जगातील सर्वाधिक पॉवरफुल महिलांच्या यादीत सोनिया गांधी

वॉशिंग्टन दि.२५- फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या जगातील सर्वाधिक पॉवरफुल महिलांच्या यादीत भारताच्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व पेप्सिकोच्या इंद्रा नूयी यांनी पहिल्या दहा महिलांत स्थान मिळविले आहे.या यादीत ६४ वर्षीय सोनिया गांधी सातव्या स्थानावर आहेत तर इंद्रा नूयी यांनी चौथे स्थान मिळविले आहे. १०० महिलांच्या या यादीत आणखी दोन भारतीय महिलांचीही नांवे असून आयसीआयसीआयच्या सीइओ चंदा कोचर या ४९ व्या स्थानावर आहेत तर बायोकॉनच्या संस्थापक व प्रमुख किरण मुझुमदार या९९ व्या स्थानावर आहेत.
पहिल्या क्रमांकावर जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला माकर्केल असून त्यांनी अमेरिकेच्या हिलरी क्लींटन यांना दुसर्‍या क्रमांकावर ढकलून हे स्थान हस्तगत केले आहे. तिसर्‍या क्रमांकावर ब्राझीलच्या पहिल्या महिला राष्ट्रध्यक्ष डिलमा रौसेफ या आहेत. फेसबुक चीफ ऑफिसर शेरील सँडबर्ग या पाचव्या स्थानावर असून सहाव्या स्थानावर गेटस प्रतिष्ठानच्या मिलिडा गेटस आहेत. आठवे स्थान अमेरिकेच्या फर्स्टलेडी मिशेल ओबामा यांचे असून इंटरनॅशनल मोनेटरी फंडच्या प्रमुख ख्रिस्टीन लागार्ड या नवव्या क्रमांकावर आहेत. दहाव्या स्थानावर आहेत क्राफट फूडच्या सीइओ इरीन रोझेनफेल्ड.
१०० महिलांच्या या यादीत ६५ अमेरिकन महिला आहेत. भारताच्या चार तर चीन, ऑस्ट*लिया व ब्रिटनच्या प्रत्येकी तीन महिला आहेत. सर्वात तरूण पंचवीस वर्षीय लेडी गागा या यादीत अकराव्या स्थानावर आहे तर सर्वात वयोवृद्ध ८५ वर्षीय ब्रिटनची राणी एलिझाबेथ ही ४९ व्या स्थानावर आहे.

Leave a Comment