा पैसा कमावल्यामुळे रेड्डी बंधूंना सध्या आंध्रातल्या तुरुंगात टाकण्यात आले आहे.म्हणून हे भक्त त्यांना काळा पैसेवाला मानत आहेत.
     आंध्र प्रदेशातल्या तेलुगु देसम पक्षानेही अशी मागणी करण्यात आघाडी घेतली आहे. भक्तांची मागणी म्हणजे कोणत्या भक्तांची याचा काही खुलासा होत नाही तसाच पक्षाने म्हणजे कोणी मागणी केली आहे याचीही काही स्पष्टता होत नाही. अशा या मागण्या तशा संदिग्ध आहेत पण या दोन्ही मागण्यांतून एक चांगली भावना व्यक्त झाली आहे. आपण देवाकडे एका पवित्र भावनेतून पहात असतो. देव हे आपल्या श्रद्धेचे स्थान असते. तेव्हा देवाचे पावित्र्य जपण्यासाठी देवाच्या मंदिरात जमा होणारा पैसा हा चांगल्या मार्गाने कमावलेला असला पाहिजे. लोकांच्या मुंड्या मुरगाळून  आणि देवाला नेमके नको असतात असेच मार्ग वापरून पैसा कमवायचा आणि तोच पैसा देवाला अर्पण करायचा ही धर्मातली एक विसंगती आहे. पापाने पैसा कमवायचा आणि पुण्याच्या कामाला द्यायचा हे काही योग्य नाही. म्हणून हा मुकूट परत द्यावा असे भक्तांना वाटते. आपल्या धर्मातही असेच सांगितले आहे. आपल्या जवळचा पैसा चांगल्या कामाला खर्च करावा असे तर धर्मात म्हटले आहेच पण तो चांगल्या मार्गांनीच मिळवलेला असला पाहिजे असेही आवर्जुन म्हटले आहे. साधन आणि साध्य हे दोन्ही शुद्ध असले पाहिजेत असाच आपल्या धर्माचाही आग्रह आहे.
    असे असले तरी पापाचा पैसा आणि पुंण्याच्या पैसा या संकल्पना किती निसरड्या आहेत याची या लोकांना  कल्पना नाही. तेव्हा देव आणि त्यापुढे येणारा पैसा याबाबत आणखी काही वेगळा विचार करता येतो.  उद्या चालून रेड्डी बंधूंची संपत्ती काळ्या मार्गांनी कमावलेली आहे असे दिसूनही येईल आणि त्यांना शिक्षाही फर्मावली जाईल असे मानून चालू. तेव्हा त्यांनी दिलेला तो मुकूट परत करण्याची मागणी मान्य होईल असेही मानून चालू पण असा न्याय कोणा कोणाला लागू करणार आहोत? मंदिराला अर्पण केला जाणारा प्रत्येक पैसा पुण्याच्या मार्गानेच कमावलेला असला पाहिजे असा आग्रह केवळ रेड्डी बंधूंच्या बाबतीतच धरणार आहोत का ? रेड्डी बंधूंनी अर्पण केलेल्या मुकटाशिवाय तिथे आणखीही अनेक मुकूट पडलेले आहेत. बालाजीला अर्पण केलेले हजारो कोटी रुपयांचे सोने मंदिराच्या  कोषागारात आहे. ते एवढे आहे की त्या सोन्यातून मंदिराच्या भितींना सोन्याच्या पत्र्याचा लेप दिला जाणार आहे. मग एवढे सोने काही केवळ पुण्याच्याच पैशातून कमावलेले आहे याची कोणी खात्री देणार आहे का ? बालाजीला अशा  देणग्या देणारे अनेक उद्योगपती आहेत आणि त्यातल्या काही लोकांवर कारवाईही सुरू आहे. अंबानी बंधूंनीही बालाजीला काही काही अर्पण केले आहे. या दोघांच्याही व्यवहारावर सध्या शंका व्यक्त केली जात आहे. थोरले मुकेश अंबानी यांनी चुकीच्या मार्गांनी तेल विहिरींचे कंत्राट मिळवले आहे तर धाकट्या अनिल अंबानी यांनी २जी स्पेक्ट*म घोटाळ्यात मलई चाखली असल्यामुळे ते नाही पण त्यांचे अधिकारी आता तुरुंगात पडलेले आहेत. मग अंबानी बंधूंनी दिलेली देणगी आणि हिर्‍याचे हार त्यांना परत केले जाणार आहेत का ?
बालाजीच्या मंदिरात हुंडी नावाचा एक प्रकार आहे. या हुंडीत कोणीही गुप्तदान टाकू शकतो. हे दान कोणी टाकले आहे हे कळत नाही आणि टाकलेले दान कोणत्या मार्गाने कमावलेले होते याचाही काही पत्ता लागत नाही. मुळात हुडी ही कल्पनाच कोणीही आपला चोरीचा माल, चोरीचा पश्चात्ताप होत असेल तर, या हुंडीत टाकून पापातून मुक्त व्हावे अशी आहे. केवळ हुंडीच नाही तर विविध मंदिरात देणग्या देणारे कथित भक्त पैसा कमावताना केलेल्या पापाची शिक्षा होऊ नये याचसाठी देणग्या देत असतात. पैसा कमावताना पाप आणि काळा व्यवहार करावाच लागतो अशा भावनेने ते खोटेपणाने पैसा कमावतात पण ते पाप लागून आपल्याला काही होऊ नये म्हणून ते देवळांना देणग्या देत असतात. पापाचा आणि काळा पैसा मंदिरांनी घेऊच नये असा दंडक केला तर ते मंदिरालाही चालणार नाही.