मुंबई दि.०५ सप्टेंबर- शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना मागावर्गीय आणि दुर्बल घटकांचा कळवळा आला आहे. अलिकडेच राष्ट*वादी काँग्रेसने मागासवर्गियांची सनद जाहीर केल्याने त्यावर कुरघोडी करण्यासाठी काँग्रेस पक्षाने १०५ कलमी कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी पक्षाने २५ सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी गांधीभवनमध्ये यासंदर्भात झालेल्या बैठकीस मंत्री डॉ. पतंगराव कदम, शिवाजीराव मोघे, वर्षा गायकवाड, नसीम खान यांच्यासह निवडक पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रसलाही मागासवर्गियांचा कळवळा,१०५ कलमी जंबो कार्यक्रम तयार
काँग्रेसने येत्या २५ सप्टेंबर रोजी चेंबूर येथील सोमैया मैदानावर समाजातील दुर्बल घटकांचा मेळावा आयोजिला असून या मेळाव्यात त्यांच्या उद्धाराचा १०५ कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. हा विभागीय मेळावा मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांसाठी असून विदर्भ-मराठवाडयातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याची तारीख नंतर घोषित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
