सिव्हिल सोसायटीतील मधु लिमये: मेधा पाटकर

रामलीला मैदानावर अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी झालेल्या उपोषणाच्या प्रचंड मोठ्या प्रतिसादाच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून आता लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन आणि पुढील चार महिन्यात ज्या राज्यात विधानसभा निवडणुका आहेत तेथे अण्णा हजारे यांच्या लोकपालयात्रा काढण्याचे ठरविण्यात आले आहे. श्री अण्णा हजारे यांच्या महाराष्ट्रातील पुण्यापासून उत्तरेस सत्तर किमीवरील एका छोटयाशा खेड्यात अण्णाटीमची ही बैठक झाली. गेले काही दिवस राळेगणलाही रामलीलामैदानाचे स्वरुप आले आहे. अण्णांना बघणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांच्या समोर घोषणा देणे याचे जणू वेड लागलेल्यांचे लोंढेच्या लोंढे सध्या राळेगणयेथे सतत येत असतात. तेथे सध्या निरनिराळ्या वृत्तवाहिन्यांच्या पंचवीसहून अधिक ओबीव्हॅनचा मुक्कामच पडलेला असतो. देशातील प्रत्येक वाहिनी दररोज या विषयावर एक तासाच्या आसपास बातम्या देत असते आणि चर्चा घडवून आणत असते. सध्या या ठिकाणी ज्या पद्धतीने राष्ट्रीय पातळीवरील व्यक्ती आल्या होत्या त्याचे स्वरुप पाहता पाउणशे वर्षापूर्वी खानदेशात फैजपूरयेथे काँग्रेसचे जे अधिवेशन झाले होते त्याची आठवण झाल्याखेरीज रहात नाही. एकविसाव्या शतकात देशाला पुन्हा ग्रामीण भारताकडे नेणारा एक संन्यस्त आंदोलक पुन्हा एकदा बघण्याचे भाग्य देशाला लाभत आहे. अण्णांच्या प्रमाणेच ज्याना मॅगसेसे सन्मान मिळाला आहे असे अरविद केजरीवाल, न्यायपंडीत प्रशांत भूषण, आपल्या कर्तृत्वाने एक स्वतंत्र परिचय करून दिलेल्या किरण बेदी आणि नर्मदा आंदोलनाच्या मेधा पाटकर यांचा प्रामुख्याने त्यात समावेश होता. या बैठकीला स्वामी अग्निवेशही येण्याची शक्यता होती पण प्रत्यक्ष आंदोलन सुरु असतानाच त्यांचा जनलोकपालविधेयक निर्मितीतील खलनायक समजले जाणारे कपिल सिब्बल यांना सिव्हिलसोसायटीतील माहिती देणारे स्टिंग ऑपरेशन प्रकाशात आल्याने त्यानी आपणहूनच काढता पाय घेतला.
    या आंदोलनात सध्या एक गट कटाक्षाने एक गोष्ट करताना दिसत आहे. ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा या आंदोलनाशी संबंध येअू द्यायचा नाही. सध्या हे करण्यात मेधा पाटकर आघाडीवर आहेत. मेधा पाटकर यांच्याबाबत असे का वाटावे याची काही कारणे आहेत. राळेगणच्या या बैठकीला जाण्यासाठी श्रीमती किरण बेदी जेंव्हा पुण्यात आल्या तेंव्हा पत्रकारांशी बोलताना हा विषय निघाला. त्यात अडवाणीजी भ्रष्टाचारविरोधात यात्रा काढणार आहेत त्याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया विचारली तेंव्हा त्यांनी त्याचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, अण्णांची कार्यक्रमपत्रिका कोणीही राबवत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करू. भाजपच काय पण कोणतीही संघटना हे काम करत असेल तर चांगलेच आहे. त्यामुळे भ्रष्टाचार दूर होण्यास मदत होणार आहे. पण राळेगणला गेल्यानंतर मात्र मेधा पाटकर यांनी जी आक्रमक भूमिका घेतली त्यावर त्यांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. अरविद केसरीवाल यांनीही आजपर्यंत संघाचे कार्यकर्ते सहकार्य करत आहेत त्यात आक्षेपार्ह काय असे विचारले आहे. पण अग्निवेश यांनी पूर्वी संघाच्या येण्याला आक्षेप घेतला त्यावर तेही काही बोलले नाहीत. अण्णांचा यापूर्वी संघाच्या कार्यक्रमात अनेकवेळा सभभाग झाला आहे. परिवारातील काही शिबिरेही राळेगणयेथे झाली आहेत. अण्णांची एक भूमिका पूर्वीपासून आहे की या आंदोलनात कोणीही व्यक्तीगत पातळीवर येण्यास हरकत नाही पण संघटना म्हणून नको. तरीही कोणीही पाठिंबा दिल्यास त्याचे स्वागत होईल, असेही त्यांनी बोलून दाखविले आहे. अण्णांची भूमिका येवढीच दिसते की, आता कार्यनाश होईल अशा चर्चेला प्रतिसाद द्यायचा नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या विकासदृष्टीकोनाबद्दल त्यांनी प्रथम गौरवोद्गार काढले पण नंतर अग्निवेश आणि पाटकर यांनी त्याला आक्षेप घेतल्यावर आपला संदर्भ फक्त विकासकामापुरता होता असे स्पष्ट केले. पण अशा लोकांना अण्णा योग्यवेळी हटकतात असा अनुभव आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी हा प्रयत्न करून पाहिला आहे. संघ नको अशी या लोकांची भूमिका असायची. त्याबाबत अण्णाही काही बोलायचे नाहीत पण ही मंडळी जेंव्हा आंदोलनाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत तेंव्हा अण्णां त्यांची स्थिती ‘स्वामी अग्निवेश’ यांच्यासारखी करतात. डॉ बाबा आढाव, कै प्रा. ग प्र प्रधान, मोहन धारिया आणि महाराष्ट्रातील पन्नासहून अधिक व्यक्ती आणि संघटना यांचा हा अनुभव आहे.
