काँग्रेस शरण चिरंजीवी

आंध्र प्रदेशातल्या प्रजा राज्यम पार्टीचे नेते, संस्थापक, चित्रपट अभिनेते चिरंजीवी यांनी काल दिल्लीत कॉँग्रेसमध्ये रीतसर प्रवेश केला. तसा त्यांचा हा प्रवेश अपेक्षितच आहे. कारण गेल्या फेब्रुवारीत त्यांनी तसा निर्णय घेतला होता. हा निर्णय आता केवळ प्रत्यक्षात अंमलात आणला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा म्हणजेच सदस्य नोंदणीचा अर्ज भरून दिला. दुसर्‍या पक्षातला माणूस काँग्रेसमध्ये येतो तेव्हा नवीन असतो आणि पक्षातला रीतीरिवाज त्याला माहीत असेलच असे काही नाही. नंतर रुळायला फार दिवस लागतात. मात्र चिरंजीवी यांनी सराइताप्रमाणे पक्षात प्रवेश करताच राहुल गांधी यांची अफाट स्तुती करून ते भावी पंतप्रधान म्हणून ग्रेट आहेत अश स्तुतीसुमने उधळली. खरे तर चिरंजीवी यनी आंध्र प्रदेशात काँग्रेस धोक्यात आली तेव्हा या पक्षात आपला पक्ष विलीन करण्याचा विचार बोलून दाखवला होता. तो प्रत्यक्षात आता अंमलात आणला जात आहे पण दरम्यानच्या सहा महिन्यात स्थिती इतकी बदलली आहे की आता त्यांच्या काँग्रेस पक्षातल्या प्रवेशाचा फारसा उपयोग होणार नाही.

गेल्या वर्षी जनग मोहन रेड्डी हे काँग्रेस पक्षातच होते. पण त्यांनी आत राहूनच गडबड सुरू केली होती. ते कोणत्या क्षणी आपल्या २६ समर्थक आमदारांसह पक्षाच्या बाहेर पडतील आणि राज्यातल्या सरकारला अस्थिर करतील याचा काही नेम सांगता येत नव्हता. अशा स्थितीत सरकार टिकावे म्हणून काँग्रेस श्रेष्ठींनी चिरंजीवी यांना साद घातली. कारण चिरंजीवी यांच्या हातात १८ आमदार होते. जगन मोहननी २६ आमदार सोबत नेले तर हे १८ आमदार बहुमत टिकवण्यास उपयोगी पडतील अशी काँग्रेस श्रेष्ठींना खात्री होती. चिरंजीवी यांनाही ते माहीत होते. त्यांनाही आपली गाजराची पुंगी वाजत नाही तेव्हा मोडून टाकावी आणि काँग्रेसमध्ये जावे असे वाटायला लागले होते आणि ते काँग्रेसश्रेष्ठींच्या  सादाची वाटच पहात होते. ती येताच त्यांनी प्रतिसाद दिला. दरम्यानच्या काळात जगनमोहन बाहेर पडले आणि तरीही सरकार पडत नाही हे श्रेष्ठींच्या ध्यानात आले.

आता चिरंजीवी यांनी काँग्रेसमध्ये यावे ही काँग्रेसपेक्षा चिरंजीवी यांची गरज झाली आहे. त्यांनी आपला स्वतःचा राजकीय पक्षा काढला होता. या पक्षाची स्थापना करताना आणि नंतरही घोषणाबाजी करताना ते एन.टी. रामाराव यांची नक्कल करीत होते. त्यांचे समर्थक आणि अनेक लोक त्यांना सेकंड एन.टी.आर. असे म्हणायलाही लागले होते. १९९३ साली रामाराव ज्या नाट्यमयरित्या सत्तेवर आले तसे आपणही मुख्यमंत्री होऊ अशी स्वप्ने ते पहात होते. पण तसे काही घडले नाही. कारण त्यांनी रामाराव यांच नक्कल केली तरी दोघांच्या काळात २५ वर्षांचा फरक  पडला होता. त्या फरकाचे भान त्यांना राहिले नाही. रामाराव यांनी तेलगु देसमची स्थापना केली तेव्हा राज्यात  काँग्रेसला पर्याय नव्हता. त्यामुळे तेलुगु जनतेने रामाराव यांना पटकन स्वीकारले. त्यांच्या हातात १० वर्षे सत्ता दिली. चिरंजीवी यांनी आपला पक्ष स्थापन केला तेव्हा स्थिती तशी नव्हती. काँग्रेसला पर्याय होता. त्यामुळे चिरंजीवींची प्रजा राज्यम पार्टी सत्तेत आली नाही. उलट तिने मतांची विभागणी करून काँग्रेसला पराभवातून वाचवले. २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत हा पक्ष नसता तर काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणे मुष्कील होते. काँग्रेस सत्तेवर आली आणि चिरंजीवी यांची निराशा झाली. 

रामाराव यांच्या सारखा चमत्कार काही नेहमी होत नसतो तेव्हा तसा आपल्याला करता आले नाही म्हणून चिरंजीवी यांनी निराश होण्याचे काही कारण नव्हते. त्यांनी अजून चिकाटीने काम करून, जनतेत आणखी स्थान मिळवून पुढे वाटचाल करायला हवी होती.  त्यांनी तसे केले नाही.  काँग्रेसलाच शरण जाण्याचे ठरवले. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाचा काही ना काही फायदा काँग्रेसला होईल हे नक्की पण आता तो फायदा पदरात पाडून घेण्याची क्षमता काँग्रेस पक्षात राहिलेली नाही. तेलंगण निर्मितीच्या  फियास्कोमुळे आंध्रातली काँग्रेस दुभंगली आहे. या पेचातून आता कशी सटका करून घ्यावी असा पेच काँग्रेससमोर उभा आहे. चिरंजीवी यांनी आपल्या पक्षाचे धोरण जाहीर केले तेव्हा हे सारे राजकारण शिजले नव्हते. त्यामुळे चिरंजीवी यांनी आपला पक्ष अखंड आंध्र प्रदेशाचे समर्थन करीत असल्याचे  जाहीर कले होते. आता त्यांची स्थिती काय आहे हे माहीत नाही पण काँग्रेस पक्षही अखंडवादी आहेत. परिस्थितीच्या रेट्यापुढे मुळात काँग्रेसचेच धोरण आहे तसे टिकते की नाही हा प्रश्न आहे. त्यानुसार चिरंजीवी यांनाही आपले धोरड बदलावे लागेल. चिरंजीवी यांनी तिरुपती शहरात झालेल्या पक्ष स्थापनेच्या सभेत आपला लांबलचक कार्यक्रम जाहीर करताना आपला पक्ष सामाजिक परिवर्तनाला आणि गरीब माणसाच्या कल्याणाला प्राधान्य देईर्ल अशी घोषणा केली होती. पण अशा शब्दांना काही किमत नसते. कारण गरिबांच्या कल्याणाची घोषणा करणारे  चिरंजीवी आता गरिबांच्या अंगावरून महागाईचा वरवंटा फिरवणार्‍या काँग्रेसमध्ये आले आहेत. अशा टोप्या फिरवणार्‍या नेत्यांना राजकारणातून उचलून टाकले पाहिजे.

Leave a Comment