अण्णा हजारे यांच्या समर्थनासाठी पुण्यात कारागृह भरा आंदोलन

पुणे दि.२० ऑगस्ट – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाची पाचव्या दिवशीही केंद्र सरकारने दखल घेतलेली नाही. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांचे बळ वाढविण्यासाठी अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाच्या पुणे युवा विभागाच्या वतीने २२ ऑगस्ट रोजी पुण्यात कारागृह भरा आंदोलन होणार आहे. युवा मंचाचे पुणे शहराध्यक्ष सिध्दार्थशंकर शर्मा यांनी ही माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.
माहितीचा अधिकार प्रभावी असला तरी त्यात केवळ भ्रष्टाचार उघड होतो. भ्रष्टाचार करणार्‍यांवर कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही. ही कारवाई होण्यासाठीच जनलोकपालाचे विधेयक संसदेत मांडणे आवश्यक आहे. वेळ पडली तर मतदानही घ्यावे, अशीच अण्णांची प्रथमपासून भूमिका होती. त्यासाठी त्यांचे उपोषण सुरू आहे. अण्णा संविधानाचे उल्लंघन करत नसून शासनाचा आरोप चुकीचा आहे. शासन अण्णांचे आंदोलन चिरडत आहे, असे शर्मा यांनी सांगितले.

Leave a Comment