आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा

राळेगण सिद्धी -भीमरूपी या स्तोत्रात मारुतीचे वर्णन असे आहे की,‘आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा’ राळेगणच्या लोकांना आज रामदासस्वामी यांच्या स्तोत्राची आठवण होत आहे.आपल्या गावचा गेल्या पिढीतला किसन, की ज्याला साठ वर्षापूर्वी अंगावर पुरेसे कपडेही नसत नी शिकायला जायचे म्हटले तर कोठेतरी तालुक्याच्या गावी शाळा असे.व जाणेही कठीण असे म्हणून आपल्या किसनने केंव्हा तरी पलटणीत प्रवेश केला.तो पलटणीत गेला केंव्हा आणि आला केंव्हा यांच्या तारखाही फारशा कोणाला आठवत नाहीत पण आला तो बारा हत्तीचे बळ घेअूनच आला.दहा वर्षात गावाचे रूप बदलले एकोणीसशे नव्वदपर्यंत गावाचा कायापालट झाला होता अण्णांचे नाव राज्यात परिचित व्हायला आरंभ झाला होता.पण एकोणीसशे ब्याण्णव साली एक चमत्कार घडला.त्याचे असे झाले की, ४२ सालच्या ‘छोडो भारत’च्या सुवर्णमहोत्सवाचा कार्यक्रम कसा करायचा यासाठी मुंबईत त्यावेळचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी एक समिती बोलावली. त्यात गेल्या पिढीतील थोर स्वातंत्र्य सेनानी अच्युतराव पटवर्धंन यांचा समावेश होता. त्यांनी वडिलकीच्या नात्यांने सर्वांनाच जरा दरडावलेच.अरे.! ’ स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे झाली तरी आपण अजून लोकांच्यासाठी किमान बाबी करू शकलो नाही. अशी स्थिती असताना सुवर्ण महोत्सव कसले साजरे करताय.! जर तुम्हाला भारत छोडोचा  महोत्सव खरेच साजरा करायचा असेल तर ज्यांनी आदर्श गाव उभे करून तुम्हा सर्वांच्या डोळ्यात अंजन घातले आहे अशा अण्णा हजारे यांना राळेगण सिद्धीसारखी तीनशे गावे उभी करण्यासाठी सारी शक्ती एकवटून द्या. तीनशे गावे द्या म्हणजे पंचवीस वर्षांनी पन्नास गावे तरी टिकतील. त्या बैठकीला बाळासाहेब भारदे उपस्थित होते बाळासाहेबांनी जाहीर सांगून टाकले की, अण्णांना जर काही अडचण आली तर मी मदत करेन. त्याप्रमाणे आज पन्नास गावे राळेगण सिद्धीशी  थोडेफार नाते सांगण्याच्या स्थितीत आहेत.
अशी झाली अण्णांच्या आदर्श गाव योजनेची सुरुवात .या आदर्श गाव योजनेचे काय झाले तर सुरुवात अप्रतीम झाली पण नंतर दोन वर्षांनी सरकारलाच अण्णा डोईजड वाटू लागले. एका बाजूला एका महामंडळाचे अध्यक्ष असताना म्हणजे राज्यमंत्र्याचे सारे मानसन्मान आणि लाल दिव्याची गाडी असतानाही अण्णा त्यात अजिबात सुखावले नाहीत राज्यातील निरनिराळी भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढण्याचा त्यांनी सपाटा लावला.अगदी राळेगणच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘ग्रामसेवक म्हणू नका, सर्कल ऑफिसर म्हणू नका, मामलेदार म्हणू नका कि मंत्री म्हणू नका.ज्या सुधाकर नाईक यांच्या कृपेने त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला त्यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांचे भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढले. त्यामुळे शासकीय जीवनशैलीत वाढलेल्यांना अण्णांचे हे वागणे हा ‘दुहरी मापमंड वाटू लागला.अनेकांनी त्या खडसावले की,एक म्हणजे तुम्ही सरकारमध्ये असा किवा राजीनामा देअून मोर्चात सामील व्हा’ अण्णांना असला सल्ला मान्य नव्हता. ते म्हणाले, आदर्श गाव मंडळावर मला नेमा असे सांगत मी काही तुमच्या दारी आलो नव्हतो. तुम्ही जी योजना केली आहे ती मला प्रामाणिक वाटते त्यामुळे मी ती स्वीकारली आहे. आता पूर्ण झाल्याखेरीज सोडणार नाही. आदर्श गावसाठी बर्‍याच गावातील लोकांचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. तेथील महिलांना पाणी आडवा पाणी जिरवा यांचे शिक्षण देउन झाले आहे. आता आपल्या भागात डॉक्टर फिरकू न देण्यासाठी महिलांनी आरोग्यसेविका कसे व्हायचे याचे शिक्षण देणे सुरु झाले आहे. अजून जनावरांचे आजार,खेड्यातील संडासाची स्वच्छता, गोबर गॅस प्लँट उभारणी आणि दारुड्यांची व्यसने कशी घालवायची यावरची प्रशिक्षणे राहिली आहेत.प्राथमिक शाळतील मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा यासाठी माध्यमिक शाळेतील मुलांना तयार करायचे रहिले आहे. या सार्‍यासाठी बरीच कामे राहिली आहेत. तुमची सरकारी माणसे फक्त काम झाले यावर टिक मार्क होण्यापुरते काम करतात. पण मी त्यांच्याच मदतीने हे सारे करणार आहे.’ अण्णा ठाम आत्मविश्वासाने सांगत होते पण दोन्हीमधील पर्याय निवडा असा पर्याय जेंव्हा अण्णांच्या पुढे ठेवण्यात आला तेंव्हा अण्णांनी निमिषार्धात आदर्शं गाव योजनेचा राजीनामा दिला आणि त्या वेळी मोठा भ्रष्टाचार केलेल्या चार मंत्र्यांनी राजीनामा द्यावा म्हणून  आमरण उपोषण सुरु केले. यातील तपशीलाचा भाग मोठा आहे पण एकच झाले की, त्या चारही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला.
