अजित पवार म्हणतात अण्णा हजारे यांना अटक करायला नको होती

मुंबई दि.२० ऑगस्ट – अण्णा हजारे यांना अटक करायला नको होती,असे वादग्रस्त विधान करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. लोकशाहीमध्ये कुठल्याही व्यक्तीला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. उपोषण करण्याचा अधिकार आहे. अण्णांना आंदोलनापूर्वीच अटक करुन नंतर त्यांना मुक्त केले, हे सांगणे बरोबर नव्हते, असा टोला अजित पवारांनी काँग्रेसला लगावला आहे.

अण्णा हजारे यांनी उपोषण करण्यापूर्वी सरकारला पुरेशी सूचना दिली होती. महाराष्ट्रतही अण्णांनी आतापर्यत अनेक आंदोलने केली. मात्र प्रत्येकवेळी सरकारने चर्चेने आणि सामोपचाराने ही आंदोलने सोडवली आणि मार्ग काढला, असे पवार यांनी सांगितले. केंद्रात आणि राज्यात जरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे आघाडीचे सरकार असले तरी अण्णांचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारितील असल्याने त्यांनी आमच्याकडे मदत मागितली नाही. मात्र महाराष्टातून केंद्रात गेलेले ८ ते ९ मंत्री आहेत, त्यांच्याशी चर्चा होऊ शकली असती. केंद्र सरकारने अण्णांशी चर्चा करण्यासाठी जी समिती नेमलेली आहे, त्यात विरोधी पक्षांचे सदस्य घ्यायला हवे होते, असा भीमटोला पवार यांनी हाणला.

या आंदोलनाचा फटका कुठल्याही पक्षाला बसणार नाही कारण अण्णा हे आंदोलन सरकार पाडण्यासाठी करीत नसून  जनलोकपाल विधेयकासाठी करीत आहेत. त्यांचा कुठल्याही पक्षाला विरोध नाही, असे सांगून अजित पवार म्हणाले की, अण्णाच्या आंदोलनातून मार्ग निघणारच नाही, असा नकारात्मक विचार कोणी करु नये. मावळ  प्रकरणानंतर गृहखाते बदलाची चर्चा वेगाने सुरु झाली आहे, या चर्चेला पूर्णविराम देत पवार म्हणाले की, या चर्चा फक्त वर्तमानपत्रातून होत आहेत. प्रत्यक्षात असा कुठलाही खातेबदल करण्याचा प्रश्न नाही. पक्षात कुठलेही मतभेद नाहीत.

Leave a Comment