जगनमोहनची अफाट मालमत्ता

राजकारणातल्या आपल्या स्थानाचा वापर करून अमाप संपत्ती कमविण्याची चढाओढ सध्या सुरू झालेली आहे आणि राजकारणात स्थान मिळविण्यापूर्वी खायला मोताद असलेले पुढारी खादीच्या झुली अंगावर चढताच भारी कारमधून फिरताना दिसत आहेत. सामान्य माणसाचे डोळे फिरविणारी त्यांची संपत्ती ही चोर्‍या करून मिळवलेली असल्यामुळे सामान्य माणूस पुढार्‍यांवर चिडलेला आहे. एका मंत्रिमहोदयांनी असाच प्रचंड पैसा कमवला. मात्र तो नेमका किती आहे हे त्यांनाच माहीत नव्हते. त्यांनी आपल्या पी.ए.ला एक प्रश्न विचारला, अरे बाबा माझी संपत्ती आता नेमकी किती झालेली आहे? त्यावर पी.ए.ने उत्तर दिले, साहेब, आपली संपत्ती आता एवढी झालेली आहे की, आपल्या सात पिढ्या केवळ बसून खाऊ शकतील. या उत्तरावर नेत्याच्या चेहर्‍यावर खुशी विलसेल असे पी.ए.ला वाटले होते. परंतु नेत्यांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. पी.ए.ने त्यांना प्रश्न केला, साहेब, एवढे पैसे कमवूनही तुम्ही असमाधानीच कसे? त्यावर नेता म्हणाला, सात पिढ्या बसून खातील पण आठव्या पिढीला मात्र कष्ट करावे लागतील या कल्पनेने मी निराश झालो आहे.

      भारतातल्या नेत्यांच्या मालमत्ता सावडण्याच्या हावरटपणावर यापेक्षा मोठी कोणती टिप्पणी असू शकेल. अशा पैसे सावडणार्‍या मंत्र्यांमध्ये करुणानिधी, शीला दीक्षित वगैरे वगैरे अनेकांची नावे आलेली आहेत. परंतु यामध्ये सरस-निरस करण्याची वेळच आली तर या उद्योगात जगन मोहन रेड्डी याचे नाव सर्वात आघाडीवर ठेवावे लागेल. जगन मोहन रेड्डी याचे वडील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी हे २००४ साली मुख्यमंत्री झाले आणि ते सहा वर्षे मुख्य मंत्रीपदावर राहिले. २००४ साली जगनमोहनची मालमत्ता किती होती, हा आकडा ऐकला तर त्याची दया येईल. त्यावेळी त्याचे वार्षिक उत्पन्न नऊ लाख रुपये होते. त्यावर्षी निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर केलेल्या शपथपत्रामध्ये त्याने तसे नमूद केले आहे. २०११ साली त्याने पुन्हा निवडणूक लढवली तेव्हाही असेच प्रतिज्ञापत्र जाहीर केले. त्यात आपले वार्षिक उत्पन्न ३६ कोटी रुपये असल्याचे नमूद केले. २००४ साली नऊ लाख रुपये कमावणारा माणूस सातच वर्षांमध्ये त्याच्या चारशे पट जास्त उत्पन्न कशाच्या आधारे कमवू शकला याचा कसलाही खुलासा जगन मोहन रेड्डीच्या या शपथपत्रात करण्यात आलेला नाही. या दरम्यानच्या काळात त्याने हैदराबादच्या ज्युबिली हिल्स् भागामध्ये ५३ हजार चौरस फूट म्हणजे जवळपास दीड एकर जागेमध्ये ९० कोटी रुपये खर्चून प्रचंड बंगला बांधला.

      या बंगल्यासाठी पैसा कोठून आणला याचे कसलेही स्पष्टीकरण शपथपत्रात नाही. २०११ साली तो निवडून आला तेव्हा त्याची स्थावर मालमत्ता ३६५ कोटी रुपयांची आणि जंगम मालमत्ता २५ कोटी रुपयांची होती. या मालमत्तेमुळे त्याचा समावेश देशातल्या काही अतिश्रीमंत खासदारांमध्ये झाला. गमतीचा भाग असा की, २००९ साली सुद्धा त्याने निवडणूक लढवली होती आणि आपल्या शपथपत्रामध्ये आपली स्थावर, जंगम मालमत्ता मिळून ७७ कोटी रुपयांची असल्याचे म्हटले होते. दोनच वर्षांमध्ये त्याची ही मालमत्ता ७७ कोटीवरून ३९० कोटींवर कशी गेली, असा प्रश्न सर्वांनाच पडला आणि तेलुगू देसमच्या एका आमदाराने उच्च न्यायालयात धाव घेऊन जगन मोहनच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी केली. आता त्याच्या मालमत्तेचे खरे तपशील समोर यायला लागले आहेत. त्यानुसार त्याची खरी मालमत्ता ३६५ कोटी रुपयांची आहे. त्याच्या पत्नीची मालमत्ता यात जमा केलेली नाही. ती ४१ कोटी ३३ लाख रुपये एवढी आहे.

      जगन मोहन रेड्डी याची ३ अब्ज ५९ कोटी रुपयांची मालमत्ता निरनिराळ्या कंपन्यांचे शेअर्स, बॉण्डस् यामध्ये गुंतलेली आहे. त्याच्या पत्नीची ही गुंतवणूक ३६ कोटी रुपये एवढी आहे. त्याशिवाय पाच कोटी रुपयांच्या ठेवी आणि असेच काही कोटी रुपयांचे राष्ट*ीय बचत रोखे आहेत. जगन मोहन रेड्डी याचे दागिने फक्त २० लाखांचे आहेत पण त्याच्या पत्नीचे दागिने मात्र ३ कोटी ८० लाख रुपयांचे आहेत. आपल्या देशातल्या पुढार्‍यांनी पैशापेक्षा आणि दागिन्यांपेक्षा जमिनीत पैसे गुंतवण्याची मोठी हुशारी केलेली आहे. त्यामुळे जगन मोहनच्या या मालमत्तेत सुद्धा भरपूर जमिनी आहेत. त्याने सध्या १३ कोटी रुपयांची शेतजमीन आणि चार कोटी रुपयांची नागरी जमीन खरेदी केलेली आहे. त्याच्या पत्नीची जमीन ११ कोटी रुपयांची आहे आणि मोठ्या शहरांमध्ये बांधून गुंतवणूक केलेले व्यापारी संकुल १६ कोटी रुपयांचे आहे. जगन मोहनचे राहते घर ९० कोटी रुपयांचे असले तरी त्याने त्याची किमत दाखवताना मात्र केवळ ४ कोटी रुपये दाखवलेली आहे. हा फरक लक्षात घेता त्याने दाखवलेली ही सारी संपत्ती आणि त्याची खरीखुरी संपत्ती यामध्ये किती फरक असेल याचा अंदाजही न केलेला बरा. असा प्रकार केवळ जगन मोहन रेड्डीच्या बाबतीतच आहे असे नाही तर गावोगावच्या पुढार्‍यांची मालमत्ता अशीच अब्जावधींची आहे.

Leave a Comment