अण्णांना घेरण्याचा डाव

केंद्र सरकारमध्ये बसलेले मंत्री आणि त्यांचे सल्लागार हे सुमार कुवतीचे आहेत आणि त्यांना जनतेचे मत कळत नाही हे तर लक्षात आले आहेच.परंतु इतिहासा पासून काही शिकून योग्य पावले टाकली पाहिजेत एवढे सुद्धा तारतम्य त्यांना राहिलेले नाही आणि ज्याच्या विचाराला काही तत्वज्ञानाचा आधार आहे असा एकही नेता केंद्रात सध्या उरलेला नाही, हे जास्त प्रकर्षाने लक्षात यायला लागलेले आहे. अण्णांचे उपोषण संपले आणि सरकारने अण्णांच्या मागण्या तत्वतः मान्य केल्या. इथे या संघर्षाचे एक पर्व संपलेले आहे. परंतु या पर्वापासून हे नेते काही धडा घ्यायला तयार नाहीत. अण्णांना हे लोक आपला शत्रू समजायला लागले आहेत. ही आपली एक ऐतिहासिक चूक ठरणार आहे एवढी दूरवरची दृष्टी असणारा कोणी नेता या पक्षात नसल्यामुळे हे नेते अण्णाविषयीचे वितुष्ट आणि वैर वाढवत चाललेले आहेत. अण्णांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या हा आपला पराभव आहे आणि या पराभवाचा बदला घेतला पाहिजे या भावनेने हे सरकार काही चुकीची पावले टाकायला लागले आहे.
    अशाच प्रकारच्या चुका इंदिरा गांधी यांनी १९७३ ते १९७८ या काळामध्ये केल्या होत्या आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले होते. हा सारा इतिहास जाणतेपणाने पाहिलेले आणि अनुभवलेले अनेक लोक अजूनही काँग्रेस मध्ये आहेत, परंतु ते लोक सुद्धा अण्णा हजारे यांच्या द्वेषाने आंधळे झालेले आहेत. इंदिरा गांधी यांनी १९७५ पासून ७७ पर्यंत देशावर आणीबाणीचा वरवंटा फिरवला. त्यामुळे जनता खूप चिडलेली होती. परंतु इंदिरा गांधी आणि त्यांच्या भोवती जमलेली चांडाळ चौकडी जनतेचा आवाज ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. आपल्या आणीबाणीमुळे देशाला शिस्त लागली आहे, असा त्यांना भ्रम झाला होता. या वातावरणाचा फायदा घेऊन निवडणुका घ्याव्यात आणि लोकशाहीतून निवडून आलेले सरकार अशी आपली प्रतिमा निर्माण करावी, असा विचार त्यांनी केला. त्यांना गुप्तचर संघटनांना देशातल्या वातावरणाचा अंदाज घेण्याचा आदेश दिला. त्यांनी सुद्धा आता निवडणुका घेतल्या तर काँग्रेसला ४५० जागा मिळतील, असा अहवाल सादर केला. त्यामुळे इंदिरा गांधींनी अचानकपणे निवडणुका जाहीर केल्या आणि त्यांना केवळ १५० जागा मिळाल्या. गुप्तचर संघटनांना परिस्थितीचा खरा अंदाज होता, परंतु त्यांना इंदिरा गांधींची जाणूनबुजून दिशाभूल केली.
    आताही नेमका हाच प्रकार घडत आहे. अण्णा हजारे यांना देशातून काहीही पाठींबा मिळालेला नाही, जो काही मिळाला आहे तो वृत्तवाहिन्यांमुळे मिळालेला आहे आणि आंदोलनाचे हे वारे ओसरले की अण्णांच्या मागचा पाठींबा आपोआप कमी होऊन जाईल. तेव्हा अण्णांना फार किमत न देता त्यांना त्रस्त करावे, असा सल्ला सरकारला कोणीतरी देत आहे आणि गुप्तचर खात्यातले काही अधिकारी अण्णांच्या विरोधातली कारवाई सरकारवर बूमरँग सारखी उलटावी असा मुद्दाम प्रयत्न करत आहेत. अण्णांच्या जीवाला धोका आहे, असा एक अहवाल या गुप्तचर संघटनांनी तयार केलेला आहे. तो पूर्णपणे बनावट आहे. परंतु त्याच्या आधारे अण्णांना आता झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था सरकारतफर्े प्रदान करण्यात आली आहे. गमतीचा भाग असा की, अण्णांनी अशा प्रकारच्या सुरक्षा व्यवस्थेची मागणी केलेली नाही. सरकारने ही सुरक्षा व्यवस्था दिली तेव्हा सुद्धा अण्णांनी ती नाकारलेली आहे. आपल्या जीवाला कसलाही धोका नाही, असे म्हणून त्यांनीही सुरक्षा व्यवस्था धुडकावून लावली आहे. आपण जीवाला घाबरतच नाही, त्यामुळे आपल्याला सुरक्षा व्यवस्थेची गरजच नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सरकारला बजावले आहे.
    या बळजबरीने लादलेल्या सुरक्षा व्यवस्थेमागे अण्णांची सुरक्षा हा हेतू मुळात नाहीच. केंद्र सरकारमध्ये बसलेल्या काही कलुषित बुद्धीच्या मंत्र्यांचे हे कारस्थान आहे. त्यामागचे खरे हेतू दोन आहेत. पहिला म्हणजे एकदा अण्णांना झेड दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत बंद करून टाकले की, अण्णांच्या हालचाली, प्रवास, सभा, बैठका आणि दौरे यांच्यावर आपोआपच नियंत्रण येईल. अण्णा आणि जनता यांच्यातील अंतर वाढेल आणि अण्णांच्या आंदोलनाची धार कमी होईल, हा या जबरदस्तीच्या सुरक्षा व्यवस्थेचा हेतू आहे. दुसरा एक हेतू फार कुटील स्वरूपाचा आहे. अण्णांच्या हालचाली, त्यांचा संवाद, चर्चा यावर लक्ष ठेवणे हा तो हेतू होय. यातून दोन गोष्टी साध्य करायच्या आहेत. अण्णा कोणाशी काय बोलतात आणि आंदोलनाची आखणी कशी करतात, यावर नजर ठेवता येते आणि ते आंदोलन हाणून पाडण्यासाठी सरकारला आगाऊ हालचाली करता येतात. त्याशिवाय अण्णांचा कोणत्या संघटनांशी संबंध येतो यावर बारकाईने लक्ष ठेवून त्यांचे आंदोलन प्रायोजित आहे अशी हाकाटी करून त्यांना बदनाम करता येते. मात्र अशा छुप्या हेतूने सुरक्षा व्यवस्थेच्या नावाखाली अण्णांना छळण्याचा जो उद्योग सुरू आहे तो लोकांना कळत नाही असे केंद्र सरकारच्या सल्लागारांना वाटते. तोच नेमका त्यांचा भ्रम आहे आणि हाच भ्रम काँग्रेसला महागात पडणार आहे.

Leave a Comment