भ्रष्टाचारी राजकारण्यांचा निघणार बडग्या

नागपूर दि. १७ ऑगस्ट – समाजातील द्रुष्ट प्रवृत्तींचा निषेध करणारा बडग्या यंदा भ्रष्टाचारी राजकारण्यांवर तोफ डागणार आहे. अण्णा हजारे आणि रामदेव बाबा यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनांमुळे हादरलेले राजकारणी आता बडग्या तयार करणार्‍यांच्या निशाण्यावर असणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये शेतकरी आत्महत्या, वाढती महागाई, दहशतवादाचा निषेध नोंदविणारा बडग्या असे बडगे तयार केले जात असत. यंदा भ्रष्टाचाराचीच वरात निघणार यात काही शंका नाही. हा बडग्या तान्हा पोळ्याच्या दिवशी नागपूरात निघणार आहे.
पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी शहरात काळी-पिवळी मारबत आणि बडग्याची मिरवणूक काढण्यात येते. या मारबतीला तब्बल १२७ वर्षांची परंपरा आहे. तर बडग्याची परंपराही नागपुरात चाळीसहून अधिक वर्षांची आहे. दरवर्षी बारा-तेरा बडगे आणि आठ ते दहा मारबती काढण्यात येतात. काळ्या-पिवळ्या मारबतीला धार्मिक महत्त्व असून बडग्या मात्र वाईट गोष्टींची  उपहासात्मक प्रतिमा असते. बडग्यांच्या निशाण्यावर बहुतांशवेळा राज्यातील आणि देशातील राजकारणीच राहिलेले आहेत. दरम्यानच्या काळात शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे सरकारवर संताप व्यक्त करण्यासाठी या बडग्यांचा वापर करण्यात आला. यंदा मात्र गेल्या पाच महिन्यांपासून भ्रष्टाचार आणि काळा पैशाच्या मुद्द्यावर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाचा बंडग्यांच्या मिरवणुकीवर प्रभाव पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येत्या २९ ऑगस्टला मारबत आणि बडग्यांची मिरवणूक निघणार आहे. यंदा अण्णा हजारेंच्या आंदोलनाला विरोध करणारे केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह पंतप्रधान मनमोहनसिग यांच्यावरही बडग्यांच्या मिरवणुकीत गदा येण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Comment