    या आंदोलनात एक गोष्ट स्पष्ट आहे की, बेदी, केजरीवाल, प्रशांतभूषण यांची कोणाची सामाजिक संघटना नाही. जे थोडे संघटन आहे ते संस्थापातळीवरील आहे. मेधा पाटकर यांनी मात्र त्यांच्या जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय या संघटेतील निम्मी मंडळी बाहेर ठेवून काम करणे सुरु केले आहे. वास्तविक मेधा पाटकर यांनी आपल्या कामाशी शैली स्पष्ट केली आहे. गेली पंचवीस वर्षे त्या आंदोलनात आहेत त्यांचा कामाचा झपाटा मोठा आहे. नर्मदा आंदोलनात त्यानी ते दाखवून दिले आहे. आंदोलकांची बाजू घेण्याबाबत त्यांच्या भूमिकेशी दुमत असायचे कारण काही नाही पण एक गोष्ट खरी की, या देशाला धरणे किवा तत्सम विकास याची काही आवश्यकताच नाही. असे त्यांचे स्पष्ट मत आहे. अरुंधती रॉय यानी या आंदोलनातील ‘वंदे मातरम्’  व तिरंगा राष्ट्रध्वज वापरण्यावर आक्षेप घेतला होता. त्यांचे असे स्पष्ट मत होते की, वंदे मातरम् आणि राष्ट्रध्वज यांचा वापर झाला तर देश तुटेल असे विधान त्यांनी केले होते. बर्‍याच वेळा असे वाटू लागते की, मेधाबाई या टीम अण्णामधील अरुंधती आहेत आणि अरुंधती या बाहेरून टीका करणार्‍या मेधा पाटकर आहेत. या मंडळींची याबाबतची मते येवढी टोकाची आहेत की, उद्या अनेक संघटना एकत्र येअून जर भ्रष्टाचार विरोधातील आंदोलन यशस्वी केले तर त्यावेळी मेधा पाटकर यांची भूमिका बत्तीस वर्षापूर्वी जनता सरकारबाबत जी मधु लिमये याची जी भूमिका होती ती भूमिका त्या बजावतील. या देशात भ्रष्टाचारविरोधात सर्व राष्ट्रीय शक्ती एकत्र झाल्या पाहिजेत अशी देशातील कोट्यवधी जनतेची भूमिका आहे अर्थात मेधा पाटकर यांच्या या भूमिकेचा कॉग्रेसला आनंद वाटणे सहाजिक आहे.
    वास्तविक आता आवश्यकता आहे ती गेल्या साठ वर्षात देशाच्या प्रत्येक स्तरात खोलवर गेलेला भ्रष्टाचार हटविण्यासाठी सामान्य माणसाला काही प्रक्रिया देण्याची गरज आहे. सध्याचे जनलोकपाल कायदा झाला तरी समस्यांच्या संदर्भात अन्य न्यायालयात जेवढी प्रकरणांची संख्या निरुत्तरीत राहते त्याच्यापेक्षा या नव्या न्यायालयांची स्थिती निराळी होईल असे वाटत नाही, याचा अर्थ असा नव्हे की, जनलोकपालविधेयकाचा काही उपयोगच नाही ती तर माहितीच्या आधिकारानंतरची दुसरी फार मोठी क्रांती ठरणार आहे. पण आज माहिती अधिकारातील जी कामे पुढे येत आहेत ती व्यक्तिगत परिश्रमाचा भाग बनली आहेत. त्याऐवजी ‘नॅशनल इंस्टिट्यूट फॉर आरटीआय’ अशी स्थापन झाली तर त्याचे शिक्षणात रुपांतर होईल. गेल्या साठ वर्षात जी महागाई वाढली आहे ती केवळ शासकीय पातळीवरील भ्रष्टाचारामुळे वाढलेली नाही. सामान्य माणूस त्याचा अधिकप्रमाणात बळी असतो. पण केवळ दुकानदारांना दोष देअून काम भागणार नाही. साठेबाजी करणारा नेमका कसा पकडायचा यावर केवळ आंदोलन करून काही उपयोग होणार नाही. त्याचा व्यवस्थित अभ्यासक्रम हवा. भारताचे चारशे लक्ष कोटी रुपये आज स्वीस बॅकेत आहेत व ते तेथून हालण्यापूर्वी त्यावर टाच कशी आणायची यावर केवळ आंदोलनाचा उपयोग नाही. तो पैसा ज्यांच्याकडून हिसकावून घेअून तेथे पोहोचला आहे त्याना तो परत मिळवून देणारा तरुण वर्ग तयार व्हायचा असेल तर त्यासाठी तीन वर्षाचा अभ्यासक्रमच राबवला गेला पाहिजे. सर्व समविचारी आणि राष्ट*वादाचे ध्येय असलेल्या सार्‍या शक्ती एकत्र आल्या तर ते होईल व आजच्या वातावरणात ते शक्यही आहे पण जयप्रकाश नारायण यांचे संपूर्ण क्रांतीचे आंदोलन जसे मधु लिमये यांनीच पराभूत केले तशी पुनरावृत्ती होता कामा नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.
 – मोरेश्वर जोशी, पुणे

Leave a Comment