न्या. सावंत याना पूर्वीच होती खात्री!

पुणे -पत्रकारितेच्या जीवनातील काही प्रसंग आठवणीच्या कोंदणात ठेवावे असे असतात.बर्‍याच वेळा अगदी साध्या प्रसंगांना एक दोन मिनिटांचा निराळाच मोड येअून जातो आणि ते राष्ट्रीय महत्वाचे बनतात. अण्णा हजारे आणि त्यांनी आरोप केलेल्या चार मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपावर जो न्या पी बी सावंत यांचा आयोग नेमण्यात आला त्यांचा आणि अण्णांचा सावंत साहेबांच्या दारातील अर्ध्या मिनिटाचा एक प्रसंग मी आजही विसरू शकत नाही. एक आठवण म्हणून तर त्याला महत्व आहेच पण एक राष्ट्रीय प्रसंग म्हणूनही त्याला महत्व आहे.
आठ वर्षापूर्वी अण्णांनी जेंव्हा राज्यसरकारमधील मंत्री, सुरेशदादा जैन,डॉ पद्मसिह पाटील, नवाब मलीक आणि विजय कुमार गावित अशा चार मंत्र्यांनी केलेल्या महाभ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली त्यावर अण्णानी उपोषण केले आणि सरकारला चौकशी आयोग नेमावा लागला. हा आयोग केाणाचा असावा म्हणून जी नावे पुढे आली त्यात सरकारने न्या सावंत यांचे नाव दिले होते आणि अण्णांनी त्यांच्या नावावर होकारार्थी प्रतिक्रिया व्यक्त केली पण माध्यमात ज्या बातम्या आल्या त्यात अण्णा  हजारे यानीच न्या. सावंत यांची मागणी केली असे दिसत होते.त्यावर न्या. सावंत यांची प्रतिक्रिया अतिशय तिखट होती ते म्हणाले, अशा आयोगातून ज्यांची चौकशी करायची आहे, अशी व्यक्तीच जर न्यायाधिशांचे नाव सांगत असेल तर ती पद्धतच अतिशय अयोग्य आहे अशा आयोगावर मी काम करणे मला योग्य वाटत नाही, त्यांच्या प्रतिक्रियेच्या बातम्याही येअून गेल्या. तिसर्‍या दिवशी अण्णांनी पुण्याला आल्यावर न्या. सावंत यांना भेटण्याचा मनोदय जाहीर केला आणि आम्हा पत्रकारांचा सार्वजनिक कार्यक्रमात निवृत्त न्यायाधिशांशीही संबंध येत असल्याने आम्ही तो निरोप एका कार्यक्रमात न्या सावंत यांना सांगितला. त्यावर तर त्यांनी अधिक नाराजी व्यक्त केली ते म्हणाले, आपल्याला आवडणारा न्यायाधीश मिळावा म्हणून प्रयत्न करणे आणि तो नाही म्हणत असेल तर त्याच्या घरी भेटायला जाणे हे न्यायाच्या मूलभूत तत्वाच्या अगदी विरोधात आहे. तरीही ते घरी येणार असतील तर एका सभ्य नागरिकाचे घर या नात्याने मी त्यांचे स्वागत करीन पण ही  बाब मला आवडलेली नाही. ही प्रतिक्रिया आम्ही अण्णांना सांगितली त्यावर ते म्हणाले, त्याना काय करायचे असेल ते त्यांनी करु दे पण यात जो गैरसमजाचा भाग आहे तेवढा मी दुरुस्त करीन आणि त्यासाठी त्यांच्या घरी जाईन.
त्यानुसार न्या सावंत यांच्या बाणेररोडवरील एक बहुमजली इमारतीतील त्यांच्या फ्लॅटमध्ये जायचा कार्यक्रम निश्चत झाला. अर्थाच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची प्रचंड गर्दी, वाहिन्यांच्या ओबी व्हॅन्स हा सारा जमावडा त्यांच्या इमारतीच्या घरादारात हजर.. किमान पन्नास तरी वाहने असावीत. दिसताना अण्णा आले ते पत्रकारांची प्रचंड गर्दी घेअूनच आले असे वाटायला वाव होता. त्या बहुमजली इमारतीत ते लीफ्टमधून वर जात असताना काही पत्रकारांनी ‘अण्णा येत आहेत असा निरोप न्या सावंत यांना दिला. त्यावर त्यांची नाराजी तर अधिकच वाढली. अण्णांना यायचे असेल तर एकटे येवू दे ना अशी प्रचंड गदीं घेअून कशासाठी?  प्रत्यक्षात अण्णा आतजाण्याआधीच त्यांच्या घरात  सर्व वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी, छायाचित्रकारांनी आणि पत्रकारांनी आपापल्या सोयाची जागा पटकावली. काहींनी तर न्या सावंत यांची कसलीही परवानगी न घेता त्यांच्या घरातील स्वीच बोर्ड शोधून आपले प्लग लावून आपल्या सन गन लावल्या. ज्याना बाहेरचा बोर्ड मिळाला नाही त्यांनी घरातील पॅसेजमधील बोर्डावरही प्लग लावले त्यामुळे तर वहिनीसाहेबही नाराज झालेल्या दिसत होत्या.
