दिल्ली हाय कोर्टबाहेरील स्फोटात ९ ठार,५० जख्मी

नवी दिल्ली- बुधवारी सकाळी दिल्ली हायकोर्टाबाहेर झालेल्या स्फोटात ९ ठार झाले असून ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास दिल्ली हायकोर्टाच्या पाच नंबर गेटजवळ मोकळ्या जागेत हा स्फोट झाला.जखमींना राम मनोहर लोहिया रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी हा संपूर्ण परिसर रिकामा केला असून या भागाची नाकाबंदी केली आहे.

दहशतवाद्यांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एका वकिलाच्या मोटारीच्या पुढील चाकाखाली हा कमी क्षमतेचा क्रूड बाँब ठेवला होता असे वृत्तांचे म्हणणे आहे.न्यायालयाच्या अनियंत्रित भागात हा बाँबस्फोट झाला. हा बाँब एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवण्यात आला होता. दिल्लीचे पोलिस आयुक्त बी. के. गुप्ता आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे.

नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या (एनएसजी) बाँबशोधक पथकाने स्फोट झालेल्या ठिकाणी आणखी पुरावे मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. बाँबस्फोटाच्या ठिकाणी सापडलेले खिळे, प्लॅस्टिकची पिशवी आणि स्फोटकासाठी वापरण्यात आलेली पूड, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे, असे धर्मेंद्रकुमार यांनी सांगितले.

नागरीकांनी या भागात गर्दी करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.