जागृतीला व्यापक रूप द्या

लोकपाल विधेयकाच्या बाबतीत अण्णा हजारे जे काही म्हणत आहेत ते तंतोतंत खरे आहे. या निमित्ताने   सरकार जे काही म्हणत आहे ते पूर्णपणे खोटारडेपणाने भरलेले आहे. तो सरळ सरळ खोटेपणा आहे. अण्णांच्या जनलोकपाल विधेयकाने भारतातल्या भ्रष्टाचाराला मोठा सुरूंग लागणार आहे आणि आता भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांच्या ढिगावर बसलेल्या या सरकारला हे जन लोकपाल विधेयक फार महाग पडणार आहे. अण्णांनी २००५ साली आपले प्राण पणाला लावून माहितीच्या अधिकाराचा कायदा करायला लावला. तोच या चोरांना इतका महागात पडला आहे. त्यांना आता चोरून काही कारभार करणे अवघड चालले आहे. महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री या कायद्यामुळे दानाला गेले आहेत. केरळात पक्षाने सत्ता मिळवली पण तिथल्या मुख्यमंत्र्यांचा पामतेल आयातीत हात आहे का याचा तपास करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. माहितीचा अधिकार नसता तर अशोक चव्हाण गेले नसते.

याच कायद्याने ए.राजा आत गले आहेत आणि कलमाडीही तिहारचा पाहुणचार सोसत आहेत. या प्रत्येकाला आत घालताना माहितीचा अधिकार वापरणारे लोक माजी मंत्री, निवृत्त सनदी अधिकारी आणि प्रतिष्ठित दैनिकांचे ज्येष्ठ  पत्रकार असे पोचलेले होते. पण आता अण्णा म्हणतात त्याप्रमाणे सामान्यातला सामान्य माणूस उठून जिल्हा पातळीवरच्या लोकपालाच्या कार्यालयात जाऊन आमदार खासदारांच्या विरोधात तक्रारी करायला लागला तर इतके खटले न्यायालयात दाखल होतील की न्यायाधीशांनी ओव्हर टाईम केला तरीही ते खटले आटोपणार नाहीत. इतके हे सत्ताधारी नेते भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. तेव्हा  आपल्या या भवितव्याची जाणीव झालेले नेते आता आपला प्राण पणाला लावून अण्णांचे विधेयक येऊच देणार नाहीत.म्हणून आता अण्णांनी त्यांना भरपूर उघडे पाडून त्यांची नियत खराब आहे हे लोकांना पटवून सांगितले पाहिजे. ते अण्णा सांगत आहेतच. आज आपल्या देशात सामान्य माणसेही एका विधेयकाच्या मसुद्यावर चर्चा करायला लागली आहेत. अण्णांच्या जागृतीचा हा परिणाम आहे.

आज काही सरकार धार्जिणे बुद्धिवादी लोक अण्णाच्या मागे आलेल्या जमावाला चेहरा नाही, निश्चित ध्येय नाही अशी छुपी टीका करीत आहेत. अण्णांनी केलेली जनजागृती ही एवढी व्यापक आणि प्रभावी आहे की तिच्यापुढे या बुद्धीवादी जिभा लुळ्या पडल्या आहेत पण, सरकारला खुष करण्यासाठी हे लोक अण्णांची वरकरणी स्तुती करीत करीत का होईना पण या अभूतपूर्व आंदोलनाबाबत विषपेरणी करीत आहेत. शेवटी कोणताही कायदा करण्याचा अधिकार संसदेचा असतो, अण्णा चांगले आहेत पण, हटवादी आहेत,  जनलोकपाल विधेयक पास झाल्याने सगळा भ्रष्टाचार संपणार नाही, अण्णांच्या भोवती जमाव जमला आहे, त्याला चेहरा नाही अशी वाक्ये टाकून हे भाडोत्री लोक या जागृतीला अपशकून करीत आहेत. खरे तर जनतेच्या जगण्यावर परिणाम करणारे एक विधेयक कसे असावे यावर जागृती झालेला  आणि काही तरी कृती केल्याखेरीज भ्रष्टाचाराला सुरूंग लागणार नाही याची खात्री पटलेला तसेच तो सुरूंग लावण्यास आतुररेला हा जनसमुदाय आहे. त्याला चेहरा नाही वगैरे वाक्ये ही निव्वळ कुठल्या तरी इंग्रजी वाक्यांची  शब्दशः कलेली भाषांतरे आहेत. ही मंडळी सरकारला विकली गेली आहेत आणि सरकार काही भ्रष्टांना शरण गलेले आहे. अण्णांनी या लोकांच्या विरोधात आंदोलन करून त्यची लायकी आणि विशेषतः भ्रष्टाचार निर्मुलना बाबतची नियत लोकांना दाखवून द्यावी. पण त्यांच्याशी  बरोबरीच्या नात्याने चर्चा करून हा कायदा पूर्णपणे तसाच अंमलात आणता येईल अशी अपेक्षा करू नये. हे लोक भोळ्या भाबड्या लोकांवर जात, भाषा, पैसा आणि भीती यांचा वापर करून निवडून आले आहेत आणि ते आजच्या घडीला नाईलाजाने का होईना पण सत्तेवर आहेत. त्यांना उघडे पाडून अण्णांनी आता अंशतः काही तरी पदरात पाडून घेऊन पुढच्या आंदोलनाचा कार्यक्रम नक्की करावा. 

आताची जनतेची जागृती पाहिली असता ही जनता आता काही तरी विचार करायला लागली आहे असे दिसते. आपण नागरिक आहोत म्हणजे दर पाच वर्षाला एकदा मतदान करणे हेच आपले कर्तव्य आहे या भ्रमातून ही जनता जागी झाली आहे. आपण, निवडून दिलेले लोक नीट वागत नसतील तर त्यांना आपण संघटितरित्या काही तरी करून वठणीवर आणले पाहिजे ही जाणीव आता लोकांत वाढायला लागली आहे. एवढेच नव्हे तर आपण उठाव केला तर या मंडळना वठणीवर आणता येते याचा साक्षात्कार झाल्याने या लोकांचा आत्मविश्वासही वाढीला लागला आहे. ही झालेली जागृती कौतुकास्पद आहे. तेव्हा ती वाढवत नेण्यासाठी अण्णांनी आता व्यापक कार्यक्रम हाती घेतला पाहिजे आणि ही जागृती परिपक्व लोकशाहीची संकल्पना  अंमलात आणण्यासाठी वापरली पाहिजे. अण्णांचा सद्हेतू  सत्ताधार्‍यांना न मानवणारा आणि पेलवणारा आहे.अण्णांनी या सत्ताधार्‍यांची लायकी सिद्ध केली आहे.तेव्हा आताची कोंडी फोडून अण्णांनी अधिक व्यापक आंदोलनाकडे पावले टाकली पाहिजेत.

Leave a Comment