पुणे दि.२४- अण्णा हजारेंच्या आंदोलनासंबधीच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन या वेबसाईटला भेट देणार्यांची संख्या गेल्या काही दिवसांत अडीचशे पटींनी वाढली असल्याचा फायदा नेट हॅकर्स घेत असल्याचे व त्यामुळे संगणकाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मत सायबर तज्ञांनी व्यक्त केले आहे.
या तज्ञांच्या मते जनलोकपाल बिलाशी संबंधित कोणताही कीवर्ड सर्च ट्रेंडच्या सर्वात वरच्या बाजूला गेले पंधरा दिवस दिसत आहे कारण ही वेबसाईट पाहणार्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मात्र याचाच फायदा हॅकर्स उठवित असून अण्णा, आंदोलन, भ्रष्टाचार अशा कोणत्याही शब्दावर क्लीक केले गेले तर त्यातून संगणकात विषाणू(व्हायरस) येण्याची भीती असून असे व्हायरस शिरले तर संगणकातील सर्व माहिती करप्ट होण्याची शक्यता आहे. कांही हॅकर्स ग्रूपनी तसा प्रयत्न चालविला असल्याचे पुरावे ही मिळत आहेत.
झी कंपनी हॅकींग क्रू या हॅकर्स संघटनेने अण्णा हजारे यांनी जंतरमंतरवर उपेाषण केले तेव्हापासूनच अनेक भारतीय वेबसाईट हॅक करण्यात आल्याचा दावा केला आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शन या वेबसाईटवरून पॅलेस्टिनी, लिबियन आंदोलकांसंबधीही विधाने या हॅकर्सनी केली असल्याचाही त्यांचा दावा आहे. त्यामुळे नागरिकांना सोशल नेटवर्क साईट उघडतानाही काळजीपूर्वक उघडाव्यात असे आवाहन एथिकल हॅकर्स संघटनेने केले आहे.