अण्णांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वेदना झाल्या – मारुती हजारे

राळेगण सिद्धी दि.१७- समाजसेवक अण्णा हजारे यांचे धाकटे बंधू मारूती हजारे यांनी अण्णांवर भ्रष्टाचाराचे जे आरोप केले गेले त्यामुळे वेदना होत असल्याचे तसेच अण्णांच्या मागण्या केंद्र सरकारला मान्य करणे भाग पडेल कारण अण्णा महिनाभरही उपोषण करू शकतात असे वक्तव्य केले आहे. अण्णांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍या कपिल सिब्बल यांच्यासारख्या मंत्र्यांनी त्यांची दिल्लीतील आलिशान निवासस्थाने सोडून राळेगण सिद्धीला यावे व येथे १ दिवस राहून दाखवावे, येथे अण्णांनी केलेले काम पाहावे आणि मगच त्यांच्यावर कोणतेही आरोप करावेत असे आव्हानही दिले आहे. अण्णांनी कोणतीही वैयक्तिक मालमत्ता गोळा केलेली नाही असे सांगून ते म्हणाले की अण्णा त्यांच्या आंदोलनापासून कधीच ढळणार नाहीतच पण माघारही घेणार नाहीत. केंद्र सरकारने अण्णांना अटक केल्याचा निषेध व्यक्त करायला आपल्याकडे शब्दच नाहीत असेही ते म्हणाले.
  अण्णांना या पायरीपर्यंत येण्यास सरकारनेच भाग पाडल्याचा आरोप करून त्यांनी केंद्र सरकारच भ्रष्टाचारी असल्याचे म्हटले आहे. अण्णांच्या आदेशाप्रमाणे आम्ही शांततेने आणि अहिसंात्मक मार्गाने आमचे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत असे सांगून ते म्हणाले की उपोषण अथवा जेल भरो, जे अण्णा सांगतील ते आम्ही करणार आहोत.

Leave a Comment