    प्रत्यक्ष अण्णा आणि न्या सावंत यांचा जो संवाद झाला तो तर अतिशय रुक्ष होता.
‘या आपले स्वागत आहे बसा आपण-.न्या सावंत
अर्धा मिनीट झाल्यावर
आपण काय चहा घेणार की कॉफी घेणार -.न्या सावंत
नाही मी कांही घेणार नाही – अण्णा
ठीक आहे
पुन्हा दीड मिनिटाची स्तब्धता
बर का येणं केलं होतं-.न्या सावंत
वृत्तपत्रात ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार आपण या चौकशी आयोगावर न येण्याचे जाहीर केले आहे. हे जर काही  गैरसमजामुळे होत
 असेल तर दूर व्हावा म्हणून आलो होतो
त्यावर न्या सावंत म्हणाले, आयोग ठरविताना आपण माझ्या नावाचा आग्रह धरला असे मी वाचले. जी व्यक्ती न्यायदान करण्यातील एक बाजू आहे त्यांना जर न्यायाधीश आवडत असेल तर व ती व्यक्ती त्या नावाचा आग्रह धरत असेल तर तो प्रकार योग्य नाही. यात ज्यांच्यावर काही आरोप आहेत त्यांची बाजू ऐकून घेण्यावर त्याचा परिणाम होअू शकतो. असा प्रकारही न्यायदानप्रक्रियासंमत नाही.म्हणून मी नाही म्हटलेले आहे. त्यावर अण्णा उत्तरले‘ मला ही शंका आलीच. कृपया माझी बाजू आपण समजून घ्या. मी कोणाचेही नाव सुचविणे शक्यच नव्हते. सरकारच्या वतीने काही नावे आली आणि त्यात आपल्याला कोण योग्य वाटते असे विचारल्यावर मी आपल्या नावाला संमती दिली, येवढेच झाले. काही दैनिकात तुमच्या नावाची मागणी मीच केली असे आले आहे हे खरे आहे पण कांही दैनिकांनी सारा घटनाक्रमही दिला आहे.
त्यावर न्या सावंत यांची प्रतिक्रिया अशी होती की, तुम्ही हे सांगितल्यामुळे वस्तुस्थिती पुन्हा एकदा तपासून बघितले पाहिजे हे लक्षात आले.
हा सारा संवाद तेथेच संपला. नंतर अण्णा बाहेर पडले आणि त्यांना पोहोचवायला न्या सावंतही बाहेर आले. यावेळपर्यंतचा सारा घटनाक्रम सामान्य असाच होता. पण नंतर अण्णांना पोहोचवायला न्या सावंत लीफ्टच्या दारापर्यंत आले. लीफ्ट खालच्या मजल्यावरून  वर येत होती. त्या अर्ध्या मिनिटाच्या काळात जो संवाद झाला तो स्तिमित करणारा होता.
न्या सावंत म्हणाले, न्यायाधीश म्हणून पसंती कळविण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येणे मला अजिबात पसंत नव्हते पण त्याबाबतची माहिती घेणे हा विषय निराळा पण तुम्ही कधी भेटलात तर काही सांगावे असे मला गेल्या काही दिवसापासून वाटते आहे. ते म्हणजे. माहितीच्या अधिकाराचे कायदा करवून जे काम केले आहे ते महात्माजींनंतरचे दुसरे स्वातंत्र्ययुद्ध यशस्वी केले आहे. या संधीचा काय उपयोग आहे याचा अजून लोकांना परिचयही नाही पण एक गोष्ट मला निश्चत वाटते की,यामुळे अजून दहा वर्षानंतर या देशातील तरुण उभा राहील आणि आज ज्या ज्या बाबी समस्या म्हणून वाटत आहेत त्या सार्‍या तो बदलायला घेईल.
