भटक्या कुत्र्यांची संख्या मारून कमी होत नाही, जगभर कुत्र्यांचे नवे पैलू उजेडात

सध्या जगभर भटक्या कुत्र्यांनी जगभरच्या प्रसारमाध्यमाचे लक्ष वेधून घेतले आहे. रस्तोरस्ती भटकणारी बेवारशी कुत्री मारणे हा आपल्या स्थानिक महानगरपालिका आणि नगरपालिका यांचाच काय पण जगभर सर्वच पालिकांचा उद्योग असतो. पण अशा मारण्याने कधीही कुत्र्यांची संख्या कमी होत नाही, असा निष्कर्ष जागतिक आहार संघटनेने काढला आहे. तसा हा निष्कर्ष जुना आहे पण कुत्र्यांचे अनेक आश्चर्यकारक स्वभाव आता कुत्र्यांचा जागतिक पातळीवर काम करणार्‍या संस्था अणि संघटना यांच्या लक्षात आला आहे, म्हणून या विषयाकडे जगाच्या प्रसारमाध्यमांचे लक्ष गेले आहे.कहीनी असाही प्रयोग केला आहे की, भटक्या कुत्र्यांचेच पाळीव कुत्र्यात व पाळीव कुत्र्यांचेच दहशतवाद्यांच्या हालचालीचे निरीक्षण करण्याच्या कामात रुपांतर करता येईल. भटक्या कुत्र्याबाबच्या वेबसाईटस् जरी बघितल्या तरी या बाबतचे जे छोटे छोटे प्रयोग सुरु आहेत, त्याची कल्पना येईल.  जगभरच्या नगरपालिका, महापालिका व ग्रामपंचायती यातून दरवर्षी पन्नास कोटी कुत्री मारली जातात, तरीही दरवर्षी त्या कुत्र्यांची संख्या कमी होत नाही. असे जागतिक संघटनेचे म्हणणे आहे. कुत्री संपविण्याचे दोन प्रकार जगभर रूढ आहेत. एक म्हणजे त्यांना गल्ली बोळातून उचलणे व सुरक्षित ठिकाणी त्यांना वीषप्रयोग करून ठार मारणे. दुसरा प्रयोग असा की, त्यांना निर्बीज करणे म्हणजे कुटुंबनियोजनाचे इंजेक्शन देणे. त्यामुळे एक दोन वर्षात का होईना ही बेवारशी कुत्री कमी होतील, अशी शक्यता खरी वाटायला कांही हरकत नाही. पण जागतिक आरोग्या संघटनेच्या जगभरच्या पाहणीतून असे आढळून आले आहे की, कोणत्याही भागात किती कुत्र्यांनी राहायचे, ही संख्या कुत्रीच ठरवतात. सरकारी यंत्रणेने किवा कोणी माथेफिरूने ही कुत्री मारण्याचा कितीही विडा उचलला तरी ती मारूनही ती कमी होतात, पण साधारणपणे तीन महिन्यात तेथे मूळच्या संख्येयेवढया कुत्र्यांची संख्या परत तयार झालेली असते. याच विषयाचा दुसरा भाग असा आहे की, एखाद्या भागात मूळच्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येत शंभरात शंभर अशी जरी वाढ पडली तरी पंधरा दिवसात तेथे फक्त शंभरच कुत्री असतात.
इतक्या सुसूत्र नियोजनाचे कारण काय असावे, हा विषय चक्रावून सोडणारा आहे. पण जगभरच्या सर्व ठिकाणच्या पाहणीतून असे स्पष्ट झाले आहे की, त्या त्या भागात किती कुत्र्यांचा मुक्काम असायला हवा, हे त्या भागात उपलब्ध होणार्‍या त्यांच्या अन्नावरून निश्चत होते. किती कुत्र्यांना जन्म द्यायचा आणि जन्माने जादा संख्या निर्माण झाली तर जादा कुत्र्यांनी अन्य ठिकाणे कशी शोधायची, यांची त्यांच्याकडे एक स्वयंनिर्मित व्यवस्था असते. याची स्थानिक स्वराज्य  संस्थांना माहीत नसते. साधारणपणे कोणतीही महापालिका, नगरपालिका किवा ग्रामपंचायत घेतली तरी वर्षातून चार पाच वेळा तरी रस्त्यावरील बेवारशी कुत्री हा गंभीर विषय बनतोच. गेल्या आठवड्यात पुणे महापालिकेत यावर चर्चा झाली होती. या आठवड्यात नागपूर महापालिकेत यावर चर्चा झाली होती. शहरात भटकी कुत्र्यांची संख्या वाढली की, नागरीक तक्रारी करतात.अशी कुत्री मारण्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूदही असते. पाळीव यादीतील सर्वच भटक्या प्राण्याबाबत हाच नियम आहे, असे अनेकांचे निरीक्षण आहे. मांजरेही आपली संख्या स्वनियंत्रित ठेवत असतात. पण कुत्र्याबाबत जसा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल उपलब्ध आहे, तसा मंाजरांचा नाही. कुत्र्यांच्या या स्वभावाचा नगरपालिकांनी पाठपुरावा करावा व त्यांना क्रूरपणे मारणे थांबवावे, असे आव्हान श्रीमती मेनका गांधी वारंवार करत असतात. पण त्याला फारसे महत्व दिले जात नाही.
