मिहान जमिन अधिग्रहणाला शेतकर्‍यांचा विरोध

नागपूर दि.३ सप्टेंबर-  मिहान प्रकल्पातील विमानतळाच्या  प्रस्तावित धावपट्टीसाठी करण्यात येणार्‍या जमिन अधिग्रहणाला जमळा, भामिटी आणि शिवणगाव येथील शेतकर्‍यांनी तीव्र विरोध केला आहे. आम्हाला मिहानशी नव्हे तर थेट मुख्यमंत्र्याशी  बोलायचे आहे, असा पवित्रा  संतप्त शेतकर्‍यांनी घेतला आहे.

मिहान प्रकल्पातील विमानतळाच्या धावपट्टीसाठी जमिन अधिग्रहणाचे काम  सुरू आहे. त्यामुळे जमळा, भामिटी आणि शिवणगावच्या शेतकर्‍यांना जमिन अधिग्रहणाच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मिहानच्या धावपट्टीचे कामकाज काही वर्षांनी सुरू होणार असल्याने त्यावेळी  जमिन अधिग्रहीत करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे प्रती हेक्टर १ कोटी २० लाख रुपये दर देण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. मात्र शेतकर्‍यांनी तो फेटाळून लावला आहे. मिहानसाठी जमिन अधिग्रहण केलेल्या इतर जमिनीसाठी  सरकारने दिलेल्या प्रस्तावित दरापेक्षा हे दर जास्त असून भविष्यात ते  आणखी वाढण्याची शक्यता  वर्तविण्यात येत आहे.  त्यामुळे शेतकरी जमिन अधिग्रहणाला विरोध करीत असल्याचे समजते.

Leave a Comment