वेबसाईटवर मालमत्ता जाहीर करणारे पहिले पोलीस अधिकारी पुण्यात

पुणे दि.३०-अण्णांच्या भ्रष्टाचारविरेाधी आंदोलनाने देश व्यापला असतानाच भ्रष्टाचाराचे आगार म्हणून ओळखल्या जात असलेल्या पोलिस दलातील पोलिस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी आपली स्थावर मालमत्ता सामाजिक साईट असलेल्या फेसबुकवर प्रसिद्ध करून पारदर्शीपणाचा आगळाच आदर्श घालून दिला आहे. पुण्यातील गुन्हा अन्वेषण विभागाच्या सामाजिक सुरक्षा विभागात बर्गे कार्यरत आहेत.
   काहीं दिवसांपूर्वीच राज्य शासनाने एक अध्यादेश जारी करून त्यात राज्यातील आयपीएस अधिकार्‍यांनी आपली मालमत्ता ऑनलाईन जाहीर करावी असे आदेश दिले होते. पोलिस दलावर सध्या भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, परस्परातील हेवेदावे, पोलिसांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध यावरून सर्वच थरांतून टिकेची झोड उठते आहे. अशा वेळी स्वतःहूनच आपली मालमत्ता फेसबुकवर जाहीर करून भानुप्रताप यांनी पोलिस दलाची ही प्रतिमा थोडी उजळण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हणावयास हरकत नाही. पोलिस दलात कांही चांगले अधिकारीही आहेत असा दिलासा त्यामुळे नागरिकांना नक्कीच मिळू शकणार आहे.
  भानुप्रताप बर्गे यांच्या करिअरचा आलेख नेहमीच चढता राहिलेला आहे.१९८५च्या लोखंडवाला शूटआउट प्रकरणातही त्यांचा सहभाग होताच तसेच शिख अतिरेक्यांना तुरूंगात डांबण्याचे कामही त्यांनी केले आहे. चार पाकिस्तानी हेरांना पुण्यात अटक करण्याची कारवाई त्यांच्यानावावर असून त्यांना नुकतेच राष्ट*पती पदकही प्राप्त झाले आहे.
  भानुप्रताप यांनी जाहीर केलेल्या मालमत्तेनुसार त्यांच्या नांवावर स्वतःचे घर नाही मात्र बँकेत ५लाख६९ हजार९१९ रूपयांच्या ठेवी आणि साधारण ९० हजारांची रेाख रक्कम आहे. त्यांच्याकडे ९० तोळे सोने असून त्यातील ५० तोळे वारसाहक्काने तर २० तोळे वडिलांकडून मिळालेले आहे. त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्या नांवावर घरे आहेत पण ती त्यांच्या स्वतंत्र मिळकतीतून बांधलेली असून हे दोघेही नियमितपणे आयकर विवरणपत्रे सादर करतात. या मालमत्तेसाठी भानुप्रताप यांनी त्यांच्या कमाईतील पैसे दिलेले नाहीत. वडिलांचे मे २०११ मध्ये निधन झाले असून त्यांच्या मृत्यूपत्राप्रमाणे स्थावर मालमत्तेचा कांही भाग त्यांना मिळण्याची शक्यता असून तो मिळताच त्याचीही माहिती फेसबुकवर जाहीर केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment