पाच हजार रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू – मुख्य सचिव

मुंबई दि.०६ सप्टेंबर- राज्य शासकीय सेवेतील चार हजार नऊशे रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून मार्च २०१२ पर्यंत ही पदे भरण्यात येतील असे राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी सोमवारी सांगितले.
राज्य कर्मचा-यांच्या अ आणि ब वर्गातील एकूण दहा हजार रिक्त पदांपैकी पाच हजार ८०० पदे यापूर्वीच भरण्यात आली आहेत. दरम्यान, भर्ती करावयाच्या पदांमध्ये ७०० ची वाढ झाल्याने रिक्त पदांची एकूण संख्या आता चार हजार नऊशे झाली आहे. ही पदे भरण्यासंबंधीचा निर्णय शासनाने दोन ऑगस्ट २०११ ला घेतला आहे अशी माहितीही मुख्य सचिवांनी यावेळी दिली.
पोलीस दलातील चार हजार २०० उपनिरीक्षकांच्या रिक्त पदांपैकी १२९५ पदे भरली आहेत. उरलेली पदे मार्च २०१२ पर्यंत भरण्यात येतील. ही सर्व रिक्त पदे भरल्यामुळे शासनाच्या तिजोरीवर सुमारे ५०० कोटी रूपयांचा जादा भार पडणार असल्याचेही मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Comment