पंतप्रधान बांग्लादेश दौर्‍यावर रवाना

दिल्ली दि.६ सप्टेंबर – पंतप्रधान मनमोहन सिग मंगळवारी दोन दिवसांच्या बांग्लादेश दौर्‍यावर मंगळवारी सकाळी  रवाना झाले. या भेटीमध्ये गुन्हेगार हस्तांतरण, उर्जा, सीमा नियंत्रण आणि सुरक्षा अशा विविध विषया संदर्भात चर्चा करणार  आहेत.

बांग्लादेश आणि भारतादरम्यान या भेटीमध्ये दीर्घ मुदतीचा मैत्री करार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १९ मार्च, १९७२ मध्ये बांग्लादेश आणि भारतामध्ये २५ वर्षांचा मैत्री करार झाला होता. या कराराची मुदत १९९७ मध्ये संपली. या कराराचे पुनरूज्जीवन होण्याची शक्यता दोन्ही बाजूंनी फेटाळून लावली आहे. दोन देशांमधील संबंधांमधील आता महत्त्वपूर्ण असणार्‍या बाबी लक्षात घेउन पुन्हा नवीन करार केला जाणार आहे. सुरक्षा, सीमावर्ती घुसखोरी, व्यापार, उर्जा आणि आर्थिक सहकार्य हे या भेटीदरम्यानचे महत्त्वपूर्ण मुद्दे राहणार असल्याचे पंतप्रधान मनमोहन सिग यांनी सांगितले. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीन यांच्यासह पंतप्रधान मनमोहन सिग विरोधी पक्ष नेत्या बेगम खलिदा झिया, जातीय पक्षप्रमुख मुहम्मद इर्शाद यांचीही भेट घेणार आहेत. मुहम्मद इर्शाद हे माजी सैन्यप्रमुख आहेत.

तिस्ता नदीचे पाणी वाटून घेण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण कराराबाबत संदिग्धता असल्याचे सांगितले जाते. या करारामधील तरतूदींना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. याचा निषेध म्हणून या दौर्‍यावर यायचे बॅनर्जी यांनी टाळले आहे.चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमिवर बांग्लादेशसह दक्षिण आशियामधील इतर सर्व शेजार्‍यांशी संबंध सुधारणे भारताच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.