बावचळलेले अण्णा विरोधक

अण्णा हजारे यांनी निर्माण केलेल्या वादळाला किती प्रतिसाद मिळत आहे याचा खरा अंदाज अजून काही लोकांना आलेला नाही.म्हणून काही अण्णा विरोधक या उठावाला अपशकुन करायला पुढे सरसावले आहेत.पण अण्णांचा प्रभाव अगदी सामान्यातल्या सामान्य माणसापासून ते देशातल्या सर्वात उच्य शिक्षिता पर्यंत कसा आहे याचे दर्शन  घडत आहे आणि ते विलक्षण आहे. काही वृत्तपत्रे आणि काही हितसंबंधी लोक कसली तरी कुजकी टिप्पणी करीत आहेत आणि देशाच्या कोपर्‍यात अविचाराने झालेला एखादा पिचका  अण्णा विरोधी आवाज मोठा करून सांगत आहेत आणि आपली अण्णा विरोधी खाज बुजवून घेत आहेत. या लोकांना अण्णांच्या नैतिक वर्तनाचा किती प्रभाव पडला आहे याचे खरे  दर्शन घडेल तेव्हा आपण केलेले अपशकुन हे किती मोठे पाप होते याचा साक्षात्कार होईल. राजस्थानातल्या कोणा तरी एका काँग्रेसच्या खासदाराने, अण्णांना आपल्या विरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे.निवडणूक हा काय गेम असतो हे ज्यांना माहीत आहे त्यांना हे आव्हान म्हणजे काय ते कळेल. पण एखादा माणूस निवडून येतो याचा अर्थ तो सर्वगुण संपन्न असतोच असे नाही.
    क्षणभर असे गृहित धरू की अण्णा त्या खासदाराच्या विरोधात निवडून येणारही नाहीत पण त्या खासदाराला लोकसभेचे तिकिट मिळावे म्हणून ज्यचे बुट साफ करावे लागतात ते काँग्रेसचे नेते आज अण्णांच्या पुढे झुकत आहेत हे त्या खासदाराने लक्षात ठेवले पाहिजे. अण्णांना आव्हान देण्याआधी त्या खासदाराने अण्णापुढे झुकणार्‍या आपल्या पक्षाच्या नेत्यांपुढे ताठ उभे राहून दाखवावे. नैतिक ताकद ही एक वेगळी गोष्ट आहे.हा खासदार ज्या लोकशाहीत निवडून येत असतो त्या लोकशाहीला आकार देण्याचे काम अण्णा सारखे नेते करीत असतात. तसे तर महात्मा गांधीही कधी आमदार आणि खासदार म्हणून निवडून आले नव्हते. अण्णा खासदार किवा आमदार होण्यासाठी लढत नाहीत. आमदार  खासदारांनी देशाचा कारभार चांगला करावा यासाठी एक सामान्य नागरिक म्हणून ते झगडत आहेत. अण्णांनी  या सार्‍या दरोडेखोरांच्या टोळीत सहभागी होण्याचे पत्करले असते तर अण्णांसाठी आमदार किवा खासदार होणे काही अवघड नव्हते हे नतद्रष्ट खासदाराने ध्यानात घेतले पाहिजे. अण्णांना आज देशभरात जो पाठिबा मिळत आहे त्याच्या  एक हजारांश पाठिबा त्याने मिळवून दाखवावा आणि असली फुसकी आव्हाने देत बसण्यापेक्षा मी लोकसभेत भ्रष्टाचाराच्या विरोधात लढून देशाचा पैसा भ्रष्ट नेत्यांच्या तिजोरीत जाण्यापेक्षा गरीब लोकांसाठी वापरला जाईल याबाबत दक्ष राहीन असा काही चांगला निश्चय  करावा.
    सत्ताधारी पक्षात तर असे उद्धटच लोक भरले आहेत पण काही नेत्यांनी आपल्या आतल्या आवाजाचे ‘सिबली’करण होऊ दिलेले नाही. त्यापैकी एक म्हणजे  केन्द्रीय ग्राम विकास मंत्री जयराम रमेश. त्यनी आपल्या सत्तेतून येणारा दर्प बाजूला ठेवून आणि संपत्तीतून येणारी मस्ती विसरून, आपल्या सतसद्विवेक बुद्धीला स्मरून अण्णांचे समर्थन केले आहे. सर्वांनाच अशी सद्बुद्धी सुचली तर बरे होईल. सध्या आधार कार्डाची योजना सुरू आहे. तिचे प्रमुख असलेले इन्फोसीस कंपनीचे संचालक नंदन निलेकणी यांनीही अशीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची एक पानभर मुलाखत एका इंग्रजी दैनिकात आली आहे. तिच्यात हे गृहस्थ सत्ताधारी पक्षाने एका योजनेचे प्रमुखपद देताच किती मिंधे होतात हे पदोपदी जाणवते. अण्णा या विधेयकाच्या बाबतीत संसदेच्या स्थायी समितीपुढे जात नाहीत हा त्यांचा लोकशाही विरोधी गुन्हाच आहे असे हे  महाशय म्हणतात पण, त्यांनी त्या आधी ही स्थायी समिती काय असते याची सामान्य म्हणता येईल एवढीही माहिती घेतलेली नाही. कोणतेही विधेयक स्थायी समितीसमोर आलेच पाहिजे अशी स्थायी समिती ही काही  घटनात्मक यंत्रणा नाही. ती संसदेने विधेयके तयार करण्यातले तांत्रिक काम हकले करण्यासाठी निर्माण केलेली सोय आहे. हे त्यांना माहीत आहे की नाही हे कळत नाही पण आज दोन्ही विधेयकांचा तुलनात्मक अभ्यास करणार्‍या कोणाही सामान्य माणसाला हे माहीत आहे.    
    आज कोणता वर्ग अण्णांच्या आंदोलनाने प्रभावित झाला आहे याचे हे एक उदाहरण.पंतप्रधान मनमोहनसिग यनी काल पश्चिमबंग या राज्यात खरगपूर येथे आय. आय.टी. या संस्थेच्या पदवीदान समारंभाला उपस्थिती लावली. त्यांच्या हातून काही पदवीधरांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. पण एम.टेक.ची पदवी घेणे अपेक्षित असलेल्या एका पदवीधराने त्यांच्या हातून पदवी घेण्यास नकार दिला. पंतप्रधान जोपर्यंत कठोर लोकपाल विधेयक तयार करणार नाहीत तोपर्यंत मी त्यांच्या हातून पदवी घेणार नाही असे त्याने जाहीर केले. त्याने पदवी घेतली नाही. आपण कार्यालयात येऊन पदवी घेणार असल्याचे त्याने कळवले. दुसर्‍या एका विद्यार्थ्याने पदवीदान समारंभात गाधी टोपी घालून हजेरी लावली. पण संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी त्याला ती टोपी काढायला भाग पाडले. स्वातंत्र्यात सरकारी कार्यक्रमात आणि काँग्रेसच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात गांधी टोपी घालायला परवानगी न देण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. या गोष्टीची माहिती अनेकांना नाही पण, ती झाली पाहिजे आणि  सरकार तसेच अण्णांचे विरोधक किती बावचळले आहेत याचा अनुभव येत आहे. अशा भ्रष्ट लोकांच्या या चाळ्यांना योग्य ते  उत्तर दिले गेले पाहिजे. हा टोपीचा किस्सा तर काँग्रेसच्या पूर्ण अधःपतनाचा द्योतक आहे.

Leave a Comment