पर्यावरणपूरक गणेशमूर्ती खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल

पुणे दि.३०- गणेशोत्सव आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रचंड संख्येने नागरिकांनी खरेदी केल्या असल्याचे दिसून आले असून या मूर्ती तयार करणार्‍या इकोएक्झिट या स्वयंसेवी सामाजिक संस्थेने यावर्षी गतवर्षीच्या दुप्पट मूर्तींची विक्री केली आहे. अजूनही या मूर्तींना मोठ्या संख्येने मागणी आहे मात्र आता त्यांचा पुरवठा करणे अवघड असल्याचे या संस्थेच्या संस्थापक मनीषा गुटमन यांनी सांगितले.
   याबाबत अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की गेली सहा वर्षे ही संस्था सातत्याने पर्यावरणपूरक म्हणजे शाडूच्या गणेशमूर्ती त्याही नैसर्गिक रंगात रंगविलेल्या नागरिकांनी वापराव्या यासाठी जनजागृतीचे काम करत आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या रासायनिक रंगांनी रंगविलेल्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या गेल्या की पाण्याचेही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असते. त्यामुळे शाडूच्या अथवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यापासून बनविलेल्या मूर्ती वापरल्या जाव्यात यासाठी प्रयत्न सातत्याने करण्यात येत आहेत.गेल्या सहा वर्षात असा अनुभव येतो आहे की जनतेत त्यासंबंधी चांगली जागृती झाली असून नागरिकांच्या मानसिकतेतही बदल झाला आहे. संस्थेने पुण्यातील तसेच पेणमधील मूर्तीकार व शिल्पकारांनाही या प्रयोगात सामील करून घेतले असून त्यांना शाडूच्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षणही दिले आहे. गेली कांही वर्षे शाडूच्या अथया मातीच्या मूर्ती करणार्‍यांचे प्रमाण वाढले असले तरी अद्यापी मूर्ती रंगविताना रासायनिक रंग वापरणार्‍यांचे प्रमाण लक्षणीय आहे. यंदा त्यासाठीही विशेष काळजी घेण्यात आली असून हळद, मुलतानी माती यासारख्या पर्यावरणपूरक पदार्थांचा वापर मूर्ती रंगविण्यासाठी करण्याचे प्रमाण वाढले आहे. पर्यावरणपूरक मूर्ती बनविणार्‍या तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती बनविणार्‍या कलाकारांचा डेटाबेसच संस्थेने तयार केला असल्याचे मनीषा यांनी सांगितले.
 यंदा संस्थेने मूर्तींबरोबरच सजावटीचे साहित्यही पर्यावरणपूरक साहित्यापासून बनविले जावे यासाठी विशेष प्रयत्न केले असून त्यात कापड, झाडांपासून मिळणारा स्पंजसारखा पदार्थ यांचा वापर केला गेला आहे. अनिरूद्ध उपासना ट*स्टने यावर्षी कागद्याच्या लगद्यापासून केलेल्या मूर्तीही उपलब्ध केल्या असून त्या पुण्याबरोबरच नागपूर, हैद्राबाद आणि मुंबईलाही पाठविण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment