पुण्याला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी येरवडा ते राळेगणसिद्धी अशा रॅली

पुणे दि.१६-भ्रष्टाचार विरेाधात भारततर्फे पुण्यात मोहिम हाती घेण्यात येत असून पुण्याला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी १८ सप्टेंबरला येरवडा ते राळेगणसिद्धी अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.दिल्लीत रामलिला मैदानावर अण्णांच्या जनलोकपाल आंदेालनासाठीच्या उपोषणापासूनच भ्रष्टाचार विरोधात भारत मोहिमेच्या सदस्यांनी शांततापूर्ण चळवळीत प्रत्यक्ष सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता असे समन्वयक बी.बी.सोमाणी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले की अण्णांच्या आंदोलनानंतर भ्रष्टाचार विरोधात भारतच्या पुढील योजना काय आहेत याची वारंवार विचारणा आमच्याकडे केली जात होती.त्यातूनच आता पुणे भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठीची चळवळ सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मी भ्रष्टाचार करणार नाही व करू देणार नाही असा मजकूर असलेली कार्डे वाटण्यात येणार आहेत तसेच पुणे मनपासह सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांना याच मजकुराची स्टीकर्स वाटण्यात येणार आहेत. जो कर्मचारी हे स्टीकर वापरण्यास नकार देईल त्याच्या घरासमोर आमचे कायकर्ते त्याने स्टीकर वापरण्यास मंजुरी देईपर्यंत दररोज भजन करणार आहेत.
त्याचबरोबर रोड शो, शाळा, महाविद्यालये, रोटरी क्लबसारख्या संस्थांतून जनजागरण मोहिमा राबविल्या जाणार आहेत. पुण्यात महापालिकांच्या निवडणूका अगदी तोंडावर आल्या आहेत. या काळातही स्थानिक नेत्यांसबंधीची माहिती आम्ही जनतेला देणार आहेात. अण्णांच्या आंदोलनादरम्यान आमच्याकडे जनतेकडून जो निधी गोळा झाला तो सुमारे पाच लाख सत्त्याऐशी हजार रूपये इतका होता. त्यातील तीन लाख तेरा हजार रूपये निदर्शने, रॅली यांच्यावर खर्च करण्यात आले असून उर्वरित रक्कम अरविद केजरीवाल यांच्या ट्रस्टकडे सूपूर्द करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment