अण्णा हजारे करतील भ्रष्टाचाराला खल्लास – ईशा कोपीकरचा विश्वास

नागपूर दि.१७ ऑगस्ट-एखादी गोष्ट सहनशीलतेचा अंत बघत असेल,तर त्याविरुद्ध लढा देण्यासाठी मैदानात उतरलेच पाहिजे.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचाराविरुद्धचे आंदोलन हा त्यातलाच प्रकार आहे. माझे या आंदोलनाला पूर्ण समर्थन आहे. अण्णांचे प्रयत्न भ्रष्टाचार संपविण्यास नक्कीच मदत करतील, असा विश्वास खल्लास गर्ल व प्रसिद्ध अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने बुधवारी येथे व्यक्त केला.
कंपनी चित्रपटातील खल्लास या आयटम साँगमुळे चर्चेत आलेल्या ईशाने अनेक हीट चित्रपटांच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख तयार केली. येत्या २६ ऑगस्टला तिचा शबरी चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तसेच फॅशनच्या दुनियेत पाऊल टाकण्यास उत्सूक असलेल्या तरुणांसोबत चर्चा करण्यासाठी ती इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिग येथे आली होती. त्यावेळी तिने व चित्रपटाचे दिग्दर्शक ललित मराठे यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. देशाच्या कल्याणासाठी रस्त्यावर उतरलेल्या अण्णांना आणि त्यांच्या समर्थकांना सरकारने अटक करणे दुर्देवी आणि निषेधार्ह आहे. पाणी डोक्यावरून जात असेल तर व्यवस्थेविरुद्ध अण्णांच्या स्टाइलने संघर्ष केलाच पाहिजे. माझ्या आगामी चित्रपटातील शबरी हे पात्रदेखील व्यवस्थेच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठीच गँगस्टर झालेले दाखविण्यात आलेले आहे. असे ईशाने सांगितले.
गँगस्टारची भूमिका साकारणारी ईशा ही बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री ठरणार आहे. अतिशय साधे आयुष्य जगणार्‍या एका महिलेसोबत अचानक एक वाईट प्रसंग घडतो आणि तिला गँगस्टार व्हावे लागते. मुंबईतील झोपडपट्टीत राहणार्‍या शबरी नावाच्या महिलेचे पात्र ईशाने साकारले आहे. कुठलीही महिला एका क्षणापर्यंत अन्याय सहन करते, असे तिने सांगितले.

Leave a Comment