मोदींचे उपोषण

काही नेते फारच कल्पक आणि प्रतिभाशाली असतात. अशा नेत्यांत गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी यांचा समावेश करावा लागेल. तसे केन्द्रीय मंत्रिमंडळात पी. चिदंबरम वगैरे बुद्धीवान मंत्री आहेत पण त्यांच्यात परिस्थितीला नवे वळण देण्याची कल्पना राबवण्याची क्षमता नाही. मोदी यांनी ती क्षमता दाखवून देत कालपासून अहमदाबादेत तीन दिवसांचे उपोषण सुरू केले आहे. या उपोषणातून त्यांना नेमके काय साध्य करायचे आहे हे कोणी सांगू शकत नाही. पण सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या एका दिलासाजनक निर्णयाचा नेमका फायदा घेऊन आपली प्रतिमा सुधारून घेण्याचा आणि ही सारी स्थिती राजकीय संधीत रूपांतरित करण्याचा त्यांनी जो प्रयास आरंभिला आहे तो नक्कीच ‘काबिले तारीफ’ आहे. त्यातून त्यांना प्रयश्चित्त घ्यायचे आहे, त्यांना सद्भावना निर्माण करायची आहे वगैरे काहीही म्हटले जात असले तरीही प्रत्यक्षात त्यांना २०१२ सालची गुजरात विधानसभेची निवडणूक जिकायची आहे. त्यांचे हे उपोषण म्हणजे ती निवडणूक जिंकण्यासाठी टाकलेले एक निर्णायक पाऊल आहे.
    गुजरात विधानसभेची ही निवडणूक व्हायला अजून वर्ष आहे. तिच्यासोबत पंजाब आणि उत्तर प्रदेशातही विधानसभेची निवडणूक होणार आहे. या तिन्ही राज्यांच्या निवडणुका एकदमच होणार असल्या तरीही उत्तर प्रदेशात या निवडणुकीची नगारे आतापासून वाजायला लागले आहेत. खरे तर हे नगारे गेल्या सहा महिन्यांपासूनच वाजत आहेत पण त्या मानाने गुजरात या बाबतीत शांत होता. आता मात्र मोदी यांच्या उपोषणाने आणि त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या काँग्रेसच्या प्रति उपोषणाने गुजरात विधानसभा निवडणुकीचे नगारे वाजण्यास सुरूवात झाली आहे. नरेन्दा्र मोदी हे प्रसिद्धीचे झोत आपल्याकडे वळवून घेण्यात पटाईत आहेत. किबहुना ते राजकारणातले ते महत्त्वाचे कसबच असते. ते त्यांना अवगत आहे. ते असे काही तरी करतात की माध्यमांना त्याची दखल घ्यावीच लागते. काँग्रेसचे नेते मग त्यांच्या त्या कामाची नक्कल करीत त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतात पण त्याला फारसा  प्रतिसाद मिळत नाही. तसा प्रकार या उपोषणाच्या आणि प्रति उपोषणाच्या बाबतीत झाला आहे. हे उपोषण सुरू करण्याची युक्ती मोदी यांनी फार मोक्यावर केली आहे. त्यांना दिलासा देणारा सर्वोच्य न्यायालयाचा निर्णय हा तर एक मोका होताच पण याच वेळी मोदी आंतरराष्ट*ीय पातळीवरही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
     याच काळात अमेरिकी काँग्रेसच्या अभ्यास गटाने मोदी यांच्या बाबतीतला आपला अहवाल प्रसिद्ध केला. त्यात गुजरात हे सर्वात चांगले प्रशासन असलेले राज्य असल्याचे म्हटले होतेच पण २०१४ साली होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी हे भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असेही म्हटले होते. या सगळ्या गोष्टी  जमून येत असतानाच मोदी यांचा वाढदिवसही आला आणि त्यांनी ही उपोषणाची युक्ती केली. या उपोषणाला त्यांनी  सद्भावना उपोषण म्हटले आहे. त्यांना सद्भावनेची गरज निर्माण झाली आहे. कारण त्यांनी गुजरातला कितीही चांगले  प्रशासन दिले तरीही त्यांचे तिथे निवडून येणे हे याच एका  गोष्टीवरून ठरणार नाही. पूर्ण भारतातच ही वस्तुस्थिती दिसते. प्रशासनापेक्षाही राज्यातले जातीय समीकरण कसे  साधले जाते यावर राजकीय पक्षांच्या भवितव्याचा निर्णय होत असतो. तेव्हा मोदींना ज्या मुस्लिमांचा कट्टर शत्रू  ठरवण्यात आले आहे त्या मुस्लिमांना सोबत घेतल्या शिवाय  आपली नाव साबरमती पार जाणार नाही किवा नेमक्या संरक्षित शब्दात सांगायचे तर ती सुरळीत पार जाणार नाही हे मोदी यांनाही माहीत आहे. या मुस्लिम मतदारांना आकृष्ट करण्यासाठी सद्भावना हा शब्द फार उपयुक्त ठरणारा आह. ठरत आहे.
    मोदी यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या १३ वर्षांच्या कार्यकाळात २००२ साली मुस्लिम विरोधी दंगली घडवून आणल्या असे म्हटले जात असले तरी हा एक प्रकार वगळता त्यांनी मुस्लिम मते आकृष्ट करण्याचाच प्रयत्न प्राधान्याने केलेला दिसतो. गुजरातेत भाजपाची सरकार येण्यापूर्वी जातीय दंगली फार होत असत. अहमदाबादच्या कालुपूर वगैरे भागात तर आठवड्यातून तीन ते चार दिवस संचारबंदीच लागलेली असे. पण मोदी मुख्यमंत्री झाल्या पासून आणि भाजपाच्या २० वर्षांच्या कार्यकाळात  राज्यात एकदाही संचारबंदी लागू करावी लागलेली नाही. ही स्थिती  हिदू आणि मुस्लिम अशा दोघांनाही सुखावणारी आहे. २००२ साली काय व्हायचे ते झाले असेल पण आता जी शांतता आहे ती मुस्लिमांनाही हवीच आहे. राज्यात दंगली होणे काही निवडक हिदू आणि मुस्लिम यांनाच हवे असते. दोन्ही समाजातल्या  सर्वसामान्य माणसाला शांतताच हवी असते. हीच बाब मोदी या निमित्ताने वदवून घेत आहेत. गुजरातच नव्हे तर सार्‍या देशातच मुस्लिम मतदार भाजपा कडे आकृष्ट होणे ही बाब राजकारणात फार निर्णायक  ठरणारी आहे.  मोदी ही ऐतिहासिक कामगिरी आपल्या उपोषणातून घडवायला लागले आहेत. त्यांचा या मागचा हेतू राजकारणी आहे. पण तसा तो असण्यात चुकीचे काही नाही.