
नवी दिल्ली दि.१५ ऑगस्ट – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारने केलेला सारा विरोध डावलून मंगळवारपासून लोकपाल विधेयकासाठी जयप्रकाश नारायण पार्कमध्ये उपोषण करण्याचा निर्धार केला. सरकारने या परिसरात जरी १४४ कलम लावले असले तरी आपण तथे जाणारच आणि तुरुंगात टाकले तरी तेथून उपोषण करणार, असे अण्णा हजारे यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत सांगितले. देशाला स्वातंत्र्य मिळून ६४ वर्षे झाली आहेत पण सर्वसामान्य माणूस स्वतंत्र कुठे झाला आहे, असा सवालही त्यांनी केला. या सरकारला जर गांधीजींची भाषा समजत नसेल तर त्यांना छ. शिवाजींची भाषा सांगायला लागेल, असे त्यांनी सांगितले. लोकपाल विधेयक कोणत्याही परिस्थिती होणारच, असे सांगून त्यांनी पुढील आंदोलन जमीन अधिग्रहणाबाबतचे असेल, असे जाहीर केले.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिग यांना आपण एक इमानदार व्यक्ती मानत होतो, पण त्यांनी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांची री ओढली असल्याचे सांगून अण्णा हजारे म्हणाले की, या सरकारला भ्रष्टाचार मिटविण्यात कोणताही रस नाही. उद्योगपतींनी नेत्यांद्वारे आणि नेत्यांनी गुंडाद्वारे हे सरकार चालविले आहे. सरकार पाडणे हे आमचे उद्दिष्ट नाही तर जी बोगस यंत्रणा तयार झाली आहे, ती संपवण्यासाठी आम्ही धडपडत आहोत. पाच वर्षातून होणार्या निवडणुकांत भरपूर पैसे ओतायचे, निवडून यायचे आणि देशाला लुटायचे, असा सगळा कारभार सुरु आहे. या देशातील चार खासदार तुरुंगात आहेत तर १५० च्या वर खासदारांवर गुन्हे दाखल आहेत, हीच का यांची लोकशाही. असे लोक संसदेत निवडून गेले तर लोकशाहीच धोक्यात येईल. त्यामुळे लोकांनी चांगले लोक निवडून दिले पाहिजेत.
गोर-गरिबांच्या जमिनी हडप करुन त्या उद्योगपतींच्या घशात टाकण्याचा कट रचला जात आहे, असे सांगून अण्णा हजारे म्हणाले की, लोकपाल विधेयकाबाबतचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आपण जमीन अधिग्रहणाच्या मुद्यावरुन देशभर आंदोलन करणार आहोत. भ्रष्टाचारामुळेच देशातील महागाई वाढली आहे. देशातील ८० टक्के जनतेचे रोजचे उत्पन्न २० रु. आहे. ही जनता महागाईला कशी तोंड देणार. याचे उत्तर कोणाकडेही नाही. ही सारी परिस्थिती पाहून जगावेसे वाटत नाही. गांधीजींप्रमाणे मला मारायलाही कोणी येत नाही. पण आपण सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अखेरपर्यंत झटत राहू. युवकांनी हिसाचाराला न अवलंबता अहिसेच्या मार्गाने आंदोलन करावे. अहिसेमध्ये मोठी ताकत असते आणि अहिसेंतून आपण सरकारला नमवू शकतो. जयप्रकाश पार्कमध्ये जर मला आंदोलन करु दिले नाही तर देशभरात जेल भरो, आंदोलन करावे, असे आवाहनही अण्णा हजारे यांनी केले.
योग्य प्रकारे लोकपाल विधेयक आणले तर १०० टक्के नाही पण ६० ते ६५ टक्के भ्रष्टाचार तरी मिटू शकतो, असा माझा विश्वास आहे. आणि तसे झाले तर मी कपिल सिब्बल यांच्या घरी पाणी भरण्याचे काम करेन, असा टोला हजारे यांनी मारला. एकतर आम्ही सांगितल्याप्रमाणे लोकपाल विधेयक होईल किवा सरकारला लोक चले जाव म्हणतील. सरकार पाडण्याचे आमचे उद्दिष्ट नाही तर जी भ्रष्टाचारी यंत्रणा निर्माण झाली आहे, ती संपविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सरकार जर जनतेची भाषा ऐकत नसेल तर असे सरकार पडले तरी आपल्याला फिकीर नाही. लोकपाल विधेयक ही तर सुरुवात आहे. अजून खरी लढाई शिल्लक आहे. फार लांबवरची लढाई आपल्याला लढायची आहे आणि जनतेचे समर्थन पाहिले तर आपण ही लढाई नक्कीच लढू शकू.
परिवर्तनाची लढाई खर्या अर्थाने सुरु झाली आणि ती कधीही थांबणार नाही, असे स्पष्ट करुन अण्णा हजारे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाले. गोरे गेले आणि काळे आले. पण स्वातंत्र्य कोणाला मिळाले, कोणत्या अर्थाने मिळाले. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार, गुंडागर्दी चालू आहे. इंग्रज लोक जाऊन काय झाले, जनता आहे तिथेच खितपत पडली आहे. आदिवासी लोकांवर गोळीबार केला जात आहे. स्वतःच्या हक्काच्या पाण्यासाठी लढणार्या शेतकर्यांवर भरदिवसा गोळीबार केला जात आहे. गरिबांच्या जमिनी लुटून उद्योगपतींना वाटल्या जात आहेत. पैशातून सत्ता कमवायचे आणि सत्तेतून पैसा, असा सगळा कारभार सुरु आहे. विकासाच्या नावाखाली सर्वत्र शोषण सुरु आहे. पेट्रोल, डिझेल, रॉकेल, पाणी हे सर्व एक दिवस संपले तर पुढच्या पिढीने जगायचे कसे. याचे उत्तर सरकारकडे आहे का. शहरांकडे लोकांना जाण्याची गरजच नाही. गावांचा विकास केला तर शहरातील लोंढे थांबतील. पण यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची सरकारची, नेत्यांची इच्छाशक्ती नाही. निसर्ग आणि कमजोर यांचे शोषण केले जात आहे. सरकारवर आपला पूर्ण विश्वास आहे पण याचा अर्थ ते सांगतील तसा आणि ठरवतील असा कायदा आपण मान्य करणार नाही.
दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अण्णा हजारे यांच्या आंदोलनाना पाठिबा जाहीर केला आहे. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अण्णांच्या आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनी घातलेल्या अटी-नियमांवर कठोर शब्दांत टीका केली. आंदोलन करणे, उपोषण करणे, हा लोकशाहीतील अधिकार आहे. केवळ ताकतीच्या जोरावर नागरिकांचे हे अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असे मोहन भागवत यांनी सांगितले. अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा एक भाग म्हणून सायं. ८ ते ९ या वेळेत घरातील दिवे विझविण्याचे आवाहन नागरिकांना केले होते, या आवाहनाला सर्वत्र जोरदार प्रतिसाद मिळाला. बहुतांश भागातील नागरिकांनी दिवे विझवून अण्णांना पाठिबा जाहीर केला. तत्पूर्वी सोमवारी दुपारी अण्णा हजारे यांनी गांधीजींचे समाधीस्थळ असलेल्या राजघाटवर जाऊन चितन केले. तेथूनच त्यांनी पत्रकार परिषदेचे स्थळ गाठले.