     हे सारे होत असताना आदर्श गाव योजनेला देशभर प्रसिद्धी मिळू लागली होती. जगभरातील अनेक संस्था राळेगण सिद्धीला भेटून गेल्या होत्या. त्याचा परिणाम असा झाला की, देशातील अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांना या आदर्श गाव योजनेचे आकर्षण वाटू लागले होते. त्याचा त्यांच्या दृष्टीने फायदा असा होता की, त्यांच्या आदर्श गाव योजनेचा फायदा घेता येणार होता आणि अण्णा त्या राज्यातील नसल्याने भ्रष्टाचार निर्मूलनाची कटकट(!) होणार नव्हती त्याचा परिणाम असा झाला की, देशातील बारा राज्यातील मुख्यमंत्र्यांनी आपले अधिकारी किवा मंत्री पाठविले. त्यातील सर्वात सुखद अनुभव होता तो शेजारी राज्य असलेल्या आंध्रप्रदेशाचे त्या वेळचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा. त्यांनी अनुभवी अधिकारीही पाठविले नाहीत की,कोणी मंत्रीही पाठवले नाहीत तर स्वतःच  येण्याचे ठरविले. ते आले येवढेच नाही तर तीन दिवस मुक्काम करून प्रत्येक गोष्ट बघून घेतली. नंतर त्यांनीही आंध्रात सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्प तयार करून तो त्यांच्या पद्धतीने राबविला. आज गुजराथ, राजस्थान, ओरिसा आश्चर्याची बाब म्हणजे गेले काही दिवस अण्णांच्या जनलोकपालविधयेकावर टिपणी करणारे त्यावेळचे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजय सिग यांच्या राज्यात अण्णांनी सुरु केलेले आदर्श गाव योजनेचे काम सुरु आहे.
अण्णांच्या रचनात्मक कामायेवढीच आंदोलनात्मक बाजूही आहे. आजपर्यंत त्यांनी राज्यातील आठ मंत्री,आणि साडेचारशे भ्रष्टाचारीअधिकारी घरी पाठविले आहेत.अनेक संस्थातील भ्रष्टाचार स्वच्छ केला आणि अनेक संस्थावर कायम अंकूश आहे. आज अण्णांनी आज जनलोकपालविधयेकाला सुरुवात केली आहे.त्यापूर्वी त्यांचा माहितीच्या अधिकाराच्या आंदोलनाचा अनुभव मोठा आहे. पण यावेळी सार्‍या देशापुढे एक मुद्दा आहे की,पस्तीस वर्षापूर्वीचा जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातील काही अनुभव सोडला तर सध्या अण्णाना देशातून मिळणारा तरुणाईचा प्रतिसाद फार मोठा आहे. त्यांनी आता हातात मशाल घेतली आहे.एवढेच  नव्हे तर अण्णांनीच त्यांना ‘ मी असेन किवा नसेन पण ती मशाल विझू देवू नका असे आवाहन केले आहे.  कदाचित हे आंदोलन यशस्वी होईल किवा काही काळानंतर पुन्हा सुरु करावे लागेल.यातील महत्वाचा मुद्दा हा जाणवतो की, अण्णांचा आंदोलनाचा पुढचा  टप्पा काय असेल, जयप्रकाश नारायण यांचे संपूर्ण क्रांतीचे आंदोलन त्यात सहभागी झालेल्या त्यांच्याच शिष्यांने हाणून पाडले. अण्णांना आजच सावध राहावे लागेल कोणी तरी अधू मेंदूचा मधू भेटणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
पण एक गोष्ट आज आश्वासक वाटते आहे ती म्हणजे गेल्या तीस वर्षात अण्णा सतत रचनात्मक आंदोलन आणि संघर्ष यांचा अनुभव घेण्यातूनच पुढे आले आहेत. त्यामुळे उद्या राष्ट्रीय पातळीवर युवकांचे रचनात्मक काम उभे करण्याचे प्रसंग आले तरी अण्णा तरीही यश मिळवून देतील यात शंका नाही. तरीही दोन बाबी विषयी उत्कंठा मात्र आहे ती म्हणजे त्यांनी ‘जेथे गांधीजी यांचा मार्ग चालणार नाही तेथे शिवाजी महाराज यांची भाषा वापरण्याचा हक्क अण्णांनी राखून ठेवला आहे. तसेच महात्माजींचा सविनय कायदेभंग याचा त्यांनी यापूर्वी वापरही केला आहे त्यामुळे सध्याच्या जनलोकपालविधेयकानंतर त्यांची पावले काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अर्थात ती वेळ येईपर्यंत वाटच बघावी लागेल.
– मोरेश्वर जोशी, पुणे

Leave a Comment