सुप्रिया सुळेंच्या राज्यातील स्त्री रोग व प्रसूतीतज्ञांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्त्वच्या निर्णयाबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य

पुणे दि.१६- राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील रेडिऑलॉजिस्ट, स्त्री रोग व प्रसूतीतज्ञांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात असून सुळे यांची ही कृती दुटप्पीपणाची असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सुळे यांनी बुधवारी या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पाटील व गृहमंत्री आर.आर. पाटील यांची भेट घेऊन राज्यात सोनोग्राफी सेंटर्स व गर्भपात केंद्रांवर सार्वजनिक आरोग्य विभागाततर्फे केल्या जात असलेल्या कारवाई विरोधात तक्रार करून यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. मात्र यामुळे अन्य राजकीय पक्षांप्रमाणेच खुद्द त्यांच्या पक्षातील वरीष्ठ नेतेही संभ्रमात पडले असून त्यांनी सुळे यांची ही कृती पक्षाला महागात पडेल अशी भीती व्यक्त केली आहे.
  सुप्रिया सुळे यांनी नुकतीच मुलगी वाचवा मोहिम हाती घेऊन स्त्रीपुरूष संख्येतील असमानता व स्त्रीभ्रूण हत्यांची वाढती प्रकरणे याबाबत जनजागरण करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील नायगांवपासून पदयात्राही केली होती.आता मात्र त्या रेडिओलॉजिस्ट व स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञांना पाठिबा दर्शवत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. एकीकडे स्त्रीभ्रूण हत्येच्या विरेाधात लढाई छेडायची व दुसरीकडे रेडिऑलॉजिस्टना पाठिबा द्यायचा म्हणजे आश्चर्यच असल्याचे मत वरीष्ठ काँग्रेस नेत्यानेही व्यक्त केले आहे.
   स्त्रीभ्रूण हत्या केसेस वाढण्यामध्ये सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची भूमिका किती मोठी आहे हे उघड सत्य असल्याचे मत सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की या केंद्रावर आवश्यक फार्म भरून घेतले जात नाहीत. अनेकदा डॉक्टर्स कोर्‍या फॉर्मवरही सह्या करतात. असल्या बेकायदा कृत्यांना आळा बसावा म्हणूनच सार्वजनिक आरोग्य विभागाला राज्यातील सोनोग्राफी सेंटर्स तसेच गर्भपात सेंटर्सवर छापे घालण्यास सांगण्यात आले आहे. असे गैरव्यवहार हेात असलेली सोनोग्राफी केंद्रांतील मशिन्स सील करण्यात आली असून ही संख्या अडीचशेच्या वर असून ही कारवाई गेल्या चार महिन्यात करण्यात आली आहे.
  सुप्रिया सुळे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन, रेडिओलॉजिस्ट व इमेजिग असोसिएशन व स्त्रीरोग व प्रसतीशास्त्रतज्ञ सोसायटी ऑफ इंडिया यांच्या प्रतिनिधींसह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सार्वजनिक आरोग्य विभाग या संघटनेच्या सदस्यांना निष्कारण त्रास देत असल्याचे सांगितले आहे. नोटीस बजावण्यापूर्वीच सोनोग्राफी यंत्रे सील केली जात असल्याचीही तक्रार त्यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना या प्रश्नात लक्ष घालू असे आश्वासन दिले असल्याचेही समजते.

Leave a Comment