
२जी स्पेक्ट्रम प्रकरणातले प्रमुख आरोपी ए. राजा यांनी विशेष न्यायालयात आपली जबानी नदवताना या प्रकरणात आताचे गृहमंत्री आणि तेव्हाचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनाही ओढले होते. २००७ साली या स्पेक्ट्रमचे परवाने ज्या पद्धतीने दिले त्या पद्धतीची माहिती चिदंबरम यांना होती, त्यांच्या परवानगीनेच ही पद्धत निश्चित करण्यात आली होती असे राजा यांनी सांगितले होते. अशा रितीने चुकीच्या पद्धतीने स्वस्तात परवाने घेणार्या कंपन्यांनी आपले परवाने अन्य कंपन्याना बाजारभावाने विकून बक्कळ पैसा कमावला. त्यांना परवाने देताना ते विकण्यास बंदी घालण्यात आली होती पण त्यांनी संबंधित नियमातून पळवाट काढली. आपण परवाने विकत नसून कंपनीच विकत आहोत असे सांगितले. नियमात, परवाने विकू नयेत असे म्हटले होते, कंपनी विकू नये असे म्हटले नव्हते. त्यांनी नियमांतून काढलेली ही पळवाटही चिदंबरम यांना माहीत होती आणि तशी ती काढली तरी मोठा नियम भंग होत नाही असा निर्वाळा चिदंबरम यांनी दिला असे राजा यांनी सांगितले होते. म्हणजे चिदंबरम हे २ जी स्पेक्ट्रम प्रकरणातले आरोपी होऊ शकतात असेच जणू राजा यांनी म्हटले होते.
