अण्णांना सुरक्षा पुरवण्याची वकिलांची मागणी

पुणे दि.३०- अण्णा हजारे यांचे पुण्यातील वकील मिलींद पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर.आर. पाटील यांना पत्र लिहून अण्णांना सुरक्षा व्यवस्था पुरविली जावी अशी विनंती केली आहे असे समजते.दिल्लीतील रामलिला मैदानावर १२ दिवसांच्या उपोषणात अण्णांनी कार्यकर्त्यांसमोर अनेकवेळा सरकारविरोधात भाषणे केली आहेत. त्यामुळे कांही राजकीय मंडळी नाराज झाली आहेत. परिणामी अण्णांच्या जिविताला धोका असून त्यांचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे असे पवार यांनी या पत्रात नमूद केले आहे. यावर्षीच एप्रिलमध्येही पवार यांनी असेच पत्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पाठविले होते मात्र त्याला कोणतेच उत्तर देण्यात आले नाही असेही ते म्हणाले.
अण्णा सरकारी नोकर नाहीत मग त्यांना सरकारी सुरक्षा व्यवस्था कशी देता येईल असा प्रश्न कदाचित सरकारपुढे असू शकतो असे सांगून पवार म्हणाले की गांधीच्या बाबतीत काय घडले याची जाणीव सरकारने ठेवायला हवी आणि अपवाद म्हणून अण्णांना सुरक्षा द्यायला हवी. एप्रिलमध्ये पत्र लिहिताना अण्णांना त्याची कल्पना दिली होती मात्र अण्णांनीच तेव्हा त्याची गरज नसल्याने सांगितले होते. मात्र आता या जनआंदोलनानंतर परिस्थिती बदलली आहे आणि ती अधिक स्फोटक झाली आहे असे पवार यांचे म्हणणे आहे.
अण्णांचे जवळचे सहकारी दत्ता आवारे यांनी मात्र ही मागणी अण्णांच्या आदर्शवादाविरोधात असल्याचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की पद्मसिह पाटील यांच्या विरोधात अण्णांनी तक्रार दिली होती तेव्हा त्यांना चार सुरक्षा रक्षक सरकारने दिले होते. मात्र आत्ता अण्णाच सुरक्षा रक्षक ठेवण्यास संमती देतील असे वाटत नाही.

Leave a Comment