
पुणे दि.३१- अण्णांची राळेगणसिद्धी दिल्लीचे रामलिला हेाऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने आत्तापासूनच काळजी घेण्यास सुरवात केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.दिल्लीतील रामलिलावर यशस्वी आंदोलन छेडणारे अण्णा पुढील आठवड्यात कधीतरी राळेगणसिद्धीला परतण्याची शक्यता आहे. अण्णांच्या भोवतीचे कार्यकर्ते जनलोकपाल आंदोलन जिवंत ठेवण्यासाठी सतत कांही ना कांही कार्यक्रम सुरूच ठेवणार आहेत. त्यात चर्चा,बैठका यांचा समावेश आहेच. त्यामुळे सरकारने अण्णांशी संवाद साधू शकणार्या वरीष्ठ प्रशासकीय अधिकार्यांची एक यादी तयार केलीच आहे, त्याचबरोबर सुरक्षेचा उपाय म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर अण्णांशी संवादाचे सर्व मार्ग खुले राहतील हे पाहण्याची जबाबदारीही सोपविली आहे. या दोन्ही काँग्रेसच्या मंत्र्यांचे अण्णांशी नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहेत. केंद्रात जे घडले ते येथे घडू नये यासाठी सरकार सर्वतोपरी काळजी घेत असून महाराष्ट्रत सत्ताधारी पक्षाच्या भ्रष्टाचारांचे आणखी कांही मुद्दे उपस्थित झालेच तर त्यावर चर्चेने उपाय काढण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत हे मुद्दे आंदोलनाचा विषय बनणार नाहीत यासाठी जागरूकतेने काम करण्याचे सरकारने ठरविले आहे असेही अंतर्गत वर्तुळातून समजते.
अण्णा राळेगणला परतल्यानंतर सरकारातील सर्व वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि राष्ट्रवादी व काँग्रेसचे वरीष्ठ मंत्री अण्णांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी त्यांच्याशी संफ साधणार आहेतच पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अण्णा कोणत्याही कारणांनी नाराज होणार नाहीत याची काळजी घेणार आहेत असेही समजते. विधानसभेत विरोधी पक्ष भाजप आणि शिवसेना भ्रष्टाचाराचे मुद्दे पुन्हा पुन्हा उकरून काढतील आणि अण्णांना त्याबाबत भरीला घालतील अशीही शक्यता आहेच कारण स्थानिक संस्थांच्या निवडणूका आता अगदी तोंडावर आल्या आहेत ही बाबही सरकारने विशेष लक्षात घेतली आहे.
काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना प्रशासकीय अनागोंदी गंभीरपणे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका असेही बजावण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांविरोधात विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात विरोधक अधिक आक्रमक होण्याची दाट शक्यता राष्ट्रवादीच्याच राजकीय सल्लागारांनी व्यक्त केली आहे.
