आणि पंतप्रधान ऐकत राहिले…

काल अण्णा हजारे प्रकरणात सरकारची जी काही फजिती झाली ती इतकी निर्विवाद होती की अण्णांनी सरकारचा मामा केलाय हे लहान मुलालाही कळत होते.आज संसदेत यावर चर्चा झाली.त्यात विरोधकांनी सरकारवर हल्ले चढवले आणि सरकारला हे आंदोलन कसे नीट हाताळता आले नाही हे उदाहरणानिशी स्पष्ट केले. सरकारने काय करायला हवे होते हे अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि शरद यादव हे सांगत होते तेव्हा पंतप्रधान मनमोहनसिंग हे निमूटपणे ऐकत होते. त्यांच्या समोर काही पर्यायच नव्हता. सरकारची ही फट फजिती होण्यामागे वैचारिक कारण आहे. सर्वात पहिली महत्त्वाची बाब म्हणजे अण्णांचे हे आंदोलन शंभर टक्के अहिसक आहे. अहिंसेचे तत्त्वज्ञान निस्वार्थी नेत्याच्याच तोंडी शोभत असते आणि तोच अहिंसक आंदोलन प्रभावीपणे चालवू शकत असतो. महात्मा गांधी यांनी  स्वातंत्र्याचा लढा अहिसेच्या  मार्गाने यशस्वी केल असे आपण ऐकतो पण ती कार्यपद्धती इतकी प्रभावी होती की लाखो लोक या लढ्यात महात्मा गांधी यांच्या मागे गेले.
    अनेक बुद्धीमान, विद्वानांनी जन्मभर त्यांचे अनुयायित्व पत्करले. त्या तत्त्वज्ञानाचा आणि कार्यपद्धतीचा  प्रभाव नेमका कसा असेल याचा आपल्याला काही अनुभव नाही पण आता अण्णा हजारे यांनी या तत्त्वज्ञानाचा हिसका काय असतो हे दाखवून दिले आहे.अर्ध्या जगावर राज्य करणारे ब्रिटीश सरकार महात्माजींना शरण येत असे असे म्हणतात पण ते खरेच कसे घडत असेल याचे दर्शन आता अण्णा घडवत आहेत.आज सरकार अण्णांची अहिसक कार्यपद्धती आणि त्यांच्यामागे उभे असलेले लोकांचे पाठबळ यामुळे हतबल झाले आहे. या सरकारचे सारे डावपेच आणि युक्त्या अण्णांच्या स्वार्थत्यागापुढे अक्षरशः लुळ्या पांगळ्या होऊन पडल्या आहेत. अण्णा तर आपल्या सुटकेसाठी प्रयत्न करीत नाहीतच पण सरकारच त्यांना आता बाहेर या म्हणून लोटांगणे घालत आहे. केन्द्रातल्या मंत्र्यांच्या चालींचा अण्णांच्या शांततेने अक्षरशः चिधड्या उडल्या आहेत. सरकार चालवणारे लोक हातात असलेल्या पोलिसी बळावर एवढे विसंबून आहेत की या बळावर आपण वाटेल तशी मनमानी केली तरी काही बिघडायचे नाही असा भ्रम त्यांना झाला आहे. हा भ्रम एका बाजूला आहे आणि जनतेचे मन जाणण्याची असमर्थता दुसर्‍या बाजूला. अशा अवस्थेत हे अपरिपक्व लोक निघाले आहेत अण्णांचे आंदोलन दडपायला.
    अज्ञान आणि भ्रम यामुळे हे लोक अण्णांच्या अहिसक जाळ्यात असे काही फसले आहेत  की, पाण्यातून बाहेर पडलेला मासा जसा तडफडतो तसे हे लोक या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी  तडफडायला लागले आहेत. काल अण्णांना अटक करण्यात आली आणि अटकेनंतर उसळलेले जनसमर्थन  पाहून त्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. गंमतीचा भाग म्हणजे अटक केली तेव्हाही मंत्र्यांनी अटकेचे समर्थन केले आणि सोडण्याचा निर्णय झाला तेव्हा त्याचेही समर्थन करण्याची पाळी त्यांच्यावर आली. निःसंग आणि निरिच्छ माणसे फार अवघड असतात. त्याला जिकणे फार कठिण असते. कारण त्याला काही  मिळवायचेही नसते आणि गमवायचेही नसते. अण्णांना सत्ता मिळवायची नाही. अन्य कोणाला सत्ता मिळवून देण्यासाठी त्यांचा आटापिटा नाही. त्यामुळे अण्णांना डावपेचात अडकवणे फार अवघड आहे. सत्ताधारी नेत्यांनी कोणत्याही माणसाला मोजायची आणि आजमावयाची एक पट्टी तयार केलेली असते.ती वापरून ते राजकारण करीत असतात. पण ती पट्टी अण्णांना लागू होत नाही. अशा प्रसंगी अण्णांसाठी कोणती पट्टी वापरावी याचे काही आकलन या नेत्यांना होत नाही.  भारी भारी सम्राटांनासुद्धा  अशा निरिच्छ फकिरांशी कसे वागावे हे कळलेले नाही.         

हे नेते अण्णांना सामान्य माणसाच्या मोजपट्टीने मोजायला जातात आणि मग ती पट्टीच मोडून पडते. दुसरी पट्टी असते ती सामान्य माणसाला मोजण्याची. तीही काल मोडून पडली कारण या पट्टीत न बसणारे जवान यावेळी रस्त्यावर आले.या मंडळीची आणखी एक शोकांतिका अशी की, त्यांनी राहुल गांधी यांना मोठे दाखवण्याचा व्यर्थ खटाटोप केला. अण्णांना अटक झाली पण तो निर्णय  दुःखदायक होता. त्यामुळे तो निर्णय सरकारचा नसून पोलिसांचा आहे असे सांगण्यात आले. अप्रिय निर्णयांची जबाबदारी पोलिसांवर टाकण्यात आली. पण हा निर्णय अंगलट येत आहे असे दिसताच राहुल गांधींना मध्ये टाकण्यात आले आणि राहुल गांधी यांनी अण्णना सोडण्याची सूचना केली आहे असे भासवून राहुल गांधी यांना मोठे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अण्णांना आत टाकण्याचा निर्णय पोलिसांचा होता तर मग बाहेर काढण्याचा निर्णय राहुल गांधीचा कसा होतो ? तो चांगलाय म्हणून राहुल गांधींचा. ही नेहमीचीच ‘रणनीती’ आहे. पण अण्णासारख्या निरिच्छ माणसाच्या चांगल्या वाईटाच्या व्याख्याच वेगळ्या. त्यांना बाहेर सोडण्याचा आदेश दिला गेला पण, त्यांनी स्वतःच बाहेर पडण्यास नकार देऊन सरकारच्या राहुल गांधी यांना मोठे करण्याच्या या प्रयत्नाला जोरदार अहिसक  चपराक लगावली.

Leave a Comment