विकिलिक्सचा आगाऊपणा

गेल्या आठवड्यात विकिलिक्सने भारताच्या सुरक्षिततेविषयी एक गौप्यस्फोट केला आणि काल मायावती यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला. २६/११ च्या मुंबई स्फोटाचा अमेरिकेतला सूत्रधार हेडली याला भारतात आणून त्याच्यावर येथे खटला चालवण्याची संधी भारत सरकारला होती. त्यासाठी वातावरण अनुकूल होते पण भारत सरकारने हेडलीच्या प्रत्यार्पणासाठी आपण प्रयत्न करीत आहोत असा केवळ देखावा केला. भारत सरकारला हे प्रत्यार्पण नकोच आहे असे देशाचे सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांनी अमेरिकेच्या भारतातल्या वकिलाकडे म्हटले होते असे या विकिलिक्सच्या कथित स्फोटात म्हटले आहे. काल दुसरा गौप्यस्फोट करताना या संस्थेने उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री  मायावती यांना लक्ष्य केले. मायावती यांचे सहकारी आणि बसपाचे सरचिटणीस अॅड. सतीशचंद्र मिश्रा यांनी मायावती यांच्याबाबतीत या वकिलाकडे काही विधान केले. मायावती यांना पैसा खाण्याचे वेड आहे असे मिश्रा यांनी या वकिलाशी बोलताना म्हटले.

या वकिलाने ही गोष्ट आपल्या सरकारला कळवली आणि तिथे या कळवण्याची जी तार आली किवा संदेश आला तो विकिलिक्सने हस्तगत केला. तो आता जाहीर करून मोठा गौप्यस्फोट करीत असल्याचा आव आणला आहे. एकदाची हे विकिलिक्स काय प्रकरण आहे याचा आपल्याला शोध घ्यावा लागणार आहे तेव्हाच त्याच्या या गौप्यस्फोटाचे इंगित कळणार आहे. ज्युलीयस असांजे नावाचा एक ऑस्ट्रियन पत्रकार हे सारे उपद्व्याप करीत आहे. त्याने ही संस्था निर्माण केली आहे आणि मोठ्या हिकमतीने अमेरिकेच्या आणि अन्य काही प्रगत देशांच्या सरकारच्या ताब्यातील अशा काही गोपनीय बातम्या मिळवल्या. त्याच्याकडे सात ते आठ लाख अशा गोपनीय, खळबळजनक बातम्या असल्याचा त्याचा दावा आहे. राजकारण हा फार फसवा धंदा असतो. वरवर आपल्याला जे आणि जसे दिसते तसे ते खरेच असते असे नाही. त्याचे सत्य आणि वास्तव स्वरूप काही सरकारी कागदांत आणि संबंधित व्यक्तीच्या अंतःकरणात दडलेले असते. तिथून ते मिळवून लोकांसमोर मांडणे आणि खळबळ उडवून देणे हेच या असांजेचे काम आहे.

असांजने गतवर्षी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातली ढोंगे आणि सोंगे उघड करणार्‍या काही बातम्या फोडल्या आणि जगात खरोखरच खळबळ माजली. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण नेहमीच आपल्या स्वार्थावर आधारलेले असते आणि ते दुटप्पीपणाचे असते हे तर सार्‍या जगाला माहीत आहे पण, तो दुटप्पीपणा अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातल्या अस्सल कागदांच्या साहयाने आणि गोपनीय पत्रव्यवहाराच्या पुराव्यासह जाहीर झाल्याने लोकांना कौतुक वाटले. अमेरिकेनंतर विकिलिक्स ने भारताचा पिच्छा पुरवायचे ठरवले. भारतासंबंधीच्या काही अतीशय स्फोटक बातम्या आपल्याकडे असल्याचा त्याचा दावा होता. परदेशी बँकांत पैसा ठेवणार्‍या भारतीयांची यादी या बँकांनीच आपल्याला दिली आहे असाही दावा असांजे याने केला होता. भारतातल्या एका अग्रगण्य इंग्रजी दैनिकाने विकिलिक्सशी संफ साधला आणि या कथित खळबळजनक बातम्या या दैनिकांत क्रमाने प्रसिद्ध व्हायला सुरूवात केली. या बातम्या प्रसिद्ध होण्याचा क्रम कसा ठरला होता ? ती तारीख निहाय प्रसिद्ध होणार होती का? तसे काही ठरलेले दिसले नाही पण, भारतातल्या नामवंत  म्हणता येतील अशा नेत्यांचे चारित्र्य हनन होईल आणि समाजात त्यांच्या निष्ठेविषयी साशंकता निर्माण होऊन नेत्या नेत्यांत फूट पडेल अशा बातम्या प्राधान्याने प्रसिद्ध  केल्या गेल्या.

या बातम्या म्हणजे राहूल गांधी अमेरिकेच्या वकिलाशी काय बोलले ? अरुण जेटली यांनी अडवाणी यांच्याविषयी काय उद्गार काढले ? अशा होत्या. या अशा बातम्यांचे एक आश्चर्य वाटते की, अरुण जेटली अडवाणी विषयी अमेरिकेच्या वकिलाशी बोलताना काही तरी कशाला म्हणतील ? जेटलींना काय दुसरा कोणी मित्र नाही का ? असे अनेक लोक या अमेरिकेच्या वकिलाशी बोलतात तरी कशाला ? आणि बोलले तरी अशा फुसक्या गोष्टी हा वकील आपल्या सरकारला कशाला कळवतो? हा काय अमेरिकेच्या परराष्ट* नीतीचा भाग आहे का ? गंमतीचा भाग म्हणजे अरुण जेटली अडवाणींच्या विषयी काही तरी म्हणाले हे हा वकील आपल्या सरकारला कळवतो म्हणून खरे मानायचे का ? तो आपल्या सरकारला खरेच कळवत असेल का ? की भारतातले नेते आपल्याशी आपल्या मनातल्या गोष्टी बोलत असतात अशी बढाया मारत नसेल कशावरून ? गंमतीचा भाग असा की हा माणूस इंग्रजी बोलत असेल आणि आपले लोक आपल्या  खास इंग्रजीत बोलत असतील तर त्यांच्या संवादातून योग्य तो संदेश पोचत असेलच असे नाही. पण विकिलिक्स ने काही तरी जाहीर केले आहे याचा अर्थ ते खरेच आहे असे लोकांना वाटायला लागते आणि आपल्या देशातल्या  नेत्यांत तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. तशी ती होऊ  नये यासाठी काही खुलासा करण्याचीही सोय या विकिलिक्स च्या प्रकरणात नाही. तेव्हा विकिलिक्सच्या बातम्यांवरून आपले मत तयार करताना आपणही दहादा विचार केला पाहिजे.  

Leave a Comment