राजकारणाने खेळांनाही सोडले नाही-संजय सुरकर

नागपूर दि.१७ ऑगस्ट – राजकारणाने सर्वच क्षेत्रांचा ताबा घेतला आहे. त्याने खेळांनाही सोडले नाही. क्रिकेट, फूटबॉल, हॉकी अशा सर्व खेळात राजकारण शिरल्यामुळे गुणवत्ता, होतकरू असलेले खेळाडू मागे पडत आहेत. राजकारणाने सर्वच खेळांना नासविल्याचे ध्यानात आल्यामुळे स्टॅण्डबाय हा चित्रपट काढला आहे, असे उद्गार सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक संजय सुरकर यांनी काढले. चौकट राजा,  रावसाहेब, तू तिथे मी, घराबाहेर अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शक व चारवेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे नागपूरचे भूषण असलेले संजय सुरकर यांचा स्टॅण्डबाय हा हिदी चित्रपट येत्या २६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चित्रपटाच्या प्रमोशनासाठी संजय सुरकर यांच्यासह निर्माते प्रकाश चौबे, चित्रपट कलाकार दिनानाथ कोठारे व सिद्धार्थ खरे नागपूरला आले होते. उत्तम कथानक असलेले चित्रपटच चालतात, असे सांगताना संजय सुरकर म्हणाले की, सिनेमा हे सशक्त व कलांमध्ये सर्वश्रेष्ठ असे माध्यम आहे. लोक चित्रपट बघायला येतात म्हणजे ते कथा बघत असतात. त्यातील पात्रात ते स्वतःला बघत असतात. चित्रपटात फूटबॉलच का, असे विचारले असता प्रकाश चौबे म्हणाले की, आज २०० देश फूटबॉल खेळतात तर केवळ १२ देश क्रिकेट खेळतात. तरीही क्रिकेटलाच अधिक महत्त्व आहे. लोकांचे फूटबॉलकडेही लक्ष वेधले जावे, हा त्यामागचा उद्देश आहे.

खेळांमध्ये राजकारण आणू नये, त्याला स्वच्छ ठेवायला हवे, हा संदेश देण्याचा प्रयत्न चित्रपटातून केला असल्याचे ते म्हणाले. शाळेत फूटबॉल खेळलो असलो तरी चित्रपटासाठी त्याचे खास प्रशिक्षण घेतले असल्याचे आदिनाथ कोठारे याने सांगितले. सिद्धार्थ मात्र फूटबॉलचा फॅन आहे. घानासारखे छोटे देश विश्वचषकात खेळताना पाहिल्यावर भारताची टीम आसपास कुठेही दिसत नसल्याची खंत मनात होतीच. ‘स्टॅण्डबाय’ फूटबॉलकडे देशाचे लक्ष वेधून घेईल, असा विश्वास सिद्धार्थने व्यक्त केला.

 

Leave a Comment