यावर अण्णांनी किचित स्मितहास्य केले. बाकी काही भावना चेहर्‍यावर नव्हती. जातानाचा निरोपाचा नमस्कार झाला आणि येवढे म्हणेपर्यंत खालच्या मजल्यावरील लीफ्ट वर आली. आम्हीच कोणी तरी लीफ्टचे दार उघडले आणि एका मिनिटात आम्ही खाली उतरून मार्गस्थ झालोही.
त्या दिवसाच्या बातम्यात मी या संवादाचा उल्लेखही केला. हा संवाद मात्र मनात आत खोलवर जपून ठेवावा,असा वाटला. पण त्यावेळी तो संवाद मला महत्वाचा वाटला त्यापेक्षा आज तो अधिक महत्वाचा वाटत आहे. कारण न्या सावंत यांनी म्हटल्याप्रमाणे आज देशातील तरुण फारच मोठ्या प्रमाणावर उभा राहताना दिसत आहे. या देशातील तरुण अण्णांच्या जीवनमूल्यांनी भारून उभा राहील,असे आठ वर्षापूर्वी कोणी सांगितले असते तर त्यावर कोणीही विश्वास ठेवला नसता. आज तर त्याची प्रचीती येत आहे. त्याहीपेक्षा आठ वर्षापूर्वी माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचे महत्व एक चांगला कायदा येवढेच होते. पण न्या सावंत यांना तो कायदा दुसर्‍या यशस्वी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासारखा वाटला आणि हेही त्यांच्या अनुभवी दृष्टीला दिसले की, अजून दहा वर्षनी या देशातील तरुण फार मोठ्या प्रमाणावर त्यासाठी उभा राहील.
    न्या सावंत हे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते, नंतर तीन वर्षे ते भारतीय प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष होते आणि नंतर आंतरराष्ट*ीय प्रेस कौन्सिलचेही अध्यक्ष होते. आपल्याला न पटणारी बाब ते अतिशय स्पष्टपणे सांगतात. त्या चार मंत्र्यांच्या संदर्भात न्या.सावंत यांनी काही संदर्भात अण्णांच्यावरही कठोर टीका केली आहे. तरीही राष्ट*ीय आणि आंतरराष्ट*ीय पातळीवर दीर्घकाळ न्यायदान केलेल्या त्यांच्या सारख्या व्यक्तीला अण्णांच्या लढ्याला या देशातील तरुण जबरदस्त प्रतिसाद देईल याची जाणीव झाली होती यातील दोष काढायचा झाला तर न्या सावंत म्हणाले आणि दहा वर्षे आणि ते तर आठ वर्षातच झाले, असा दोष काढता येईल.
देशोदेशीचे अण्णा हजारेच त्या त्या देशाच्या राष्ट*वादाची संहिता समृद्ध करत असतात. पंचवीस वर्षापूर्वी पोलंडमध्ये लेक वॉलेसा याने केलेले काम ंअसेच आहे. ब्रह्मदेशच्या म्हणजे म्यानमारच्या स्यु की यांचा असाच लढा आहे. त्यानी तर गेल्या आठवड्यात डोक्यावर गांधी टोपी घालून ‘मै. अण्णा हजारे हू अशी प्रतिक्रिया दिली. त्याना त्यांच्या संसदेत निर्विवाद बहुमत मिळूनही त्यांचा मुक्काम त्यांच्या त्यांच्या देशाच्या राळेगणसिद्धीत नजरकैदेतच आहे. ही मंडळी बहुतेक वेळा आंदोलनात असतात आणि तेथे नसतात तेंव्हा ती नजरकैदेत असतात.त्यांना त्या त्या देशाचे पंतप्रधान आश्वासने देत असतात पण सारी न पाळण्यासाठीच असतात. आपले पंतप्रधान गेली  पाच वर्षे दर अधिवेशनात ‘अमुक अमुक कारणासाठी भाववाढ होण्याची शक्यता आहे असे सांगत आले आहेत ती लवकरच कमी होईल, असेही ते संागतात पण त्यांचे पहिले आश्वासन वेळेआधीच पूर्ण होते आणि दुसरे आश्वासन कधीच पूर्ण होत नाही. आजची प्रचंड महागाई आहे ती प्रचंड भ्रष्टाचाराची परिणती आहे हे सध्याच्या अण्णांच्या आंदोलनाला मिळणार्‍या प्रतिसादाचे ते तेवढेच महत्वाचे कारण आहे.
– मोरेश्वर जोशी, पुणे

Leave a Comment