अण्णांच्या समर्थनासाठी भंडारा जिल्ह्यात कडकडीत बंद

नागपूर दि.१७ ऑगस्ट – भ्रष्टाचाराविरोधात आवाज बुलंद करीत सक्षम जनलोकपाल विधेयक संसदेत मंजूर करावे,या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर विदर्भात त्यांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात बुधवारी जनतेने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. भंडारा जिल्ह्यात शिवसेना भाजप युतीने कडकडीत बंद पाळला.
नागपूरच्या रिझर्व बँक चौकात मंगळवारपासून अण्णा हजारेचे समर्थन त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्याकरिता उपोषणाला बसले आहे. बुधवारी १६ नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले तर उर्वरित समर्थकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला शाळकरी मुले, महाविद्यालयीन युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजसमोर सरकारचा निषेध करण्यासाठी काळ्या रंगाचे टी शर्ट परिधान करून पथनाट्ये सादर केली. शहरात ठिकठिकाणी युवा पिढी मोटरसायकलवरुन रॅली काढून, हातात तिरंगा व डोक्यावर गांधी टोपी घालून वंदे मातरम्चा घोष करताना दिसत होती.

Leave a Comment