भाजपाला आणखी एक धक्का

कर्नाटकाचे मुख्यमंत्री येड्डीयुरप्पा यांना लोकायुक्तांचा दणका बसला आणि आता पाठोपाठ भाजपाचे तिथले आधारस्तंभ ठरलेले खाण सम्राट रेड्डी बंधू यांना सीबीआयचा दणका बसला आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे वगैरे म्हणणे एका परीने बरोबर आहे पण या लोकांचे व्यवहार सरळ असते तर त्यांच्यावर सीबीआयची कारवाई करण्याची सरकारला हिंमत झाली नसती. रेड्डी बंधूंना जर काळ्या मार्गाने पैसाच कमवायचा होता तर मग त्यांनी राजकारणाच्या भानगडीत पडायला नको होते. आता कारवाई झाल्यास ओरडून काही फायदा नाही. रेड्डी बंधूतील नंबर दोनचे बंधू गाली जनार्दन रेड्डी यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या धाडीत ३० किलो सोने आणि ३ कोटी रुपये नक्त सापडले आहेत. या कारणावरून त्यांना अटक झाली असेल तर त्यात विशेष काही नाही. घरामध्ये असे काही किलो सोने आणि काही कोटी रोख रक्कम अगदी बेकायदा रूपात  ठेवणारे लोक शेकड्यांनी सापडतील. त्यामुळे या कारवाईमध्ये ३० किलो सोने आणि ३ कोटी रुपये या गोष्टींना फार महत्व नाही.
    तरी सुद्धा रेड्डी बंधूंवर झालेली कारवाई ही स्वागतार्ह आहे. कारण  ही कारवाई म्हणजे भारतीय जनता पार्टीला बसलेली एक थप्पड आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीला कार्यकर्ते आणि नेते यांची जमवाजमव करायची असेल आणि हा लढा प्रखर करायचा असेल तर अशा भ्रष्टाचाराच्या खाणीमध्ये खोलपर्यंत गुंतलेल्या लोकांना जवळ करून भाजपाला चालणार नाही. ही गोष्ट भाजपाच्या नेत्यांच्या लक्षात येईल अशी अपेक्षा आहे.  जनार्दन रेड्डी त्यांचे मोठे भाऊ करुणाकर रेड्डी आणि अन्य काही नातेवाईकांनी गरिबीतून वर येण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय योजिले, काही उद्योग केले. मुळात ही सारी एका पोलीस कॉन्स्टेबलची मुले. त्यांनी आपल्या धडपड्या स्वभावानुसार जादा पैसे मिळविण्याची महत्वाकांक्षा बाळगली असेल तर त्यात काही चूक नाही. कारण श्रीमंत व्हावेसे कोणालाही वाटत असतेच. या बंधूंनी सुरुवातीच्या काळामध्ये चिट फंडाची योजना चालवली होती. परंतु २००० सालच्या दरम्यान त्यांच्या प्रतिभाशाली दृष्टीला बळ्ळारी जिल्ह्यातल्या लोखंडाच्या खाणी दिसल्या. पूर्वी गोव्यात लोह खाणीतल्या कच्च्या लोखंडाची निर्यात करून अनेक लोक श्रीमंत झालेले आहेत. परंतु त्या काळामध्ये लोखंडालाही किमत कमी होती आणि कच्चे लोखंड तर अडीचशे रुपये प्रती क्विंटल होते.
    पण चीन ही आर्थिक शक्ती वेगाने पुढे यायला लागली आणि चीनने जगभरातल्या लोह खाणीतील कच्चे लोखंड मोठ्या प्रमाणावर खरेदी करायला सुरुवात केली. त्यामुळे केवळ तीन वर्षात लोखंडाच्या किमती आठ पटींनी वाढल्या. त्यामुळे रेड्डी बंधूंना मालामाल होण्याची ही एक संधी आहे याचा साक्षात्कार झाला. त्यांनी प्रामाणिकपणे परवाने मिळवून मिळवलेल्या परवान्यानुसार उत्खनन करून योग्य त्या पद्धतीने पैसा कमावला असता तर काहीच हरकत नव्हती. परंतु या लोकांनी बेकायदा परवाने मिळवणे, परवान्यापेक्षा अधिक उत्खनन करणे, लाच देऊन सरकारी रॉयल्टी न देता खनिज नेणे अशा मार्गांनी अमाप पैसा कमावण्याची हाव बाळगली. त्यामुळे ते संकटात आले आहेत. रेड्डी बंधूंनी दादागिरीचा मार्ग पत्करला आणि त्यांना आंध्र प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा पाठींबा मिळाला. रेड्डी बंधूंचे साम्राज्य आणि वास्तव्य कर्नाटकात असले तरी बळ्ळारी जिल्हा हा कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेवर आहे. रेड्डी बंधू हे मुळात तेलुगू भाषिक आहेत. त्यामुळे त्यांचे आणि राजशेखर रेड्डी यांचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले. त्याचा फायदा घेऊन रेड्डी बंधूंनी आंध्र प्रदेशातील खाणींची कंत्राटे मिळवली आणि  कर्नाटकातल्या खाणींचेही उत्खनन सुरू केले.
    वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या मृत्युनंतर मात्र रेड्डी बंधू अडचणीत येत गेले आणि त्यांच्यावर आता चक्क तुरुंगात जाण्याची पाळी आली आहे. रेड्डी बंधूंनी आपल्या व्यवसायाची सुरुवात दहा लाख रुपयांच्या भांडवलावर केली आणि तीन वर्षांमध्ये २० कोटी रुपये मिळवले. त्याचबरोबर त्यांची उलाढाल केवळ पाच वर्षात तीन हजार कोटी रुपये एवढी झाली. दरम्यानच्या काळात त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी केल्या गेल्या. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची दखल घेतली आणि रेड्डी बंधूंच्या या साम्राज्याची चौकशी झाली. या भागामध्ये या बंधूंनी घातलेला हैदोस बघून सर्वोच्च न्यायालयाने बळ्ळारी जिल्ह्यातले उत्खनन पूर्णपणे बंद करण्याचा आदेश दिला. शिवाय कर्नाटकाचे लोकायुक्त न्या. संतोष हेगडे यांनीही या सार्‍या प्रकरणाची चौकशी करून रेड्डी बंधूंची काळी कारस्थाने उघडकीस आणली. आजवर कर्नाटकामध्ये सत्ता टिकविण्यासाठी भाजपाला ज्या ज्यावेळी पैशाची गरज भासली तेव्हा तेव्हा ती गरज रेड्डी बंधूंनी पूर्ण केलेली होती. त्यामुळे त्यांना आता मंत्रिमंडळात घेतले नसले तरी रेड्डी बंधूंच्या पापामध्ये असलेला भाजपाचा वाटा भाजपाला नाकारता येणार नाही. रेड्डी बंधूंवरची कारवाई जाणीवपूर्वक केलेली आहे, त्यात राजकारण आहे असे कितीही म्हटले तरी मुळात रेड्डी बंधू भ्रष्ट आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

Leave a Comment