महेश कंठे ठरला ‘आवाज महाराष्ट्राचा’

मुंबई दि.३० ऑगस्ट- गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या ‘मी मराठी’ वरील ‘आवाज महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमाचा महाविजेता ठाण्याचा महेश कंठे याला आवाज महाराष्ट्राचा या किताबाने सन्मानित करण्यात आले. पहिल्यांदाच प्रादेशिक वाहिनीवरील महाविजेत्याला महाबक्षिस म्हणून मुंबईत वन बीएचकेचा आलिशान फ्लॅट व महेश कोठारे यांच्या आगामी नव्या चित्रपटासाठी गाणे गाण्याची संधी तसेच दीड लाख रु. च्या भेटवस्तू देऊ न गौरव करण्यात आला. द्वितीय पारितोषिक कोल्हापूरच्या प्रल्हाद जाधवला देण्यात आले तर तृतीय पारितोषिक सोलापूरच्या मोहम्मद अय्याजला देण्यात आले. पहिल्या रनरअपला मी मराठी व एचडीआयएलकडून ५० हजार रु. तर उर्वरित स्पर्धकांना प्रत्येकी २५ हजार रु. रूपये देऊन गौरवण्यात आले. हा महाअंतिम सोहळा मी मराठी वाहिनीवरून प्रक्षेपित करण्यात आला. स्पर्धकांच्या गाण्यांसह शंकर महादेवन, शान, अवधुत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या सहभागामुळे हा अंतिम सोहळा अधिकाधिक रंगतदार झाला.
राज्यभरातून या स्पर्धेबाबतची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली होती. चुरशीच्या लढतीत अंतिम फेरीपर्यंत ठाण्याचा महेश कंठे, सोलापूरचा जयंत पानसरे, मोहोम्मद अय्याज तसेच कोल्हापूरचा प्रल्हाद जाधव हे चार स्पर्धक पोहोचले होते. या चार स्पर्धकांपैकी कोणता स्पर्धक या किताबाचा मानकरी होणार, याची उत्कंठा संपूर्ण महाराष्ट*ाला लागून राहिली होती. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या महाअंतिम सोहळ्यासाठी विशेष पाहुणे म्हणून आघाडीचे गायक शंकर महादेवन तसेच शान हे हजर होते. कार्यक्रमादरम्यान शंकर महादेवन यांनी गणेश वंदनेने आणि शान यांनी ‘हिल हिल पोरी हिला…’ या मराठी गाण्यांवर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. मी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमधील तारकांच्या नृत्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या सोहळ्यासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर, मी मराठी मिडीयाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोककुमार गुप्ता, मी मराठी वाहिनीच्या अध्यक्षा हरिना चंदन, विनोद तावडे, गणेश बिडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment