
मुंबई दि.३० ऑगस्ट – केंद्र सरकार १० रुपयांच्या प्लॅस्टिक नोटांची छपाई करणार असून लवकरच अशा नोटा चलनात येणार आहेत. एकूण १०० कोटी रु. मूल्य असलेल्या १० रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा बाजारात येणार आहेत. त्यामुळे बाजारातील बनावट नोटांवर आळा बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्लॅस्टिक नोटा चलनात आणण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न सुरु आहेत. २००९ मध्ये रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात निविदाही काढली होती.
सध्या कागदी नोटा चलनात असून या नोटा काही कालावधीनंतर फाटतात. त्यामुळे प्लॅस्टिकच्या नोटा आणण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. यामध्ये देशातील पाच प्रमुख ठिकाणांमध्ये या प्लॅस्टिक नोटा प्रायोगिक तत्वावर चलनात आणण्यात येणार आहेत. कागदी नोटा अधिकाधिक १ ते २ वर्ष टिकतात तर प्लॅस्टिक नोटा सरासरी ५ वर्षे किवा त्याहून जास्त काळ टिकतात. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बनावट नोटांना आळा बसेल. प्लॅस्टिक नोट सर्वप्रथम ऑस्ट्रेलियात चलनात आली होती. १९९७ साली १० ऑस्ट्रेलियन डॉलर्सची प्लॅस्टिक नोट ऑस्ट्रेलियन मध्यवर्ती बँकेने बाजारात आणली होती. सध्या कॅनडा, न्यूझीलंड, रोमानिया, बर्म्युडा, व्हिएतनाम यांच्यासह ७ देशांमध्ये संपूर्ण चलनी नोटा प्लॅस्टिकच्याच आहेत.