लहरीपणा पावसाचा

rain

महाराष्ट्रत विशेषतः दुष्काळाच्या छायेखाली असलेल्या पूर्ण मराठवाड्यात गेल्या दोन तीन दिवसांत छान पाऊस पडतोय. पावसाला उशीर झाला असला तरीही श्रावण काही कोरडा गेलेला नाही. श्रावण सरी कोसळल्या नसत्या तर मात्र चितेची स्थिती होती. कारण मग पूर्ण खरीप हंगाम शंभर टक्के वाया गेला असता आणि सारी भिस्त रबीवर राहिली असती. मराठवाड्यात रबी पिकेही तशी भरपूर येतात पण तेवढ्याने समाधान होत नाही. काही जमिनी खरिपाच्या आहेत आणि यावेळी  शेतकर्‍यांनी मोठ्या उमेदीने कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली होती. तो यंदा सोळा आणे साधला नाही. ज्यांच्या शेतात कापसाची लागवड खरिपात झाली आणि  कसा का होईना पण कमी जास्त पाऊस असतानाही ते पीक जगवण्यात यश आले, त्यांच्या कापसासाठी हा पाऊस आता उपयुक्त ठरणार आहे. खरे तर आता पावसाचे आगमन फारच लहरीपणाने चालले आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून आपण त्याचा विदारक अनुभव घेत आहोत.  आपण या अनुभवाला विदारक म्हणतो पण पावसाला आणि निसर्गाला त्याची काही पर्वा नाही. पावसाचा सारा पसारा  आणि निसर्गाचा व्याप पहायला गेलो तर त्या व्यापात आपण किती तरी छोटे आहोत.

पाऊस काही आपल्यासाठी आणि आपल्या सोयीने पडत नसतो. महाराष्ट*ातली शेती पिकावी आणि १०० टक्के पीक यावे म्हणून पाऊस पडत नाही. निसर्गाच्या नकाशावर मराठवाडा हा एक छोटा बिदू आहे.  त्याचा विचार निसर्ग करीत नसतो. पाऊस पडणे ही या निसर्गातली एक मोठी प्रक्रिया आहे. आपण मात्र तो आपल्या गणिताप्रमाणे पडला नाही की तो लहरी झालाय असे म्हणतो. आपल्या जीवनामरणाची ठरलेली त्याच्या येण्या जाण्यातली एक लहर ब्रह्मदेवाच्या एक श्वासासारखी असते.  हवामानाच्या व्यापक बदलाचा तो एक सूक्ष्म अंश असतो पण तो हजारो लोकांचे जीवन उद्ध्वस्त तरी करतो किवा संपन्न तरी करतो. आपण मात्र निसर्गाचे हे देणे आपल्यासाठी आहे असे मानत असतो आणि लहरी झाला की त्याला शिव्या द्यायला लागतो. निसर्गाला शिव्या शाप देऊन चालणार नाही कारण त्याने काहीही साध्य होणार नाही. आपण आपल्या गावातल्या महादेवाला पाण्यात उभे केल्याने या निसर्गात काही बदल होत नाही. आपल्याला या पावसावर अवलंबून असलेली आपली शेती संपन्न करायची असेल तर पावसाचा अभ्यास आणि निरीक्षण करावे लागेल आणि आपल्या शेतीचे तंत्र त्या लहरीबरहुकूम बदलून घ्यावे लागेल. मराठवाड्यातली शेती वर्षानुवर्षच्या निरीक्षणावरून खरीप आणि रबी या दोन हंगामात विभागली गेली आहे. पण आता या तंत्रात बदल करावा लागेल. गेल्या काही वर्षातल्या अनुभवानुसार जूनमध्ये पाऊस येईनासा झाला आहे. तर मग आपणही तो जूनमध्ये येणारच नाही असे गृहित धरून आपल्या शेतीचे नियोजन का करू नये ? आपण खरीप हा प्रकारच बंद करून टाकावा. धड खरीपही नाही आणि धड रबीही नाही.

असा एखादा मध्य हंगाम आपण धरला पाहिजे. मृग नक्षत्रावरच पेरण्या केल्या पाहिजेत असा आग्रह कशाला ? पाऊस मधा नक्षत्रावर आला तर मघा नक्षत्रावर पेरण्या करू असे काही नियोजन करता येणार नाही का ? सध्या मराठ वाड्यात कापूस आणि सोयाबीन ही दोन पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहेत. या पिकांची पेरणी जूनमध्येच झाली पाहिजे असा काही नियम नाही. ही दोन्ही पिके खरीप हंगामातही येतात आणि रबी हंगामातही येतात. तेव्हा ती मध्य हंगामातही घेता येतील. सूर्यफूल हेही असेच पीक आहे. ज्वारीही याच काळात घेता येते. सोलापूर जिल्हयाचे जे तालुके ज्वारीचे आगार म्हणून ओळखले जातात त्या तालुक्यांत रबी हंगामातल्या ज्वारीची पेरणी गोकुळ अष्टमीला म्हणजे श्रावण महिन्यातच केली जाते. या ज्वारीला आणि हंगामाला रबी म्हणत असले तरीही तो तसा मध्य हंगामच असतो. भाजीपाल्याच्या पिकांनाही मध्य हंगाम चालतो. सध्या मक्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जायला लागले आहे. तेही मध्य हंगामात घेता येते. पावसाचा लहरीपणा म्हणजे आपल्यावरची आपत्ती असे समीकरण आपण तरी का करावे ? हा लहरीपणा नीट वापरला तर आपल्याला त्याचा फायदाही होऊ शकतो हे विसरता कामा नये. मध्य हंगामात पेरणी करा. या काळात पडत असलेला  जादाचा पाऊस शेतातच अडवा. शेततळी भरून घ्या. दसरा किवा दिवाळी झाली की या मध्य हंगामी पिकांना या शेततळ्यातले एक पाणी द्या. पीक किती तरी चांगले येते. तशी तर रबी पिके जमिनीत मुरलेल्या पाण्यावरच येत असतात पण हिवाळ्यात नुसते आभाळ भरून आले तरी ज्वारीचे पीक चांगले येते असा अनुभव आहे. या पिकाला एखादा पाऊस पडून पाणी मिळाल्यावर तर पीक फारच चांगले येते. तेव्हा या काळातल्या पावसाचे पाणी साचवून आपण ते आपल्याच पिकाला दिले तर शंभर टक्के पीक येईल. आपल्या शेतीतले यश किती पाऊस पडतो आणि कधी पडतो यावर अवलंबून नाही तर किती का पडेना ते पाणी आपण कसे अडवतो, असे जिरवतो आणि ते अडवलेले पाणी किती नियोजनबद्धपणे वापरतो यावर  अवलंबून आहे.  

Leave a Comment