स्वातंत्र्य दिनाचे चिंतन

काय चाललेय आपल्या या देशात ? स्वातंत्र्याचा ६४ वा वर्धापनदिन साजरा करताना आपल्याला जे चित्र दिसत आहे ते कसे आहे ? जातीयवाद भराला आलाय. सरकारी कार्यालयात कागदावर वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही. आपल्या पोटी मुलगी जन्माला येणं हा अजूनही  माता पित्यांना शाप वाटत आहे. जादूटोणा आणि भानामती यांच्या कथा अजूनही गावागावात रंगलेल्या दिसत आहेत. सकार काहीही म्हणत असले तरीही अजूनही देशातल्या दारिद्र्य रेषेखालचे जीवन जगणारांची संख्या ३० कोटीपेक्षा अधिक आहे. अजून काय हवे आहे ? पाकिस्तानचे आव्हान आहे आणि चीनची भीती आहे. देशाला नेमके काय हवे आहे हे अजून माध्यमांना कळलेले नाही. देशाची उभारणी करण्यासाठी ज्या गोष्टी हव्या आहेत त्यांचा प्रसार आणि प्रचार करावा अशी जाणीव त्यांच्यात निर्माण व्हायला तयार नाही. माध्यमे आता व्यावसायिक झाली आहेत याचे कौतुक काही सरत नाही आणि अधिकाधिक व्यावसायिक आणि बेजबाबदार होण्याची स्पर्धा त्याच्यात लागली आहे. ती जितकी व्यावसायिक होत आहेत आणि ध्येयवादापासून दूर आहेत तेवढा त्यांचा जनमानसावरचा प्रभाव वाढत आहे आणि लोकही देशभक्त होण्यापेक्षा व्यावसायिक होणे केवळ पसंतच करायला लागलेली नाहीत तर त्याचा अभिमान बाळगायला लागली आहेत.
    परिणामी आज असे चित्र निर्माण झाले आहे की देशभक्ती हा चेष्टेचा विषय झाला आहे. १५ ऑगष्टच्या झेंडावंदनाला जाणे हा कालापव्यय ठरला आहे. एकदा या सार्‍या स्थितीचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्या जीवनात भोगवाद प्रकटला आहे आणि मजा करणे हेच लोकांच्या जीवनाचे ध्येय व्हायला लागले आहे. अमेरिका आणि यूरोपीय लोकांचे अंधानुकरण करीत आपण हे सारे आत्मसात करायला लागलो आहोत पण ते करताना त्या देशत भोगवादाच्या बदल्यात देशभक्तीशी कधीच तडजोड केली जात नसते हे आपण विसरतो आहोत. आपण ज्या देशात राहतो, जगतो त्या देशाविषयी आपले कर्तव्य काय आहे हे समजून घेतले पाहिजे आणि आपले पोट भरतानाच हे कर्तव्य निभावण्याची तयारी केली पाहिजे ही जाणीव तिथल्या लोकांना आहे. त्यांच्या कपड्यांची आणि खाण्याचीच तेवढी नक्कल न करता अशा चांगल्या गुणांचेही अनुकरण आपण केले पाहिजे. ते कले नाही तर आपण देश म्हणून जगण्यास पात्र ठरणार नाही हे आपल्या लोकांच्या लक्षात कधी येणार आहे ?
     स्वातंत्र्याच्या या वर्धापनदिनाला आपल्या समाजातले काही चांगले आणि वाईटही प्रवाह दिसत आहेत. आपल्या समाजातली ज्ञानाच्या आणि संस्कृतीच्या क्षेत्रातली मुठभरांची मक्तेदारी संपत आहे. समाजाच्या स्तरांतले आतले आणि खालचे स्तर हलायला लागले आहेत. ती जागृती देशाला मोठे करणारी आहे. या जागृतीचा आविष्कार प्रत्येक वेळा उचित त्या पद्धतीनेच होईल असे नाही. तो कधी वेड्या वाकड्या पद्धतीनेही होईल पण त्यातली जागृती ही महत्त्वाची आहे. वर्षानुवर्षेच काय शतकानुशतके ज्ञान आणि शिक्षण या बाबत सूप्तावस्थेत असलेले वर्ग हालचाल करायला लागले आहेत हे फार महत्त्वाचे आहे. या बरोबरच आपल्या देशातला एक प्रवाह फार धोकादायक आहेत. समाजात राजकारणी लोक आणि नेते यांचा नको एवढा प्रभाव जाणवत आहे. स्वातंत्र्यापासून ही बाब खटकत आहे.  स्वातंत्र्याने देशात मठे परिवर्तन घडवले. राजकारण हा सामान्य माणसाचाही विषय असतो, असू शकतो आणि तोही राजकारण करू शकतो हे स्वातंत्र्याने आपल्याला दिले पण राजकारणाचा समाजात किती प्रभाव असावा याचे भान आपल्याला राहिलेले नाही. त्याचे काही विपरीत परिणाम आपल्याला जाणवत आहेत.
    समाजाची धारणा तीन अदृश्य तत्त्वांनी होत असते.  सत्ता, संपत्ती आणि ज्ञान. या तिन्हींचा समतोल जिथे साधला जातो तिथे सामाजिक आणि राजकीय स्थैर्य नांदत असते. तिघांचाही समान प्रभाव समाजावर असला पाहिजे पण जर यातल्या कोणाचा तर प्रभाव कमी झाला आणि कोणाचा तरी प्रभाव मर्यादेपेक्षा अधिक वाढला तर मात्र समाजातले सौहार्द्र संपुष्टात येते. आज नेमकी हीच विसंगती दिसत आहे. राजकारण करणारांनी सर्व क्षेत्रे व्यापायला सुरूवात केली आहे. अण्णा हजारे याच्यासारख्या ऋषीतुल्य नेत्याने कुठे उपोषणाला बसावे आणि ते किती दिवस करावे याचा न्याय निवाडा हेच लोक करायला लागले आहेत. आपण काय करीत आहोत याचे त्यांना भान नाही. आपले हे वर्तन केवळ हाती असलेल्या सत्तेच्या धुंदीतून होत आहे आणि ते दूरगामी विपरीत परिणाम करणारे आहे याचे त्यांना भान नाही. या लोकांना स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा अर्थ समजावून सांगण्याची वेळ आली आहे. त्यांना ती माहीत नाही असे नाही. पण सत्ता आणि संपत्ती यांचा त्यांच्या ठायी इतका अभदा्र मेळ झाला आहे की त्यांचे डोके ठिकाणावर राहिलेले नाही. या लोकांची डोकी ठिकाणावर यावीत आणि लोकशाहीचे जतन करण्याची सद्बुद्धी त्यांना सुचावी हीच स्वातंत्र्य दिनाची प्रार्थना  !

Leave a Comment