लाचखोर ट्राफिक पोलिसांना आवर घाला

विरार दि.२३ ऑगस्ट – वसई-विरार परिसरातील दररोज वाढणारी वाहने व त्यातून होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कार्यरत असलेले वाहतुक पोलिसच मोठ्या प्रमाणात लाचखोरी करताना आढळत आहेत. रिक्षा व मोटारसायकलांना वाहतुक नियमांचे उल्लघंन केल्याचे कारणे दाखवत जबरदस्तीने पैसे उकळत आहेत. भ्रष्टाचाराने बरबटलेले वाहतुक  पोलिस  वाहतूक कोंडी सोडविण्यापेक्षा आपला खिशा भरण्यास मश्गुल असल्यामुळे सामान्य वाहनचालक आणि नागरिकांचे मात्र मोठ्याप्रमाणावर हाल होत आहेत.
गेल्या काही वर्षात वसई-विरार परिसरातील लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्याही वाढत आहे. दररोज वाढणार्‍या नव्या वाहनांमुळे शहरातील मुख्य रहदारीच्या रस्त्यांमध्ये दरदिवशी वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीला आवर घालण्यास नेमलेले वाहतुक  पोलिस कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे.  वसई-विरार परिसरात अनधिकृत रिक्षांचा मोठा सुळसुळाट आहे. किबहुना ट्राफिक पोलिसांच्या कृपादृष्टीनेच त्या बिनधास्त रस्त्यावर धावत आहेत. पोलिसांना या रिक्षा चालकाकडून महिनाकाठी नोटांचे पुंडके मिळत असल्यामुळे  रिक्षांवर कोण्त्याच प्रकारची कारवाई केली जात नाही. उर्वरित  सर्वसामान्य अधिकृत अशा रिक्षाचालक व मोटारसायकल चालक मात्र त्याच्या जाळ्यात सापडत आहेत. भ्रष्टाचाराने वरपासून खालपर्यंत माखलेले वाहतुक  पोलिस यांना जागोजागी अडवून वाहतुकीच्या नियमावर बोट ठेवत त्यांच्याकडून लाचरूपी पैसा उकळत असतात. त्यांना प्रथम रस्त्यात अडवून लायसन्स, गाडीच्या इतर कागदपत्रांची मागणीच्या नावे  त्यांच्याकडून १०० ते २०० रूपये उकळतात. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी येथील सर्वसामान्य वाहन चालक करीत आहेत.

Leave a Comment