हिर्‍यांच्या खाणीतला भ्रष्टाचार

सुप्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोलन नवी दिल्लीमध्ये आणि सार्‍या भारतातच मोठ्या भरात आले असताना भोपाळमध्ये त्यांच्याच एका कार्यकर्तीची हत्या करण्यात आली आहे. सध्या सगळीकडेच आंदोलनाचा धडाका सुरू असल्यामुळे या धडाक्यात काही गोष्टी बेदखल झाल्या आहेत. मुंबईत बाँबस्फोट होऊन काही लोक मारले गेले की अनेक दिवस विविध माध्यमातून खूप चर्चा होते. तशी ती झाली पाहिजे पण तशीच चर्चा नक्षलवाद्यांच्या हिसाचारात मारल्या गेलेल्या लोकांच्या संदर्भात का होत नाही असा प्रश्न पडतो. या आंदोलनाच्या गोंधळात छत्तीसगडमध्ये माओवादी संघटनांच्या आंदोलनात १५ जण शहीद झाले तर गडचिेरोली जिल्हयात काल चार लोक शहीद झाले. त्याच्या फार मोठ्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या नाहीत. मग चर्चा तर दूर राहिलीच पण अशा हत्या होऊ नयेत म्हणून खबरदारीचे उपाय तर आणखीनच दूर राहिले.तसे उपाय नसल्याने हत्त्यांचे सत्र जारी राहते. ना कोणाला खंत ना कोणाला खेद. भोपाळमध्ये झालेली सामाजिक कार्यकर्तीची हत्या अशीच दुर्लक्षित राहिली आहे.
या घटनेकडे कोणाचेच लक्ष नसले तरी भोपाळ शहरात आणि मध्य प्रदेशामध्ये या घटनेने मोठीच खळबळ उडालेली आहे. हत्या झालेल्या कार्यकर्तीचे नाव सेहेला मसूद असे आहे. ती ३५ वर्षांची असून गेल्या सहा वर्षांपासून माहितीच्या अधिकाराखाली भ्रष्टाचार निर्मूलन करण्यासाठी झटत होती. ती आपल्या घराच्या बाहेर पडली होती आणि कारमध्ये बसून कोठे तरी जाण्याच्या तयारीत होती.  त्याचवेळी तिच्यावर कोणीतरी अगदी जवळून दोन गोळ्या झाडल्या. त्यातच तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे तिने कसला आरडाओरडा केला नाही आणि आसपासच्या कोणालाही तिच्यावर झाडलेल्या गोळ्यांचा आवाज ऐकू आला नाही. काही वेळानंतर हा प्रकार उघडकीस आला.   
सेहेला मसूद ही अतिशय सक्रिय कार्यकर्ती होती आणि तिने आतापर्यंत बर्‍याच जणांचे भ्रष्टाचार उघडकीस आणलेले होते. त्यातूनच तिची हत्या झाली असावी असा कयास बांधला जात आहे. आजपर्यंत मध्य प्रदेशात अशा प्रकारचे काम करणार्‍या १३ कार्यकर्त्यांच्या हत्या झालेल्या आहेत. त्यामुळे सेहेला मसूद हिने आजपर्यंत ज्यांचे ज्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणले आहेत त्या सर्वांची चौकशी सुरू झालेली आहे. सेहेला मसूद हिचे वडील सरदार मसूद यांनी ज्या ज्या लोकांची संशयित म्हणून नावे सांगितली त्या सर्वांची चौकशी करायला पोलिसांनी सुरूवात केली आहे.
    सेहेला मसूद ही सध्या एका मोठ्या प्रकरणाच्या मागे लागली होती आणि त्यातून तिने आंतरराष्ट*ीय ख्यातीच्या हिरे तयार करण्याच्या उद्योगाशी वैर मोल घेतले होते. मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यात बुंदेर येथे हिर्‍याच्या खाणी आहेत आणि ही जगातली सर्वात मोठी हिर्‍याची खाण ठरेल हे अलीकडे लक्षात यायला लागले आहे. या खाणीमधून हिर्‍याचा दगड खोदण्याचे कंत्राट रिओ टिटो या ब्रिटिश कंपनीला मिळालेले आहे. लंडनमधल्याच कॉर्पोरेट वॉच या स्वयंसेवी संघटनेने रिओ टिंटो ही कंपनी बेकायदारित्या उत्खनन करत असल्याचा आरोप केला होता. त्याचा आधार घेऊन सेहेला मसूद हिने रिओ टिटो कंपनीच्या विरुद्ध न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती. या कंपनीच्या खोदकामामुळे तिथून वाहणार्‍या सियामढी या नदीचे पाणी अशुद्ध होत आहे असा तिचा दावा होता. रिओ टिटो ही कंपनी धाकदडपशा करून बेकायदा कामे करण्याच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे सेहेला मसूदच्या खुनामागे यातून निर्माण झालेली दुष्मनी हेही कारण असावे असा पोलिसांचा तर्क आहे. तिची हत्या ज्या सफाईदारपणे केलेली आहे तो बघता या कंपनीचा हात त्यामागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
    या ठिकाणी बुंदेरच्या खाणीचे एक वैशिष्ट्याची नोंद करावी लागणार आहे. ते म्हणजे याच परिसरात पन्ना येथेही हिर्‍याच्या खाणी आहेत आणि या खाणीतले हिरे सध्या काढले जात आहेत पण बुंदेरची खाण पन्नाच्या खाणीच्या चौपटीने मोठी आहे. निसर्गाने दिलेली ही देणगी आपण नीट वापरली तर आपल्या देशाचे कल्याण होणार आहे पण ही देणगी काही विशिष्ट लोक संगनमत करून लुटत आहेत. देशातल्या कोळशा पासून ते हिर्‍या पर्यंतच्या खाणींत हाच धंदा सध्या सुरू आहे. तो रोखण्याचा प्रयत्न करणारांचे जीव मात्र जात आहेत. अण्णा हजारे यनी तयार केलेल्या जनलोकपाल विधेयकात अशा कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याची तरतूद केली आहे पण सरकारने ही तरतूद आपल्या जोकपाल विधेयकांत केलेली नाही. भ्रष्टाचार उघड करणारांना संरक्षण देण्याची कल्पना सरकारला मान्य नाही. म्हणूनच सेहेला मसूदचे वडील  सरदार मसूद यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्याला न्याय मिळण्याची अजिबात अपेक्षा नाही, असे म्हटले आहे.
    यामागची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भोपाळमधील एक आयपीएस अधिकारी पवनकुमार श्रीवास्तव यांनी सेहेला मसूदला खुनाच्या धमक्या द्यायला सुरुवात केली होती. सेहेला आणि पवनकुमार यांच्यात झालेला एक संवाद स्वतः सेहेलानेच ध्वनिमुद्रित केला असून तोही पोलिसांनी ऐकलेला आहे. त्यामध्ये पवनकुमार श्रीवास्तव हे सेहेलाला, तुला तुझे सगळे अर्ज मागे घ्यावे लागतील असे म्हणताना दिसतात. सरदार मसूद यांच्या मते सेहेलाच्या खुनामागे पवनकुमारचाच हात आहे आणि एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याचा सेहेलाच्या खुनाशी असा निकटचा संबंध असल्यामुळे आपल्याला न्याय मिळण्याची आशा नाही, असे त्यांनी म्हटले आहे. सेहेलाशिवाय ज्या १३ जणांच्या हत्या झालेल्या आहेत त्यातल्या एकाच्याही हत्येचे गूढ अजून उकललेले नाही. सरदार मसूद यांच्या निराशेमागे तेही एक कारण आहे.

Leave a Comment