
मुंबई २२ ऑगस्ट – जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत असतानादेखील देशातंर्गत चलनवाढ आटोक्यात येत नसल्याने रिझर्व्ह बँक ऑफ पुन्हा एकदा पतधोरणात हस्तक्षेप करीत रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे. १६ सप्टेंबर रोजी आरबीआयची तिमाही बैठक असून यावेळी व्याजदर अर्ध्या टक्क्याने वाढविले जाऊ शकतात.
महागाई दरात झपाट्याने वाढ होत आहे. १८ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात खाद्यान्नाचा महागाई दर ९.९० टक्क्यांच्या तुलनेत ९.०३ टक्के इतका नोंदविला गेला होता. एका आठवड्यातील खाद्यान्न महागाई दर कमी झाला असला तरी एकूणच महागाई सरकारच्या आणि रिझर्व्ह बँकेच्या आवाक्याबाहेर गेली आहे. विशेष म्हणजे मार्च २०१० पासून आतापर्यंत तब्बल ११ वेळा आरबीआयने रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात वाढ केली आहे. जुलै महिन्यात झालेल्या बैठकीवेळी आरबीआयने रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात प्रत्येकी अर्ध्या टक्क्याने वाढ केली होती. जागतिक स्तरावरील वित्तिय संस्था मॉर्गन स्टॅनलेने पतधोरणात हस्तक्षेप होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एकीकडे चलनवाढीशी दोन हात करताना वारंवार कराव्या लागणार्या दरवाढीमुळे विकासाच्या गतीवर परिणाम होण्याची अंदाज काही वित्तीय संस्थांनी व्यक्त केला आहे.