
नागपूर दि.३० ऑगस्ट-श्रावणातील अमावस्या म्हणजे पोळ्याचा सण.या सणाचा दुसरा दिवस म्हणजेच पोळ्याची कर हा दिवस विदर्भात मारबतीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आषाढ आणि श्रावण हे दोन पावसाचे महिने असल्यामुळे पाऊस, चिखल त्यामुळे होणारी घाण या सर्वच बाबींमुळे माश्या, डास, पावसाळी किटक आणि त्यामुळे होणारी रोगराई मोठ्या प्रमाणात असते. ही सर्व घाण आता श्रावण संपल्यामुळे घेऊन जावी या भावनेतून हा मारबतीचा सण साजरा केला जातो. श्रावण अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या प्रत्येक दरवाज्यात पळसाच्या झाडाच्या फांद्या ठेवल्या जातात. दिवसभर या डहाळ्या अशाच ठेवल्या जातात. पोळ्याच्या करीच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी या डहाळ्यांनी घर आणि घराभोवतीचा परिसर झाडला जातो. आणि मग हा कचरा आणि पळसाच्या फांद्या एकत्र करून गावाबाहेर नेऊन जाळल्या जातात. यावेळी या काडी कचर्याला पायातल्या वाहाणेने (चपलेने) झोडपले जाते आणि यावेळी माश्या मुरकुटे, रोगराई, काडीकचरा घेऊन जाय गे मारबत असे ओरडत हा कचरा जाळला जातो. हा कचरा चपला मारवत न्यायची प्रथा असल्यामुळे या मारवतचेच पुढे मारबत असे रूपांतर झाले असल्याचे अभ्यासक सांगतात. अनेक शतकांपासून वर्हाडात ही परंपरा सुरू आहे.
सुमारे १३१ वर्षापूर्वी भारतात इंग्रजांचे राज्य होते. त्यावेळी नागपुरात असलेल्या नागपूरकर भोसलेंचे राज्य इंग्रजांना ताब्यात घ्यायचे होते. मात्र ते शक्य होत नव्हते. तोडा आणि फोडा या नीतीने काम करणार्या इंग्रजांनी भोसले कुटुंबातली एक दुखावलेली विधवा बाकाबाई भोसले हिला जवळ केले. तिच्या मदतीने इंग्रज नागपूरात शिरले आणि त्यांनी भोसलेंचे संस्थान खालसा करविले. बाकाबाईंची राहण्याची व्यवस्था इंग्रजांनी भोसल्यांच्या जुन्या महालासमोरील कोतवाली या इमारतीत केली. (सध्या या इमारतीत नागपूरचे कोतवाली पोलिस ठाणे आहे.)
बाकाबाईच्या या कृत्याबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता. पण इंग्रजांच्या दहशतीमुळे हा संताप व्यत्त* करता येत नव्हता. त्यामुळे त्या वर्षीच्या मारबतीला नागरिकांनी बाकाबाईचे पुतळे तयार करून गावातून मिरवत नेण्याचे ठरविले. यातील पिवळी मारबत नामक पुतळा हा बाकाबाईचीच प्रतिकृती होती. सध्याच्या इतवारी परिसरातून हे पुतळे मिरवत कोतवालीसमोर आणले. त्याठिकाणी बाकाबाईची प्रतिकृती असलेल्या पिवळ्या मारबतीला भरपूर झोडपले आणि नंतर सर्व मारबतींचे पुतळे येथून सुमारे १ किलोमीटर अंतर असलेल्या काशीबाईचे देऊळ या भोसल्यांच्या परंपरागत स्मशानभूमीत नेऊन जाळले. तेव्हापासून दरवर्षी नागपूर शहरात मारबतीच्या दिवशी असे पुतळे जाळण्याची परंपरा सुरू झाली. बाकाबाई जिवंत असेपर्यंत दरवर्षी याच पद्धतीने तिच्यावरचा संताप व्यत्त* होत राहिला. नंतरही ही परंपरा सुरूच राहिली. आजही सामाजिक अपप्रवृत्तींवर टिका करणार्या मारबती आणि बडगे या दिवशी काढले जातात. इतवारीतून निघणार्या या मिरवणूका महाल परिसरातून फिरून कोतवालीसमोर येतात. त्यानंतर तिथून गांधीगेट, टिळक पुतळा, शुक्रवार तलाव अशा मार्गाने काशीबाईचे देऊळ परिसरात त्यांचे विसर्जन होते.
सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार करणार्या या पुतळ्यांमध्ये कालानुरूप बदल झाले असले तरी संताप व्यत्त* करणे ही प्रवृत्ती मात्र कायम राहिलेली आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात इंग्रजांवर टीका करणार्या पुतळ्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात १९६२ आणि १९६५ च्या युद्धाच्या वेळी चीन आणि पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्याही मारबती नागपूरात निघाल्या. आणीबाणीत नागरिकांनी आपला संताप व्यत्त* करण्यासाठी चोरुन लपून का होईना मारबतीचा उपयोग केलाच. वाढती महागाई, पेट*ोल, डिझेलची टंचाई, विदर्भावरचा अन्याय असे विविध विषय मारबतीच्या निमित्ताने आजवर हाताळले गेले. यंदाही पोळ्याच्या करीला म्हणजेच तान्या पोळ्याच्या दिवशी मारबत आणि बडग्यांच्या मिरवणुका उत्साहात निघाल्या. गांधीबाग इतवारी परिसरातून निघालेल्या या मिरवणुका तिरंगा चौक, बडकस चौक, केळीबाग रोड मार्गे कोतवाली पोलिस स्टेशनसमोर आल्या¬. यात परंपरागत काळी मारबत आणि पिवळी मारबत या अग्रभागी होत्या. भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारेंचे झालेले आंदोलन हा विषय ताजा असल्यामुळे त्याची छाया मारबतीवर पडणे साहाजिकच होते.
अण्णांच्या विरोधात गरळ ओकणारे कपिल सिब्बल, मनीष तिवारी, भ्रष्टाचार शिरोमणी सुरेश कलमाडी, ए राजा इत्यादींचे बडगे लोकांनी अक्षरशः चपला आणि झाडूंनी बडवत नेले. काळी आणि पिवळी मारबत या देशातील भ्रष्टाचाराची सर्व प्रतिके दाखविणार्या होत्या. अण्णा हजारे यांची छायाचित्र असणारे आणि भ्रष्टाचार विरोधात घोषणा दर्शविणारे फलकही या मिरवणुकांमध्ये होते. परंपरागत गोंडी बाजा या वाद्यांसोबत संदल आणि डिजे यांच्या तालावर बेधुंद नाचत आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात घोषणा देत निघालेल्या या मिरवणुकांनी नागपूर शहर दणाणून सोडले.
भारताचे हृदयस्थान असलेले नागपूर शहर हे क्रांतीचा संदेश देणारे शहर म्हणून ओळखले जाते. या शहरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितोद्धारासाठी धर्मपरिवर्तन करून नवी क्रांती घडविली होती. अजूनही अनेक घटनांचे हे शहर साक्षीदार आहे. याच शहरात परंपरागत मारबतीच्या निमित्ताने भ्र्रष्टाचार निर्मूलनासाठी जनसामान्यांनी दिलेलाा हा संदेश निश्चितच क्रांती घडविणारा ठरू शकतो. या बद्दल दुमत नसावे.
