भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

पंढरपूर दि.०६ सप्टेंबर- उजनी व वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूर तालुक्यातील ४३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पंढरपूर शहरातील झोपडपट्टीत पाणी शिरल्यामुळे २५ कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. महसुल विभागातील वरिष्ठ व कनिष्ठ कर्मचार्‍यांमध्ये समन्वय नसल्याने माहिती मिळण्यास नागरिकांना अडचण होत आहे.
गेल्या चार दिवसांपासून राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट*ातील धरणे भरून वाहत आहेत . दौंड येथून उजनी धरणामध्ये १ लाख ३८ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे . त्यामुळे उजनी धरणातून ९० हजार क्युसेक्स तर वीर धरणातून ४२ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत  आहे. उजनी धरण ंशंभर टक्के  भरले असल्याने पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहे. उजनीतून ९० हजार क्युसेक्स पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे. रात्री  पाण्याचा विसर्ग १ लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या ४३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भीमा नदीने पंढरपूर शहरात धोक्याची पातळी ओलांडली आहे.नगरपरिषदेचे कर्मचारी नागरिकांना सुचना देवून सामान हलविण्यासाठी मदत करीत आहेत. ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक नागरिकांना सुचना देत आहेत.

  महसुल अधिकार्‍यात समन्वय नाही
उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. उजनी येथून किती पाणी सोडण्यात येणार याबाबत माहिती विचारण्यासाठी नागरिक महसुल विभागातील अधिकार्‍यांना भ्रमणध्वनी वरून संफ साधत आहेत. मात्र अधिकारी भ्रमणध्वनी उचलत नाहीत. वरिष्ठ व कनिष्ठ अधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Leave a Comment