    त्या त्या भागतील संख्या कशी मर्यादेत ठेवायची, याबाबत उपयोगी पडणारे सूत्र असे की, त्यांना सार्वजनिक ठिकाणी कांही खायला मिळणार नाही, याची तजबीज केली की, त्या भागातील संख्या हटते, हाच जगभरचा अनुभव आहे. रस्त्याच्या कडेचे उकिरडे, घाणीचे ढीग, घरातील खाद्यपदार्थाचे खरकटे बाहेर टाकणे,हे प्रकार आपण आपल्या आजूबाजूच्या भागातही बघतो. शहरात अगदी मुख्या रस्त्यावर अशी घाण कमी असते. पण छोट्या छोट्या गल्ल्यातून ती घाण प्रचंड असते. साधारणपणे रेल्वेतून कोणत्याही शहरात प्रवेश करताना त्या शहराच्या कांही घरांच्या मागच्या बाजूचे दर्शन होत असते. वाहती गटारे, डबकी, ओढे, नाले, खाद्यपदार्थ विकणारी हॉटेले, खानावळी, बेकर्‍या, कत्तलखान्यांची मागची बाजू, पावभाजीच्या टपर्‍या याठिकाणी बेवारशी  कुत्र्यांची संख्या मोठी असते. जेथे जेवढी घाण साचते, त्यावर त्या भागातील कुत्र्यांची संख्या जोपासली जात असते. जागतिक आहारसंघटनेचे असेही म्हणणे आहे की, कुत्र्यांना मारण्यासाठी विषप्रयोग करणे आणि किवा किवा काही इंजेक्शन देणे या खर्चापेक्षा शहरात वर उल्लेखिलेली घाण थोपवण्याचा खर्च कमी असतो.
    वास्तविक कुत्रा हा माणसाचा अतिशय जवळचा मित्र आहे. ज्याच्यावर विश्वास टाकावा, असा तो प्राणी आहे माणसाने माणसाचा विश्वासघात केल्याची उदाहरणे पावलो पावली असतात, पण कुत्र्यांने विश्वासघात केल्याची उदाहरणे शोधावी लागतात. पाळीव प्राणी कसे पाळायचे, यावर आता बरेच वाङमय उपलब्ध आहे. पाळीव प्राण्याच्या दवाखान्यात डॉक्टरांची फी बर्‍याचवेळा माणसाच्या दवाखान्यापेक्षा जादा असते. पण शेकडो घरी कुत्री अतिशय हौसेने पाळली जातात. कुत्री हा पाळण्याचा प्राणी आहे, त्यापेक्षाही त्याचे सामर्थ्य सुमारे साठ वर्षापूर्वी स्पष्ट झाले आहे, ते म्हणजे त्याची गंधन क्षमता माणसापेक्षा किती तरी जादा आहे. पंचवीसतीस वर्षापूर्वी फक्त चोराचा माग काढण्यासाठी प्रशिक्षित कुत्र्याचा वापर केला जायचा. आता स्फोटकांचा शोध घेणे हे महत्वाचे काम त्याना करावे लागते. स्फोटकांचा वास कुत्र्याला येवू नये, म्हणून जर दुसर्‍या अतिउग्र वस्तूत ती स्फोटके ठेवली तरी कुत्रा कधी चूक करत नाही, कुत्र्यांच्या या क्षमतेचा अचूक वापर कमी झाला तर ते नव्वद टक्के पद्धतीचे गुन्हे शोधू शकतो, असे त्यातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसयंत्रणेवरील ताण तर कमी होईलच पण न्याययंत्रणेवरील ताणही कमी होईल.
    जगभरच्या प्रसारमाध्यमात सध्या असा एक विषय मांडला जात आहे की, भटकी कुत्री हा घाण पसरवणारा प्राणी असा जो समज आहे त्याऐवजी तो त्या त्या भागातील संशयास्पद वस्तूवर लक्ष ठेवणारी यंत्रणा यापद्धतीने त्याकडे बघता येईल का, हा मुद्दा आहे. ही कल्पना तशी कठीण आहे. पण माणसाने त्याला राखणदार, घरात हिडणाफिरणारा एक गोंडसदार बाहुला , आपल्या मर्जीप्रमाणे दुसर्‍यावर भुंकण्यास उपयोगी पडणारा प्राणी असे त्याचे जे स्वरुप परिचित आहे, त्यापेक्षा त्याच्या दहशतवादी हल्ल्याची पूर्वसूचना देणारा घटक असे त्याचे स्वरुप असू शकते. एक कुत्रा सांभाळताना पोलीस खात्याला मोठा खर्च येतो. त्यातील बराचसा खर्च हा सरकारी पद्धतीचाच असतो. कुत्र्याला असे संशयास्पद बाबींच्या गंधाचा वेध वेध घेण्याचे शिक्षण देणे काही प्रयत्नाने शक्य आहे. प्रत्येक मोहल्ल्यात अशी पाच पंचवीस कुत्री जर असतील तर ते काम व्यवस्थित होईल. तसे हे काम कठीण आहे. पण प्रयत्नाने शक्य आहे. ते किती शक्य आहे त्याही पेक्षा या माणसाच्या या जिवलग मित्राचे खरे गुण अजून स्पष्टच झालेले नाहीत. त्याला माणसाची जबरदस्त पारख आहे. त्याची स्मृती अतिशय सूक्ष्म आहे. माणसाला जसा सत्यासत्य विवेक आहे, तसा कुत्र्यालाही आहे. आगामी काळात कुत्रा हा माणसाचा अधिक जवळचा जिवलग व अधिक संरक्षक ठरण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थातून भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कुत्र्यावर वार्‍यावर सोडणारी भाषणे होतात. पण कधी त्याच्या मनात ‘वरं जनहितम् ध्येयम् ’ अशीच माणसासारखी भूमिका असेल तर ती जाणून घेण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींनी करणे आवश्यक आहे.
मोरेश्वर जोशी,पुणे

Leave a Comment